चालू घडामोडी - ९ एप्रिल २०१५


    'धनुष्य' क्षेपणास्त्राची ओडिशात चाचणी
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘धनुष्य’ क्षेपणास्त्राची नौदलाच्या तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटरचा आहे. 
  • नौदलाच्या वापरासाठी तयार करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची चाचणी बंगालच्या उपसागरात एका जहाजावरून घेण्यात आली. ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ने ही चाचणी केली. 

  • देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना कामाच्या प्रचंड ताणामुळे पुरेशी झोप मिळत नसल्याच्या वस्तुस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मानसिक व शारिरिक ताणाच्या व्यवस्थापनासाठी या निमलष्करी दलातील जवानांसाठी योगासनांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. 
  • दलामधील स्त्री व पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यांसाठी हे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. 
  • बीएसएफने यासाठी ‘बह्म कुमारी’ या धार्मिक व सामाजिक संस्थेची मदत घेतली आहे. बीएसेसच्या जवानांसाठी ३० विशेष योग शिबीरे घेतली जाणार आहेत.
  • बीएसएफ प्रमुख : डी के पाठक

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांतर्फे खास गौरवांक निघणार आहे. 
  • बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे व अभ्यासकांचे लेख यांनी सजलेल्या या हिंदी-इंग्रजीतील अंकाचे प्रकाशन दिल्लीत येत्या १४ एप्रिलला सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

  • दहशतवादी कारवायांनी त्रस्त झालेल्या पाकिस्तानला अमेरिकेकडून १ अब्ज डॉलरचा शस्त्रपुरवठा केला जाणार आहे. या करारानुसार पाकिस्तानला हेलिकॉप्टर आणि अद्ययावत क्षेपणास्त्रे दिली जाणार आहेत. 
  • पाकिस्तानच्या वायव्य भागातील दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून, पश्चिमेकडील इराणी सीमेवरदेखील अशांतता निर्माण झाली आहे. 
  • पाकिस्तानला पंधरा ‘एएच-१ झेड’ हेलिकॉप्टर्स, एक हजार हेलफायर क्षेपणास्त्रे, इंजिने, लक्ष्य निर्धारण प्रणाली आणि अन्य महत्त्वाचे साहित्य पुरविले जाणार असून, हा संपूर्ण प्रस्ताव ९५० दशलक्ष डॉलरचा आहे. 
  • पाकिस्तानने तालिबान्यांविरोधात कडक कारवाई करावी यासाठी अमेरिकेने तेथील सरकारवर दबाव आणला असून, याचसाठी हा शस्त्रपुरवठा केला जात आहे.

    AAP Logo
  • आम आदमी पक्षाचे बोधचिन्ह (लोगो) तयार करणारे सुनील लाल यांनी बोधचिन्हावर मालकी हक्क दाखवून बोधचिन्ह परत करण्याची मागणी केली आहे. संकेतस्थळ, पत्रके, झेंडे तसेच पोस्टर्सवर हे बोधचिन्ह वापरण्यात येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
  • आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह समोर आल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. केजरीवाल यांना वापरण्यासाठी मोटार देणाऱ्या ब्रिटनमधील कुंदन शर्मा यांनी पक्षातील सद्यःस्थितीवर नाराजी व्यक्त करत गाडी परत देण्याची मागणी नुकतीच केली आहे.

  • अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीसा दिला देताना नुकसानभरपाईत ५० टक्क्यांपर्यंतची वाढ केली जाईल, अशी घोषणा केली. 
  • त्याचप्रमाणे पिकाचे ३३ टक्के नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही पंतप्रधानांनी जाहीर केला. यापूर्वी ५० टक्के नुकसान झाले तरच शेतकरी सरकारी मदतीसाठी पात्र ठरत होता.

  • मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्सपमध्ये ‘प्राइम टाइम' देण्याचा आदेश काढल्याने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना ‘हुकूमशहा’ असे संबोधणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेनेने विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांची डे यांनी माफी मागावी, अशी एकमुखी मागणी केली.

    मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीन झैदी
  • निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी घोषणा केली आहे. 
  • निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रह्मा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्यानंतर नसीन झैदी आपला पदभार स्वीकारणार आहेत. 
  • झैदी यांच्या नियुक्तीनंतर केंद्र सरकार तीन सदस्यीय आयोगातील रिक्त जागा भरण्यासाठी दोन निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणार आहे. व्ही. एस. संपत यांनी जानेवारीत पद सोडल्यानंतर ब्रह्मा यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदी नेमले होते. 
  • १९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे झैदी हे अनेक वर्षे नागरी विमान उड्डाण मंत्रालयात कार्यरत होते.

  • भारताने शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रकार रोखण्यात मोठे यश मिळवून सर्वांना प्राथमिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट जवळपास साध्य केले असल्याचे ‘युनेस्को’ने प्रसिद्ध केलेल्या ‘एज्युकेशन फॉर ऑल २०००-२०१५’ अहवालात म्हटले आहे. भारतामधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • प्राथमिक शाळांमध्ये सर्वांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट गाठण्यात जगातील ४७ टक्के देशांना यश आले असून, भारतासह ८ टक्के देश हे उद्दिष्ट साधण्याच्या जवळ आहेत.

    GreenPeace
  • ‘ग्रीनपीस इंडिया’ या पर्यावरणविषयक स्वयंसेवी संस्थेला परकीय निधी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली असून, देशाच्या परकीय चलन नियमन कायद्यान्वये झालेली तिची नोंदणीही रद्द करण्यात आली आहे.
  • या कायद्यान्वये असलेली ‘ग्रीनपीस इंडिया’ची नोंदणी रद्द का केली जाऊ नये, असा सवाल करत केंद्राने संस्थेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
  • ‘ग्रीनपीस’ला २०१४-१५मध्ये भारतातून २०.७६ कोटी निधी तर परदेशातून ९.६१ कोटी निधी मिळाला आहे.
  • ‘ग्रीनपीस’चा इतिहास : ग्रीनपीस इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी स्वयंसेवी संस्था असून, ग्रीनपीस इंडिया ही तिची भारतातील शाखा आहे. भारतात २००१ पासून ग्रीनपीस इंडियाने काम करायला सुरवात केली आहे. भारताप्रमाणेच ग्रीनपीस इंटरनॅशनलच्या अमेरिका, आशिया आणि प्रशांतमधील ४० पेक्षाही अधिक देशांत शाखा आहेत. स्वत:ची स्वायत्तता जपण्यासाठी ही संस्था विविध देशांची सरकारे आणि कंपन्यांकडून निधी स्वीकारत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा