चालू घडामोडी - ४ मे २०१५


    International Yoga Day Logo
  • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि आयुष राज्य मंत्री एस. व्हाय. नाईक यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा लोगो प्रकाशित केला.
  • संयुक्त राष्ट्र महासभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी भारताच्या नेतृत्वाखालील १७७ देशांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलेला प्रस्ताव स्वीकारून २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून जाहीर केले होते. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले आहे.
  • या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७७ देशांचे सहप्रतिनिधी लाभले. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले.
  • आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या योग योग विशेषज्ञांच्या समितीने या लोगोची शिफारस केली असून पंतप्रधानांनी त्यास मंजुरी दिली आहे.

    Pramod Patil Wins Green Oscar
  • माळढोक आणि गिधाडांच्या संवर्धनासाठी झटणारे पक्षीतज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील यांना लंडनमधील व्हाइटली फंड फॉर नेचर या संस्थेचा ‘ग्रीन ऑस्कर’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. रॉयल जिऑग्राफी सोसायटीमध्ये या पुरस्काराचे वितरण झाले.
  • सन्मानचिन्ह, ३५००० पौंड (३३ लाख ७६ हजार रुपये) असे पाटील यांना दिलेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे. माळढोकच्या संवर्धनासाठी पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. पुरस्काराची रक्कम माळढोक संवर्धन प्रकल्पासाठी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
  • पाटील हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे, तर एमडीचे शिक्षण पुण्यातील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमधून घेतले आहे.
  • केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माळढोक संवर्धन प्रकल्पात ते बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या माळढोक संवर्धन प्रकल्पातही पाटील यांचा सहभाग आहे.
  • जागतिक स्तरावरील बर्ड लाइफ इंटरनॅशनल संस्थेच्या ‘ग्लोबली थ्रेटन्ड बर्ड फोरम’साठी पाटील यांनी माळढोकची सद्यःस्थिती आणि आकडेवारी दिली आहे. त्यानंतरच सर्वाधिक संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत माळढोकची नोंद झाली.
  • लोकसहभागातून नान्नज येथील अभयारण्यात माळढोक संवर्धनाचे प्रयत्न त्यांच्या सहकार्यातून सुरू आहेत.

  • उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर नेण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो. तमिळनाडूमधील महेंद्रगिरी येथे ‘इस्रो’च्या प्रयोगशाळेत २८ एप्रिल रोजी क्रायोजेनिक इंजिनची (सीई २०) अधिक कालावधीची (६३५ सेकंद) हॉट टेस्ट घेण्यात आली.
  • या यशस्वी चाचणीमुळे पुढील टप्प्यातील प्रक्षेपक तयार करण्यास मदत आहे. हे इंजिन स्वदेशी बनावटीचे असून, जीएसएलव्ही एमके ३ प्रक्षेपकाला क्रायोजेनिक टप्प्यात ऊर्जा पुरविण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
  • हि यशस्वी चाचणी झाल्यानंतर त्यात आणखी सुधारणा करून कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी इंजिनावर विविध चाचण्या सुरू असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सांगितले आहे.

  • पंजाबमधील मोगा जिल्ह्यामध्ये तीन दिवसांपूर्वी काही टवाळखोरांनी महिलेची छेडछाड करत तिला मुलीसह धावत्या बसमधून खाली फेकले होते. यामध्ये अल्पवयीन मुलगी जागीच मरण पावली होती, तर तिची आई गंभीर जखमी झाली होती.
  • स्थानिक माध्यमांमधून यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध होताच एका स्थानिक नागरिकाने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या घटनेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, या प्रकरणाची लवकरच सुनावणी होणार आहे.
  • ज्या बसमध्ये ही घटना घडली ती बस ‘ऑर्बिट’ कंपनीची असून, ही कंपनी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या मालकीची आहे. तूर्तास राज्यातील ‘ऑर्बिट’ कंपनीच्या बस गाड्यांची वाहतूक रोखण्यात आली आहे.

  • देशभरातील विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या सरकारशी संबंधित खटल्यांचा वेळेत निपटारा करण्यासाठी आता विविध मंत्रालयांमध्ये स्वतंत्र कायदा अधिकारी नेमला जाणार असून, हा अधिकारीच खटले पुढे सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय घेईल.
  • न्यायालयीन खटल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने सरकारवर मोठा आर्थिक ताण येत असून, तो दूर करण्यासाठी कायदा अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • जे सरकारशी संबंधित खटले जिंकणे अवघड आहेत किंवा त्यांचा पाठपुरावा करणे शक्य नाही, असे खटले तातडीने बंद करण्याबाबतचा निर्णय हा कायदा अधिकारी घेईल.
  • विविध न्यायालयांमधील खटले चालविण्यासाठी सरकारला मोठी रक्कम खर्च करावी लागते. दिवसेंदिवस विविध मंत्रालयांवरील याचा ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे असे खटले बंद केल्यास सरकारला होणारा आर्थिक तोटा कमी होण्यास मदत होईल.

  • गेली अनेक दशके लहानथोरांसाठी संस्कारांचे बाळकडू ठरलेले आणि साने गुरुजींच्या सात्त्विक लेखणीने मराठी मनांत अखंड भावनिक स्थान घट्ट केलेले ‘श्यामची आई’ हे अजरामर पुस्तक आता चक्क ‘बोलू’ लागले आहे. 
  • कीनोट ऑडियोज या संस्थेने निर्मिलेल्या या पुस्तकाच्या श्रवणग्रंथाच्या (ऑडिओ बुक) माध्यमातून हा अभिनव आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
  • ‘श्यामची आई‘ या पुस्तकाच्या श्रवणग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांच्या हस्ते झाले.
  • श्रवणग्रंथात ‘श्याम’ला आवाज देणारे अभिवाचक धीरेश जोशी व वासंती जोगळेकर यांनी ग्रंथातील एका प्रकरणाचे अभिवाचनही केले.

  • रेशन दुकानांतील जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार असून, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुचविलेल्या शिक्षेच्या शिफारशी व दुरुस्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

    Floyd Mayweather
  • ‘फाईट ऑफ दी सेन्च्युरी’ असे वर्णन करण्यात आलेल्या जागतिक वेल्टरवेट विजेतेपदाच्या बॉक्सिंग लढतीत फ्लॉइड मेवेदर ज्युनिअरने हुकूमत कायम राखली. त्याने भक्कम बचावाचा उपयोग करीत मॅनी पॅकियाओ याचे तुफानी आक्रमण निष्प्रभ करीत एकतर्फी कौल मिळविला.
  • एमजीएम ग्रॅंड एरिना येथे झालेल्या या लढतीची सोशल मीडियामुळे जास्तच चर्चा झाली होती. मेवेदरची या लढतीत ११८-११०, ११६-११२, ११६-११२ अशी सरशी झाल्याचा निर्णय देण्यात आला.
  • मेवेदरसाठी ही लढत महत्त्वाची होती. त्याने १९ वर्षांतील सलग ४८ वी लढत जिंकली. पाच वर्षांच्या नियोजनानंतर तसेच खरा जगज्जेता ठरवण्यासाठी ही लढत झाली, असेच मानले जात होते.
  • मेवेदरचे ४३५ पैकी १४८ ठोसे बसले, तर पॅकियाओ याचे ४२९ पैकी केवळ ८१. हाच फरक निर्णायक ठरला.
  • फाईट्‌स ऑफ द सेन्च्युरी
    • लढतीचे तिकीट साडेतीन लाख डॉलरपर्यंत गेले होते
    • अमेरिकन चाहत्यांनी लढतीच्या टीव्ही प्रक्षेपणासाठी १०० डॉलर मोजले
    • शो टाइम आणि एचबीओ या अमेरिकेतील कडव्या प्रतिस्पर्धी दूरचित्रवाणी वाहिन्या; पण या लढतीच्या प्रक्षेपणासाठी ते एकत्र आले
    • रॉबर्ट डी निरो, क्लिंट इस्टवूड, डोनाल्ड ट्रम्प यांसारखे दिग्गज लढतीस उपस्थित
    • ही लढत ४० कोटी डॉलरची कमाई ठेकेदारांना करून देईल असा अंदाज
    • मेयवेदरला ११४२ कोटी व पॅकियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले. तसेच विजेत्याला ६.३४ कोटी रुपयांचा हिरेजडित बेल्ट मिळाला

  • कन्नड तालुक्यात प्राचीनकालीन लेणीचे अवशेष सापडले असून ते अठराव्या शतकातील असण्याची शक्यता पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
  • कन्नडपासून दहा किलोमीटर अंतरावरील शिरोडी व सीतानाईक तांडा या गावांच्या मधोमध उंच डोंगरालगत लेणीचे हे अवशेष आढळून आले आहेत.

    Shanta Modak
  • गायन आणि अभिनयाच्या बळावर रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या जुन्या पिढीतील अभिनेत्री शांताबाई भास्कर मोडक (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
  • ‘चूल आणि मूल’ चित्रपटाच्या माध्यमातून शांताबाईंनी रुपेरी दुनियेत पाऊल ठेवले. विश्राम बेडेकर यांनी १९४६ मध्ये हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
  • चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव देताना ‘फेमस पिक्चर्स’चे बाबूराव पै यांना शातांबाईंचे नाव आठवले नाही. म्हणून त्यांनी ‘बिंबा मोडक’ असे नाव दिले. तेव्हापासून त्या ‘बिंबा’ नावानेही ओळखू लागल्या.
  • शांताबाईंचा जन्म पुण्यातच १ एप्रिल १९१९ मध्ये झाला. येथेच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयांमधून १९४२ मध्ये कला शाखेची पदवी मिळवली होती.
  • चित्रपट : चूल आणि मूल, इन मीन साडेतीन, ऊन-पाऊस इ.
  • नाटके : भावबंध, स्वयंवर, सौभद्र, मानापमान
  • पुरस्कार : राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार (१९८०) आणि पुणे पालिकेचा बालगंधर्व पुरस्कार (२००५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा