चालू घडामोडी - १८ मे २०१५


भारत व मंगोलिया देशांमध्ये १४ करार 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगोलिया दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये १४ करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यानंतर मोदींनी मंगोलियाच्या संसदेत भाषण केले. मोदी हे मंगोलियाच्या संसदेत भाषण करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
  • पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये व्यापक संबंध स्थापन करण्याबरोबरच सामरीक पातळीवरही आदान-प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • भारताने मंगोलियात रेल्वे वाहतूक, सायबर सेक्युरिटी सेंटर बनवण्याच्या मदतीची घोषणाही केली. त्याशिवाय सीमा आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मदत देण्याचेही आश्वासन दिले. त्यानुसार दोन्ही देश संयुक्त युद्धअभ्यासही करतील.
  • दोन्ही देशांदरम्यान झालेले १४ करार असे -
    • इंडिया-मंगोलिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी संयुक्त निवेदन
    • हवाई क्षेत्रातील सेवांसंदर्भात करार
    • पशू आरोग्य आणि डेअरी क्षेत्रांत सहकार्य
    • आरोपींच्या हस्तांतरणासाठी करार
    • मेडिसिन आणि होमिओपॅथी क्षेत्रात सहकार्य
    • सीमा सुरक्षा, पोलिसिंग आणि सर्व्हीलान्स क्षेत्रात सहकार्य
    • २०१५ पासून २०१८ दरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचा करार
    • मंगोलियात सायबर सेक्युरिटी ट्रेनिंग सेंटरची स्थापना
    • इंडियन फॉरेन सर्व्हीस इन्स्टिट्यूट आणि मंगोलियाच्या डिप्लोमॅटिक अकादमी यांच्यात करार
    • भारतीय आणि मंगोलियाच्या परराष्ट्र मंत्रालयात सहकार्य वाढवण्याबाबत करार
    • रिन्युअल एनर्जीच्या क्षेत्रात सहकार्य
    • दोन्ही देशांच्या नॅशनल सेक्युरिटी काऊन्सिलदरम्यान सहकार्य
    • मंगोलियाच इंडो-मंगोलिया फ्रेंडशिप सेकेंडरी स्कूलची स्थापना
    • भारताच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि मंगोलियाच्या नॅशनल कँसर सेंटर यांच्यात करार

आयुष विभाग विकासासाठी ५००० कोटीचा निधी 
  • १७ मे २०१५ रोजी केंद्र सरकारने आयुष विभाग (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) विकासासाठी ५००० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. 
  • आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुर्वेद जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालय आयुर्वेद दिन साजरा करण्याची योजना तयार करत आहे असे जाहीर केले.
  • केंद्र सरकारने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी एक केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राष्ट्रीय आयुष मिशनला (NAM) मंजुरी दिली आहे. या मिशनचा मुख्य उद्देश आयुर्वेद क्षेत्रात क्षमता तयार करणे आहे.

विकास गौडाची कांस्यपदकाची कमाई
    Vikas Gawda
  • भारताचा थाळीफेकपटू विकास गौडाने शांघाय डायमंड अॅथलेटिक्स लीगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. विकासनं या स्पर्धेत ६३.९ मीटरवर थाळीफेक करुन आपलं कांस्यपदक निश्चित केलं.
  • गेल्याच आठवड्यात विकास गौडाने जमैकन इन्व्हिटेशनल अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. विकासनं गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण तर एशियाडमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं.
  • आता पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकचं तिकिट मिळवण्यासाठी विकासला किमान ६६ मीटरवर थाळीफेक करणं गरजेचं आहे.

भारत व दक्षिण कोरियामध्ये सात महत्त्वपूर्ण करार
    Narendra Modi & SouthKorea president Park Geun-hye
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये द्विस्तरीय कर टाळण्यासंदर्भातील करारासहित भारत व दक्षिण कोरियामध्ये सात महत्त्वपूर्ण करार झाले असून, दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य अधिक वाढविण्यासंदर्भात परस्पर सहमती दर्शविली. 
  • तसेच दोन्ही देशांमधील भागीदारीस ‘विशेष व्यूहात्मक भागीदारी’चा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. 
  • चीन व मंगोलिया या देशांना भेट दिल्यानंतर मोदी यांनी दक्षिण कोरियास भेट दिली आहे. यावेळी मोदींनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून-हे यांच्याबरोबर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. 
  • भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सात महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत संरक्षण यंत्रसामग्री उत्पादन, जहाजबांधणी, एलएनजी टँकर्सचे उत्पादन याबरोबरच संयुक्त लष्करी कवायती करण्यासंबंधीच्या कराराचाही समावेश आहे.

दिल्लीच्या मुख्य सचिवपदी शकुंतला गॅम्लिन
  • दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी मुख्य सचिवपदी शकुंतला गॅम्लिन यांनी निवड केली होती. त्यानंतर काही तासांतच गॅम्लिन यांनी जंग यांना पत्र लिहून सचिवपदाचा कार्यभार हाती घेऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता.
  • नायब राज्यपाल यांच्या गॅम्लिन यांच्या नियुक्तीच्या निर्णयानंतर दिल्ली सरकारने जोरदार टीका केली होती. राज्यपाल निवडून आलेल्या सरकारला आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बायपास करू शकत नसल्याचे ‘आप’ने म्हटले होते.
  • मात्र राज्यपाल जंग यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. भारतीय राज्यघटनेतील कलम २३९ अ अनुसार नायब राज्यपाल हा दिल्ली प्राधिकरणाचा प्रतिनिधी असल्याचे म्हटले होते.

अरुणा शानबाग यांचे निधन
    Aruna Shanbaug
  • वॉर्डबॉयकडून झालेली अमानुष मारहाण व बलात्कारामुळे तब्बल ४२ वर्षे कोमात गेलेल्या व केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक -४ मध्ये मृत्यूला रोखून धरणाऱ्या लढाऊ अरुणा शानबाग (वय ६५) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
  • परळच्या केईएम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या अरुणा यांच्यावर २७ नोव्हेंबर १९७३ मध्ये याच रुग्णालयातील वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मीकी या नराधमाने कुत्र्याला बांधण्याच्या साखळीने बांधून मारहाण करतानाच अमानुष अत्याचार केले होते. 
  • गळ्याला साखळी आवळल्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिनीला गंभीर हानी होऊन त्या कोमात गेल्या होत्या. तेव्हापासून केईएम रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. 
  • या कालावधीत अरुणा यांची प्रकृती अनेकदा खालावली. मात्र, रुग्णालयातील प्रत्येक परिचारिका, डॉक्‍टर आणि कर्मचारी त्यांच्या अविरत सेवेमुळे त्या प्रत्येक वेळी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद द्यायच्या. मेंदूला मार बसलेला असला तरी धडधडत्या हृदयामुळे त्यांच्या शरीरातील चेतनांनी त्यांना जिवंत ठेवले होते.

जोकोविचने जिंकली इटालियन ओपन स्पर्धा
    Novak Djokovic
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकाविचने आपले वर्चस्व कायम ठेवताना रोम येथे झालेल्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकाविले. पहिल्या सेटमध्ये जोरदार टक्कर देणाऱ्या स्वीझर्लंडच्या रॉजर फेडररचा शेवटी ६-४, ६-३ असा पाडाव केला. 
  • महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकविताना रशियाच्या मारिया शारापोवाने दहाव्या सीडेड कार्ला सुआरेज नावारोवर तीन सेट रंगलेल्या लढतीत ४-६, ७-५ व ६-१ असा विजय मिळविला आणि तिसर्‍यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला.
  • इटालियन स्पर्धा जिंकण्याची जोकोविचची ही पाचवी वेळ आहे. तसेच गेल्या २२ सामन्यात त्याला एकदाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा