चालू घडामोडी - २२ एप्रिल २०१५


  Google Doodle World Earth Day
 • २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन (पृथ्वी दिन)
 • लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने आपले वैशिष्ट्य कायम ठेवत जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने वैशिष्ट्यपूर्ण डुडल सादर केले आहे. 
 • तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून जागतिक वसुंधरा दिनाचे स्मरण घडविण्याचे हेतूने ‘तुम्ही कोणत्या प्रकारचे प्राणी आहात?’ असे म्हणत एक छोटीशी प्रश्नावलीही सादर केली आहे.
 • १९७० पासून सुरु झालेल्या या ४५व्या वसुंधरा दिनाची थीम ‘इट्स अवर टर्न टू लीड’ अशी होती.

  Mohammad Morsi
 • इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष महंमद मोर्सी यांना कैरो येथील न्यायालयाने वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सत्तेवर असताना निदर्शकांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इजिप्तच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या अध्यक्षांविरुद्ध गेलेला हा पहिलाच निकाल आहे. 
 • मोर्सी यांच्याबरोबरच मुस्लिम ब्रदरहूड या कट्टर इस्लामवादी संघटनेच्या बारा मोठ्या नेत्यांनाही या वेळी वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, काल झालेल्या एका सुनावणीदरम्यान मुस्लिम ब्रदरहूडच्या २२ समर्थकांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 • इजिप्तचे अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळलेल्या होस्नी मुबारक यांची सत्ता गेल्यानंतर मोर्सी हे अध्यक्ष झाले होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध जनतेत प्रचंड नाराजी असल्याने २०१२ मध्ये त्यांच्या अध्यक्षीय प्रासादाबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. या वेळी त्यांनी दिलेल्या आदेशानुसार झालेल्या कारवाईत १० जणांचा मृत्यू झाला होता.
 • त्यांच्याविरुद्ध हेरगिरी, २००१ मध्ये झालेल्या क्रांतीच्या वेळी तुरुंग फोडून पळणे, न्यायालयाचा अवमान करणे आणि गोपनीय कागदपत्रे कतार या देशाला देणे, असे गुन्हे दाखल आहेत. 

  Xi jinping conferred Nishan-e-pakistan-award
 • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तानच्या पहिल्या भेटीत सार्वकालिक मित्र असणाऱ्या पाकिस्तानशी ५१ करार केले असून त्यात महत्त्वाचा असा अब्जावधी डॉलरचा आर्थिक कॉरिडॉरचा करारही आहे. या कराराचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असल्याने या भागात भारताच्या शेजारी चीनचा प्रभाव वाढणार आहे.
 • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ३ हजार कि.मी. लांबीच्या पाक - चीन आर्थिक कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन केले. हा महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणजे पाक व चीन या दोन देशातील जवळीक वाढविणारा करार आहे. 
 • १९७९ साली चीनने पाकला जोडणारा काराकोरम हायवे बांधला. त्यानंतरचा हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यामुळे चीन व पाकिस्तान यांच्यातील अंतर कमी होणार आहे. चीनकडून ऊर्जा उत्पादनासाठी साहित्य आयात करणे पाकला यामुळे सोपे जाणार आहे.
 • अध्यक्ष क्षी जिनपिंग व त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांचे रावळिपडी येथे नूरखान विमानतळावर उतरल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन, पंतप्रधान नवाझ शरीफ, लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ व मंत्रिमंडळाचे सदस्य या वेळी उपस्थित होते. विमानतळावर जिनपिंग यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.
 • जीनपिंग यांच्या विमानाला जेएफ १७ थंडर जेट्सचे संरक्षण देण्यात आले होते. ही जेटविमाने पाकिस्तानने चीनच्या मदतीनेच तयार केलेली आहेत. 
 • पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी जिनपिंग यांना पाकिस्तानचा ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

 • पुलित्झर पुरस्कार २०१५
 • पत्रकारिता क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झाली असून न्यूयॉर्क टाइम्सने तीन पुरस्कार पटकावले आहेत. तर अमेरिकेतील फर्ग्युसनने मिसुरीतील वांशिक दंगलींच्या वृत्तांकनासाठी ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी अवॉर्डवर मोहोर उमटवली आहे.
 • पश्चिम आफ्रिकेतील इबोलाच्या साथीबद्दलच्या वृत्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आंतरराष्ट्रीय वृत्तांकनाचा पुरस्कार मिळाला. लॉबींच्या दबावाचा आढावा घेणाऱ्या वार्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सच्याच एरिक लिप्टन या पत्रकाराने पटकावला, तर याच वृत्तपत्रासाठी फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या डॅनियल बेरेहुलक याने इबोलासंदर्भातील फ्युचर फोटोग्राफीबद्दल या पुरस्कारावर मोहोर उमटवली. 
 • लॉस एन्जल्स टाइम्सने लेख तसेच टीकात्मक लेखाबद्दल दोन पारितोषिके पटकावली, याशिवाय अमेरिकेतील दि वॉल स्ट्रीट जर्नल आणि वॉशिंग्टन पोस्टलाही प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.
 • कादंबरीसाठीच्या पुलित्झर पुरस्कार अँटोनी डोएर यांना (‘ऑल दि लाइट वुई कॅननॉट सी’ या कादंबरीसाठी) तर, चरित्रासाठीचा पुलित्झर पुरस्कार डेव्हिड कर्टझर यांना त्यांच्या ‘द पोप अँड मुसोलिनी: दि सिक्रेट ऑफ पायस इलेवन्थ अँड दि राइज ऑफ फॅसिझम इन युरोप’या पुस्तकासाठी जाहीर झाला.

 • रेल्वे बजेट तसेच भारतीय रेल्वेच्या प्रकल्पांचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन निरीक्षण प्रणाली ‘ई-समीक्षा’चे २१ एप्रिल रोजी उद्घाटन केले.
 • ‘ई-समीक्षा’ सॉफ्टवेयरची निर्मिती एनआयसी (National Informatics Centre)ने केली आहे.
 • सध्या या प्रणालीचा उपयोग मंत्रिमंडळ सचिवालय, प्रधानमंत्री कार्यालय आणि इतर मंत्रालयांद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांवर लक्ष्य ठेवण्य्साठी केला जात आहे.

 • जपानच्या ‘मॅग्लेव्ह’ रेल्वे गाडीने आज ताशी तब्बल ६०० किलोमीटरने (ताशी ३७३ मैल) धाव घेत वेगाचा विक्रम मोडला. माउंट फुजीच्या परिसरात ही चाचणी करण्यात आली.
 • ‘मॅग्लेव्ह’ तंत्रज्ञानावर धावणाऱ्या सात डब्यांच्या या गाडीने चाचणीदरम्यान ताशी ६०३ किलोमीटरचा सर्वोच्च वेग गाठला. सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने ही गाडी ११ सेकंद धावली. 
 • गेल्या आठवड्यात या कंपनीच्या गाडीने ताशी ५९९ किलोमीटर वेगाने धाव घेत २००३ मधील ताशी ५८१ किलोमीटर वेगाचा स्वतःचा विक्रम मोडला होता.
 • टोकियो आणि मध्य जपानमधील नागोया शहरांदरम्यान २०२७ पर्यंत या गाडीची नियमित सेवा सुरू होण्याची अपेक्षा असून, या दोन शहरांतील २८६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत कापले जाईल.
 • सध्या धावणाऱ्या ‘शिंकानसेन’ (बुलेट ट्रेन) गाड्यांपेक्षा हा वेळ निम्म्याने कमी असेल. टोकियो-ओसाकदरम्यान २०४५ पर्यंत या गाड्यांची सेवा सुरू होण्याचा अंदाज असून, प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल.
 • ‘मॅग्लेव्ह’ तंत्रज्ञान : ‘मॅग्लेव्ह’ प्रणालीत चुंबकीय शक्तीचा वापर केला जातो. ‘मॅग्लेव्ह’ तंत्रज्ञानावर धावणाऱ्या गाड्या लोहमार्गाच्या दहा सेंटिमीटर (चार इंच) वरून चालतात आणि विजेवर चालणाऱ्या लोहचुंबकांतून त्यांना ऊर्जा दिली जाते. उच्च वेगातही शांतपणाने पुढे जाण्याची क्षमता या प्रणालीत आहे.
 • सध्याच्या वेगवान गाड्या 
  1. सीआरएच ३८० ए (चीन) - चाचणीच्या वेळचा वेग ४८० किलोमीटर. सध्याचा वेग ताशी ३८० किलोमीटर. शांघाय-नानजिंग आणि शांघाय-होंगझोऊ या मार्गांवर ही गाडी धावते. 
  2. टीआर-०९ (ट्रान्सरॅपिड) (जर्मनी) - ताशी पाचशे किलोमीटर वेगाने ही मोनोरेल धावू शकते, पण तिचा वेग सध्या ताशी ४५० किलोमीटर ठेवण्याचा विचार सुरू आहे. 
  3. शिंकानसेन किंवा बुलेट ट्रेन (जपान) - या रेल्वेगाड्या ताशी ४४३ किलोमीटरच्या वेगाने धावू शकतात. ‘ई-५’ मालिकेतील या गाड्या सध्या ताशी ३२० किलोमीटरच्या वेगाने धावतात.

 • सौदी अरेबिया आणि मित्र फौजांकडून येमेनमध्ये हौथी बंडखोरांविरुद्ध गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले हवाई हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • आता येथे शांतता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी राजकीय मार्ग अवलंबिण्यात येणार आहे. 
 • अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या येमेनी अध्यक्षांना हौती बंडखोरांनी पद सोडून जाण्यास भाग पाडले होते. त्यामुळे येमेनमध्ये युद्धजर्जर परिस्थिती निर्माण झाली होती. 
 • सौदीसह गल्फ कोऑपरेशन काउन्सिलच्या दहा देशांच्या आघाडीने येथे हवाई हल्ले सुरू केले होते. आता हे हल्ले थांबविण्यात आले असून, हौती बंडखोरांना पाठिंबा असलेल्या इराणनेही याची स्वागत केले आहे.

 • तेहरिके तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने ‘उमर १’ या स्वनिर्मित क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी दहशतवादाशी सामना करण्यासंदर्भात पाकिस्तानची आजच पाठ थोपटली असताना ही चाचणी झाली आहे. 
 • तेहरिके पाकिस्तान तालिबानने (टीटीपी) क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे निवेदन प्रसिद्ध केले असून, अधिक पुरावा म्हणून चाचणी घेतानाचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. 
 • ‘टीटीपी’चे पाकिस्तानात सर्वत्र अस्तित्व आहे. मात्र अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या वाजिरिस्तान भागात सैन्याकडून दहशतवाद्यांवर वारंवार कारवाई होत असते. त्यामुळेच त्यांनी केलेली ही चाचणी पाकिस्तानला मोठा धक्का देणारी आहे.
 • ‘उमर १’ची रचना हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे ‘टीटीपी’ने सांगितले. ‘परिस्थितीनुसार हे क्षेपणास्त्र तत्काळ जुळविताही येते आणि त्याचे भागही वेगळे करता येतात. याची परिणामकारकता पाहून शत्रूला आश्चर्य वाटेल. देवाच्या कृपेने आमचे शत्रू लवकरच पळ काढताना दिसतील,’ अशी दर्पोक्ती ‘टीटीपी’चा प्रवक्ता महंमद खुरासनी याने केली आहे. 
 • ‘टीटीपी’कडे याहून संहारक क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता असल्याचेही त्याने सांगितले. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आम्ही आत्मघाती पथकांना प्रशिक्षण देत आहोत, असेही तो म्हणाला.

 • इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी मार्चमध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.
 • मार्चमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाला होता; मात्र त्याची प्रकृती आता सुधारत आहे. यामुळे मागील महिनाभर ‘इसिस’च्या दैनंदिन कामकाजापासून बगदादी दूर असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा