चालू घडामोडी - २७ व २८ एप्रिल २०१५


 • देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परकी गंगाजळी सुदृढ असणे आवश्यक असते. १७ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात परकी चलनसाठा २.८ अब्ज डॉलरने वाढून ३४३.२० अब्ज डॉलर या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोचला आहे.
 • २७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ३४१.३७८ अब्ज डॉलर इतका परकी चलनसाठा झाला होता. परकी चलन मालमत्तेत वाढ झाल्याने हा परकी चलनसाठा वाढला आहे.
 • परकी चलनाचा साठा हा परकीय भांडवलातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. देशातील सोन्याचा साठा १९.३८ अब्ज डॉलर इतका कायम आहे.

 • मागील वर्षी झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशात आणि परदेशात मिळून ७ हजार ८०० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या ताज्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संख्या ही प्रचंड असल्याचे आर्थिक गुप्तचर संस्थेच्या (एफआययू) चौकशीत उघडकीस आले आहे.
 • या संदर्भातील अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील वर्षी ‘एफआययू’ने केलेल्या कारवाईद्वारे प्राप्तिकर विभागाने एकूण ७,०७८ कोटी रुपयांच्या, तर सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाने ७५० कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत विक्रमी संख्येने संशयास्पद आर्थिक व्यवहार मागील वर्षभरात झाल्याचे ‘एफआययू’च्या चौकशीत समोर आले आहे.

  Ajoy Mehta
 • मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार अजोय मेहता यांनी मुख्यालयात स्वीकारला आहे. मावळते आयुक्त सीताराम कुंटे यांना विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून टीकेमुळे आयुक्तपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिवपदी कुंटे यांची बदली झाली आहे.
 • मेहता हे पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

 • इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त ‘रेडिओ इराण’ने दिले आहे. हे वृत्त खरे असल्यास हा ‘इसिस’ला मोठा झटका आहे.
 • बगदादीचा मृत्यू झाल्याचा रेडिओ इराणचा दावा आहे. मागील आठवड्यात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये बगदादी गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त ‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

 • गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी करणारा भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर रोहित शर्माची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

 • नेपाळमधील भूकंपात तेलगू चित्रपटातील अभिनेते के. विजय (वय २५) यांचा मृत्यू झाला आहे. एतकरम.कॉम या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते नेपाळला गेले होते.
 • चित्रीकरणानंतर के. विजय यांची मोटार भूकंपामध्ये उलटली होती. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.

 • भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी इंग्लंडने ५० लाख पौंडची मदत केली जाहीर आहे.
 • तातडीच्या मदतीसाठी तीस लाख पौंड आणि रेड क्रॉसला वीस लाख पौंड देण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले.
 • यूके शोध आणि मदतकार्य पथक नेपाळला पाठविण्यात आले असून, आरएएफ विमानेही पाठविण्यात येत असल्याचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी ट्विटरवरून जाहीर केले.

 • नेपाळला बसलेल्या शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्यातून बाचवलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील ५०० अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे.
 • पतंजलीतर्फे भूकंपग्रस्त नेपाळमधील ५०० अनाथ मुलांची सोय करण्यात येणार आहे. या अनाथ मुलांना काठमांडूतील पतंजली योगपीठात ठेवण्यात येणार आहे.
 • या मुलांची खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था आणि पाचवीपर्यंतचे शिक्षण रामदेवबाबा करणार आहेत.

 • चेन्नई येथे जन्म झालेल्या राजा राजेश्वरी यांनी न्यूयॉर्क शहराच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजेश्वरी या अमेरिकेतील पहिल्या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश आहेत.

 • राजधानीतील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमधील एक भाग म्हणून दिल्लीमध्ये मोकळ्या जागी कचरा, झाडांची पाने, रबर, प्लॅस्टिक जाळणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड केला जाईल, असे राष्ट्रीय हरित लवादाने घोषित केले.
 • हरित लवादाने यापूर्वी दिल्लीमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घातली होती; मात्र या बंदीला केंद्र सरकारने तूर्त स्थगिती दिली आहे.

 • सुदानचे अध्यक्ष ओमार अल बशीर यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ९४ टक्के मते मिळवून विजय मिळवला आहे. 
 • ओमार अल बशीर १९८९ पासून सुदानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. या विजयानंतर आणखी ५ वर्षासाठी त्यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे. या निवडणुकीमध्ये ओमार यांच्या नॅशनल कॉंग्रेस पक्षाने ४२६ पैकी ३२३ जागा जिंकल्या आहेत.

 • भारताने इंडोनेशियातील पालेमबंग येथे झालेल्या प्रेसिडेंट चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविले. राकेशकुमार (६९ किलो) व हरपालसिंग (७५ किलो) यांनी सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली.
 • भारताने या स्पर्धेत चार सुवर्ण व एक कांस्य अशी पाच पदके मिळवीत ३३ गुणांची कमाई केली. त्यापैकी दोन सुवर्ण एस. सरजुबाला (४८ किलो) व पिंकी जांगरा (५१ किलो) यांनी महिला गटात मिळविली.

  Anil kapoor and Dilip prabhawalkar at Dinanath mangeshkar award
 • विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा १५ एप्रिल २०१५ रोजी झाली असून २४ एप्रिल २०१५ रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या ७३ व्या स्मृतिदिनी मुंबईमध्ये हे पुरस्कार लता मंगेशकर यांच्या हस्ते वितरीत केले गेले
 • हे पुरस्कार १९८९ पासून प्रतीष्ठानतर्फे देण्यात येतात.
 • पुरस्काराचे स्वरूप – प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
 • ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, पं.सुरेश तळवलकर, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर या पाच दिग्गजांना यंदाचा दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा