सोलर इम्पल्स – २

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

     राईट बंधूंनी सुमारे १११ वर्षांपूर्वी पहिल्यांदा विमान उडवून प्रवासाची व्याख्याच बदलली होती. आता पुन्हा एक नवा इतिहास लिहिला जातोय... सौरऊर्जेवर चालणाऱ्या विमानातून जगप्रवास करण्याचा...!
    पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे विमान ‘स्वच्छ ऊर्जेचा संदेश’ घेऊन जगाच्या प्रवासाला निघालं आहे. केवळ सौरऊर्जेवर चालणारं 'सोलर इपल्स-२' हे विमान अहमदाबाद मध्ये आले होते. अबूधाबीहून सुरू झालेल्या या विमानाच्या प्रवासातला अहमदाबाद हा तिसरा टप्पा (पहिला टप्पा : ओमान) आहे. या टप्प्यातच सौरऊर्जेवर सर्वांत जास्त १ हजार ४६५ किलोमीटर चालण्याचा विक्रम या विमानानं आपल्या नावावर केला आहे. 

Solar Impulse 2
सोलर इपल्सचे जनक 
बर्ट्रांड पिकार्ड - व्यवसायानं मानसोपचारतज्ज्ञ, ‘बलून’च्या साह्यानं न थांबता जगप्रवास करणारी पहिली व्यक्ती, सोलर इंपल्सचे संस्थापक अध्यक्ष. त्यांच्या कुटुंबातल्या ऑगस्ट पिकार्ड (स्ट्रॅटोस्फिअरचा अभ्यास) आणि जॅक्‍स पिकार्ड (समुद्राच्या खोलीचा अभ्यास) यांच्या पावलावर पाऊल ठेवत संशोधनाच्या क्षेत्रात.

अँण्ड्रू बोर्शबर्ग - अभियंता, मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून मॅनेजमेंट सायन्सची पदवी. प्रशिक्षित लढाऊ वैमानिक, हेलिकॉप्टर वैमानिक, सोलर इंपल्स प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सोलर इंपल्सची टीम - ३० अभियंते, २५ तंत्रज्ञ, २२ मिशन कंट्रोलर. शंभराहून अधिक आश्रयदाते आणि सल्लागार.
नियंत्रण कक्ष - मोनॅकोमध्ये नियंत्रण कक्ष. या नियंत्रण कक्षातूनच जगप्रवासाकडं लक्ष ठेवण्यात येणार आहे. विविध देशांतल्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि इंटरनॅशनल एरोनॉटिकल फेडरेशन यांच्या कायम संपर्कात हा कक्ष असेल. हा कक्ष जगप्रवास पूर्ण होईपर्यंत २४ तास काम करेल.

प्रकल्पाची सुरवात :
 • ‘सोलर इंपल्स’ प्रकल्पाची सुरवात सुमारे १२ वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये झाली. सौरऊर्जेवर चालणारं विमान तयार करण्याचं उद्दिष्ट या प्रकल्पात निश्‍चित करण्यात आलं होतं. ‘इकोले पॉलिटेक्‍निक फेडरल डी लॉजेन’द्वारा हा प्रकल्प संचालित केला जातो.
 • ‘सोलर इंपल्स’च्या पहिल्या विमानाची चाचणी डिसेंबर २००९ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर या विमानानं ७ जुलै २०१० मध्ये स्वित्झर्लंडच्या पेअर्न विमानतळावरून उड्डाण केलं होतं. सौरऊर्जेवर सलग २६ तास उड्डाण विमानानं केलं. त्यातले ९ तास हे रात्रीच्या उड्डाणाचे होते. पुन्हा पेअर्न विमानतळावरच सोलर इंपल्स उतरलं होतं. हे पहिलं उड्डाण यशस्वी केलं होतं स्विस वायुसेनेतले माजी लढाऊ वैमानिक आंद्रे बोर्शबर्ग यांनी.
 • पुढे सोलर इंपल्स-१ च्या साह्यानं २०१३ मध्ये संपूर्ण अमेरिका खंड पालथा घालण्याची कामगिरीही पिकार्ड व बोर्शबर्ग यांनी केली. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जगप्रवासाला उपयुक्त ठरेल असं ‘सोलर इंपल्स-२’ हे विमान तयार केलं. गेल्या वर्षी त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या व आता पिकार्ड या विमानातून जगप्रवासाला निघाले आहेत. अर्थातच बोर्शबर्ग हेही त्यांचे सहप्रवासी आहेत. दोघंही आलटून-पालटून विमान चालवणार आहेत.

गुजरात कनेक्शन
 • ‘सोलर इंपल्स-२’चे काही भाग भडोच इथल्या सोल्व्हे या कंपनीच्या पानोळी इथल्या प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत. या विमानाचं वजन कमी करण्यासाठी विशेष ‘पॉलिमर’ तयार करण्यात आलं आहे. हे ‘पॉलिमर’ तयार करण्याचं काम सोल्व्हे या कंपनीनं केलं आहे. 
 • सोल्व्हे ही कंपनी मूळची स्वित्झर्लंडची आहे. विमानाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले ‘स्क्रू’ही गुजरातमधल्या प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत.

विमानाची वैशिष्ट्ये
 • दोन्ही पंखांची मिळून मीटरमध्ये लांबी : ७२ मी.
 • विमानाचं वजन किलोग्रॅममध्ये : २३०० कि. ग्रॅ. (एखाद्या मोटारीएवढं)
 • लिथियम बॅटरींचं वजन किलोग्रॅममध्ये : ६३३ कि. ग्रॅ.
 • दररोज तयार होणारी किलोवॉट-अवर ऊर्जा : ३४० KWPH
 • दिवसाच्या वेळी उड्डाणाची सरासरी उंची मीटरमध्ये : ८५०० मी.
 • रात्रीच्या वेळी उड्डाणाची सरासरी उंची मीटरमध्ये : १५०० मी.
 • सोलर सेल जाडी १३५ मायक्रॉन (मानवी केसाच्या सरासरी जाडीएवढी)
 • एकूण १७,२४८  सौर घट
 • कार्बन फायबरचा आराखडा. कागदापेक्षा तीन पटींहून अधिक हलके.
 • १६ एलईडी दिव्यांचा वापर. घरातील साध्या दोन दिव्यांपेक्षा कमी वापर.
 • १७.४ हॉर्सपॉवरची ४ इंजिने
 • वैमानिक क्षमता : १
 • जगप्रवासातले टप्पे : १२
 • कापलं जाणारं एकूण अंतर : ३५००० किमी
 • विमानोड्डाणाचे अंदाजे तास : ५००
 • जगप्रवासाचे एकूण महिने : ५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा