चालू घडामोडी - १ जून २०१५


बांगलादेश करणार अटलजींचा सन्मान
  • १९७१ च्या युद्धात पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशला स्वतंत्र करण्यात खासदार म्हणून मोलाची भूमिका पार पाडणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सन्मान करण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे.
  • वाजपेयी यांना ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर अवॉर्ड’ हा सन्मान देण्यात येणार आहे. आजारी असल्याने वाजपेयी बांगलादेशला येऊ शकत नाही. तथापि, येत्या ६ जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर येणार असल्याने, त्यांच्याकडेच हा पुरस्कार सोपविला जाणार आहे.
  • १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती लढा प्रारंभ झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच खासदार असलेले वाजपेयी यांनी बांगलादेश मुक्तीच्या समर्थनार्थ ठोस भूमिका स्वीकारली होती. भारतीय जनसंघाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे सदस्य या नात्याने त्यांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही बांगलादेशच्या हक्कासाठी लढा दिला.
  • पंतप्रधान शेख हसीना यांनीही वाजपेयी यांचा सन्मान करण्याच्या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली आहे. 
  • याशिवाय, बांगलादेश मुक्ती लढ्यात प्राणाहुती देणाऱ्या भारतीय जवानांच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्याचा निर्णय शेख हसीना यांनी घेतला आहे. या सर्व जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले श्रद्धांजली प्रमाणपत्र आणि आभार व्यक्त करणारे पत्र पाठविणार आहेत.
  • विशेष म्हणजे, बांगलादेश सरकारने यापूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर अवॉर्ड’ याच पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान प्राप्त करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या होत्या. २०१२ मध्ये ढाक्यात आयोजित विशेष सोहळ्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.

मोबाईल कॉल कट झाल्यास पैसे परत मिळणार
  • मोबाईलवर बोलत असताना मधेच कॉल कट होण्याचे प्रकार फार जास्त वाढले आहेत. कॉल कट झाल्यानंतरही मोबाईल धारकाला मात्र त्या कॉलचे संपूर्ण पैसे मोजावे लागतात. 
  • हा प्रकार टाळण्यासाठी आणि लोकांना होणारा आर्थिक भुर्दंड रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार विभागाने फोन कट झाल्यास पैसे थेट मोबाईल धारकाच्या फोन खात्यात जमा करण्याची योजना तयार केली असून, येत्या ऑगस्टपासून ती अंमलात येणार आहे. 
  • विशेष म्हणजे, आपण ज्या मोबाईल कंपनीची सेवा स्वीकारली आहे, तीच कंपनी हा पैसा परत करणार आहे.
  • या योजनेची गेल्या तीन महिन्यांपासून चाचपणी सुरू होती. यासाठी दूरसंचार विभागात विशेष उपकरण लावण्यात आले आहे. त्यामुळे आता देशातील प्रत्येक मोबाईल सर्कलवर बारीक नजर ठेवणे शक्य होणार आहे. 
  • या उपकरणाच्या माध्यमातून मोबाईल कंपन्यांना कोणत्या ग्राहकाचा फोन कधी आणि कुठे कापल्या गेला, याची माहिती मिळणार आहे.
  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने मोबाईल कॉल्स कट होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा निकष ठेवला आहे. असे असतानाही, देशात प्रत्येक चार ते पाच कॉलनंतर एक कॉल आपोआपच कट होण्याचे प्रकार घडतात. हा दर अलीकडील काळात १४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ‘थ्री-जी’ सेवांमध्ये कॉल कट होण्याची समस्या फार जास्त असल्याचे दिसून आले आहे.

एचडीएफसीच्या एटीएममधून आता स्लिप मिळणार नाही
  • आयसीआयसीआयपाठोपाठ खाजगी क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या एटीएम मशिनमधून पैशाचा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराची स्लिप न देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
  • स्लिपकरिता कागद लागतो आणि त्याकरिता बँकेला वेगळा खर्च सहन करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी बँकेने आर्थिक व्यवहाराची माहिती देणारी स्लिप न देण्याचा निर्णय घेतला असून, व्यवहार झाल्यानंतर ग्राहकाला थेट त्याच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून व्यवहाराची अर्थात ग्राहकाने किती पैसे काढले आणि त्याच्या खात्यात आता किती पैसे जमा आहेत, याबाबतची माहिती देण्यात येणार आहे
  • या बँकेने काही एटीएममध्ये ही योजना अमलात आणली आहे. जूनच्या अखेरपर्यंत देशातील सर्वच ११,७०० एटीएममध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गुगलची नर्गिस दत्तला आदरांजली
    Nargis Doodle
  • हिंदी चित्रपटसृष्टितील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त गुगल इंडियाने डुडलच्या माध्यमातून अनोखी आदरांजली वाहिली आहे.
  • दिवंगत नर्गिस दत्त यांनी १९३५ साली बालकलाकार म्हणून ‘तलाशे इश्क’ या चित्रपटामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ आणि ‘मदर इंडिया’ म्हणून त्यांना ओळखले जाते. नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’, ‘आवारा’ अशा अनेक चित्रपटांमधून अफलातून अभिनय केला आहे. 
  • सरकारतर्फे मानाचा पद्यश्री पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री आहेत. तसेच सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. 
  • १९६५ पासून दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय सिने पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘द नर्गिस दत्त अवॉर्ड’ दिला जातो. १९८० मध्ये त्या राज्यसभेच्या खासदारही होत्या.
  • नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटानंतर १९५८ साली सुनील दत्त यांच्याशी विवाह केला. संजय, प्रिया आणि नम्रता ही तीन मुलं त्यांना आहेत. नर्गिस यांचे वयाच्या ५१व्या वर्षी कर्करोगाने मुंबईतील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात निधन झाले.

मोदी जाणार इस्राईल, पॅलेस्टाईन, जॉर्डन दौऱ्यावर
  • नरेंद्र मोदी यावर्षी इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी हे इस्राईलला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील. 
  • यामुळे जगातील जवळच्या मित्रदेशांपैकी एक असलेल्या भारत-इस्राईलचे संबंध आणखी पुढे जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 
  • इस्राईल दौऱ्याच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नाहीत, मात्र या वर्षात नंतर इस्राईलसह पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
  • इस्राईलचे पंतप्रधान : बेंजामिन नेतान्याहू

सचिन, सौरव, लक्ष्मण बीसीसीआयच्या समितीत
  • माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे.
  • भारतीय संघाच्या मार्गदर्शकपदी सौरव गांगुलीची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, गांगुलीसह सचिन आणि लक्ष्मण यांना सल्लागार समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भानोत आशियाई ऍथलेटिक्सच्या उपाध्यक्षपदी
  • गैरव्यवहाराचे आरोप असलेले भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) माजी सचिव ललित भानोत यांची आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनच्या (एएए) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • चीनमधील वुहान येथे पार पडलेल्या निवडणुकीत भानोत यांची निवड झाली आहे. भानोत यांची भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे शिफारस करण्यात आली होती. 
  • वुहान येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेपूर्वी पाच उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये भानोत यांचे नाव आहे. 
  • दिल्लीमध्ये २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारात भानोत यांचे नाव आल्याने आयओसीमधून त्यांचे १४ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले होते.

टीडीपी आमदार रेड्डींना १४ दिवसांची कोठडी
  • तेंलगण विधान परिषदेसाठी १ जून रोजी होत असलेल्या मतदानात अँग्लो-इंडियन आमदार एल्वीस स्टीफनसन यांना ५० लाख रुपयांची लाच देत असताना तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार रेवानाथ रेड्डी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. 
  • त्यांच्या घरातून ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत टीडीपीच्या बाजूने मतदान करण्यासाठी रेड्डींकडून ही लाच देण्यात येत होती.
  • रेड्डी यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. न्यायालयाने त्यांना निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली.

सेवाकरात आजपासून वाढ
  • केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली सेवाकर वाढ १ जूनपासून अमलात येणार आहे. त्यामुळे सध्या १२.३६ टक्के असलेला सेवाकर आता १४ टक्के इतका आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे सर्वच सेवा महागणार आहेत.
  • सेवाकरात वाढ करण्यात आल्याने रेल्वे, विमान प्रवास, जाहिरात, बांधकाम व्यवसाय, पर्यटन अशा सर्व क्षेत्रांमधील सेवामूल्य वाढण्याची चिन्हे आहेत. 
  • देशात जीएसटी (वस्तू व सेवाकर) आणणे हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे एक ध्येय आहे. प्रस्तावित सेवाकर वाढ हे या करव्यवस्थेच्या दिशेने सरकारने टाकलेले पाऊल आहे.
या गोष्टी महागणार 
  • जाहिराती, बॅंकिंग आणि इतर वित्तीय सेवा, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, इंटरनेट, वाय-फाय, पॅकेजिंग, पर्यटन, वकिली सेवा, पोस्ट सेवा, व्यायामशाळा आणि क्लब मेंबरशिप, ब्युटी पार्लर, कुरिअर, रुग्णालयीन खर्च, ड्रायक्लिनिंग, केबल टीव्ही आणि विवाहासंबंधी सेवा, विमा योजना, मनोरंजन आणि थीम पार्क, संगीताचे कार्यक्रम आदी.

रशियाच्या प्रवासबंदीवर टीका
  • युरोपातील १७ देशांमधील ८९ राजकीय व्यक्तींना आणि लष्करी अधिकाऱ्यांना रशियामध्ये प्रवास करण्यास रशियाने बंदी घातली असून, त्यांच्या या निर्णयाने युरोपीय महासंघामध्ये संतापाचे वातावरण आहे. 
  • रशियाने कोणतेही कारण न देता जाहीर केलेली ही बंदी अन्यायकारक असल्याचे महासंघाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलाचा कर्करोगाने मृत्यू
  • अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांचा मुलगा ब्यू बिडेन यांचा मेंदूच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. 
  • त्यांचे वय ४६ वर्षे होते आणि ते डेलावेअरचे माजी अॅटर्नी जनरल होते. त्यांच्यावर वॉशिंग्टनमधील वॉल्टर रीड आर्मी मेडिकल सेंटरमध्ये गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते.
  • ब्यू बिडेनच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ब्यू हे कायद्याचे शिक्षण घेऊन आपल्या वडीलांप्रमाणे काम करत होते. त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले आयुष्य घालविले, या शब्दांत ओबामा यांनी श्रद्धांजली वाहिली.

'भूसंपादन'ला पुन्हा अध्यादेशाचा टेकू
  • वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर सुरू असलेल्या विरोधाला न जुमानता मोदी सरकारने तिसरा अध्यादेश मंजूर केला. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. 
  • राजकीय पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर हे विधेयक पुढील अध्ययनासाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे सोपविण्यात आले असताना सरकारने अध्यादेशाला मंजुरी दिल्यामुळे कॉंग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 
  • मात्र, विधेयक मंजुरीपर्यंत सातत्य राखण्यासाठी अध्यादेश आवश्यक असल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे. 
  • याआधी ‘यूपीए’च्या काळात मंजूर झालेल्या २०१३च्या भूसंपादन विधेयकात सुधारणा करण्यासाठी डिसेंबरमध्ये पहिला अध्यादेश लागू करण्यात आला होता. 
  • या अध्यादेशावरील विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यात मोदी सरकारला यश आले; परंतु राज्यसभेतील विरोधामुळे काही सुधारणांसह सरकारने चार मार्चला दुसऱ्यांदा अध्यादेश आणला होता. या अध्यादेशाची मुदत चार जूनला संपणार आहे.

पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान आत्मघाती हल्ला
  • पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान गडाफी स्टेडियमजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
  • या हल्ल्यानंतरही झिम्बाब्वेने पुढेही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही संघांमधील अंतिम लढत खेळली जाणार आहे. 
  • २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना यामुळे पुन्हा एकदा ताजी झाली. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर परदेशी क्रिकेट संघांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. 
  • त्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर झिम्बाब्वे संघ पाकिस्तानात खेळण्यास गेला होता. मात्र आताही आत्मघातकी हल्ल्याची घटना घडली आहे. 

आयआयटी मद्रासच्या निषेधार्थ निदर्शने
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या आंबेडकर-पेरियार अभ्यास गटाची मान्यता आयआयटी मद्रासने काढून घेतल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 
  • या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या निषेधार्थही घोषणाबाजी करण्यात आली. 
  • हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन आयआयटी मद्रासभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 
  • या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (एनसीएससी) आयआयटी मद्रास या संस्थेला नोटीस बजावली आहे.
  • मोदी यांच्यावर टीका करत असल्याच्या तक्रारीनंतर आयआयटी मद्रास या संस्थेने ‘आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल’ या विद्यार्थ्यांच्या गटावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. 
  • बंदीचा हा निर्णय संस्थेच्या प्रशासनाने घेतला असून, त्यामागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याने संस्थेने ही बंदी घातल्याचेही सांगण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा