चालू घडामोडी - १ मे २०१५


  • १ मे - जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन

    Babasaheb Purandare
  • राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मान शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला. 
  • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१५ च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एकमताने शिवशाहीर पुरंदरे यांची निवड केली. या समितीत वासुदेव कामत, राजीव खांडेकर, दिलीप वेंगसरकर, उज्ज्वल निकम, हभप मंगल कांबळे, सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर-सिंह आणि सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर यांचा समावेश होता. 
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या रूपाने एका अस्सल शिवभक्ताचा गौरव झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
  • राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून, शासनाच्या निर्णयाविरोधात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले
  • महाराष्ट्रातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात निष्ठेने प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 
  • पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र 

  • जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याचे औचित्य साधून राज्यातील सर्व म्हणजे २७ हजार ९२० ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन केले. 
  • या ग्रामसभांत शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार अभियाना’ची माहिती गावकऱ्यांना प्रशासनाकडून समजावून सांगितली जाणार आहे. या योजनेत गावसहभाग कसा वाढवता येईल, याकडे लक्ष देताना गावपातळीवर कोणत्या उपाययोजना करता येतील यावरही चर्चा होणार आहे. थेंब थेंब पाण्याची बचत करून गावपातळीवर पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यास लोकसहभागाचा हातभार कसा महत्त्वाचा आहे, हे सांगण्यात येणार आहे. पाणीबचतीची शपथ दिली जाणार आहे. 
  • या ग्रामसभेत पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेला धरून वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालकांमधील मुलामुलींचे प्रमाण, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणारे घातक परिणाम याबाबतही माहिती दिली जाणार आहे. 
  • गावकऱ्यांच्या हिताच्या योजनांवर चर्चा होणार आहे. यामध्ये आम आदमी विमा योजना, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आदी योजनांच्या माहितीबरोबर विविध योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण केले जाणार आहे. याबरोबरच मागील वर्षांच्या खर्चाचा ताळेबंद, पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन यावरही चर्चा होणार आहे.
  • ग्रामविकास खात्याने २४ एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला. २४ एप्रिल ते १ मे हा सप्ताह पंचायत राज सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.

  • राज्यातील बलात्कार प्रकरणांतील ९२७ पीडित महिलांसह लैंगिक शोषण झालेल्या एक हजार २९५ अल्पवयीन मुलींना तसेच ऍसिड हल्ल्यातील सहा पीडितांना मनोधैर्य सरकारी योजनेतून अर्थसाहाय्य करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारद्वारे उच्च न्यायालयात देण्यात आली.
  • ‘मनोधैर्य’ योजनेतून ऍसिड हल्लापीडितांना तीन लाख, बलात्कार आणि लैंगिक शोषण झालेल्या पीडितांना दोन लाखांचे साहाय्य केले जाते.

  • नोबल पुरस्कार विजेत्या आणि बाल हक्कासाठी लढणाऱ्या मलाला युसूफझाई यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार पाकिस्तानी तालिबानी दहशतवाद्यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने २५ वर्षांची शिक्षा सुनावली. 
  • मिगोरा शहरात (जि. स्वात) तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये मलालावर हल्ला केला होता. ती शाळेतून घरी परतत असताना तिला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहा दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली होती.
  • स्वात खोऱ्यात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला असताना २००७ मध्ये मलाला मुलींच्या शिक्षणासाठी लढा देत होती. तिच्या या लढ्याला दहशतवाद्यांचा विरोध होता. या विरोधातूनच तिच्यावर हा हल्ला करण्यात आला होता.

  • पेट्रोलियम मंत्रालयातील कागदपत्रे उघडकीस आणण्याच्या प्रकरणातील ज्युबिलंट एनर्जीचे अधिकारी सुभाष चंद्रा नवी दिल्ली येथील एका न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात चंद्रा यांच्याशिवाय १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
  • पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या तसेच साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटींवर चंद्रा यांना जामीन मंजूर झाला आहे.

  • नेपाळमध्ये झालेल्या शक्तीशाली भूकंपात पाच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिक बेघर झाले असून, त्यांना मदत पोहचविण्यात येत आहे. 
  • नेपाळमध्ये बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू असून, जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, पाकिस्तानमधून हिंदूराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आलेल्या मदतीवर आक्षेप घेण्यात येत आहे. 
  • नेपाळमध्ये गोहत्या बंदी आहे. अशातच पाकिस्तानकडून हिरव्या रंगाच्या पाकीटांतून मदत म्हणून बीफ मसाला पाठविण्यात आला आहे.
  • धार्मिक भावना भडकाविण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम असलम यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

  • शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून, या योजनेचे लोकार्पण १ मी रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने झाले. 
  • आदिवासी प्रवर्गाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येतात; पण प्रशासनातील भ्रष्ट साखळीमुळे योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून आल्यामुळे प्रशासनाला फाटा देत ग्रामपंचायतींनाच थेट विकास निधी पाठविण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. 
  • यासाठी राज्यातील ५,९०५ गावांच्या २८३५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, या ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी पाठविण्यात येणार आहे. या निधीतून ग्रामपंचायतींना गावासाठी आवश्यक विकास कामे करायची स्वायत्तता देण्यात आली आहे. 
  • १ मेपासून कोणती कामे करावयाची याचा निर्णय ग्रामसभेने घ्यावयाचा असून कामांसाठी प्रशासकीय मान्यतेचे अधिकारही ग्रामसभांनाच देण्यात आले आहेत. त्यामुळे कामांच्या मंजुरीसाठी अन्य शासकीय कार्यालयांत खेटे घालण्याची आवश्यकता नाही. 
  • या योजनेच्या मार्गदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ एप्रिल रोजी आदिवासी विभागातील १५ हजार लोकप्रतिनिधींची कार्यशाळा पुण्यात आयोजित केली होती. 
  • हि योजना यशस्वी होण्यासाठी राज्यातील १०० स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या स्वयंसेवी संस्थांमध्ये डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांची ‘सर्च’ संस्था, डॉ. प्रकाश आणि अभय आमटे यांची ‘लोकबिरादरी’, शुभदा देशमुख यांची ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, ‘मेळघाट मित्र’ तसेच ‘खोज’ यांसारख्या १०० संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव पुण्याच्या यशदा प्रशिक्षण केंद्रात संवाद साधणार आहेत.

  • योगगुरू रामदेवबाबा यांच्या आश्रमातर्फे फक्त मुलगा होण्यासाठी ‘दिव्य पुत्र जीवक बीज’ नावाची जडीबुटी विकली जात असल्याचा प्रकार उघड झाल्याने राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनी या औषधाची पुडीच बरोबर आणली होती. सर्वच पक्षांनी प्रचंड विरोध केल्यावर आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याप्रकरणी सरकार चौकशी करेल असे आश्वासन दिले.
  • हरियाणा सरकारने रामदेवबाबांना ब्रॅंड ऍम्बेसेडरचा दर्जा दिला असून, त्याच राज्यात या ‘दिव्य पुत्र जीवक बीज’ या औषधाची जोरदार चलती असणे हे दुर्दैवी असल्याचे सांगून त्यागी म्हणाले, की हरियाणा राज्यातच केंद्र सरकारने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ची देशव्यापी मोहीम सुरू केली असताना रामदेवबाबांच्या आश्रमातून असे औषध कसे विकले जाते? असा सवाल खडा केला.
  • ‘या औषधामुळे मूल नसलेल्या दाम्पत्यांना गर्भधारणेसाठी मदत होते. बाळाचे लिंग ठरविण्याशी या औषधाचा संबंध नाही’, असे स्पष्टीकरण रामदेवबाबा यांनी दिले. 
  • यापुढे औषधाच्या पाकिटावर ‘मुलगाच होण्यासाठी या औषधाचा संबंध नाही’ असा ‘डिस्क्लेमर’ ही प्रसिद्ध केला जाईल, असे रामदेवबाबा यांनी सांगितले.

  • देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला 'कलांगण' हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मेपासून राज्यात १२ ठिकाणी सुरू होणार आहे. 
  • वीरश्री आणि संगीत यांचा मिलाप असलेला पोलिस बॅण्ड, संरक्षण दलाचा बॅण्ड, वैभवी गौरवगाथेचे कथन करणारा लघुपट, संस्कृतीच्या वारशाचे लोककलेद्वारे दर्शन यांचा समावेश असलेला हा उपक्रम मुंबई आणि महसुली विभागाच्या मुख्यालयांसह अन्य जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी दर रविवारी सादर केला जाणार आहे. 
  • राज्यातील शहरांतील सार्वजनिक ठिकाणी, मैदानात किंवा उद्यानात हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने सादर केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

  • शेतकऱ्यांच्या व्य़था जाणून घेण्यासाठी विदर्भात आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमरावती जिल्ह्यातील गुंजी गावापासून संवाद १२ किलोमीटरच्या पदयात्रेला सुरवात केली. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा