चालू घडामोडी - २२ जून २०१५


गिनीज बुकमध्ये योग दिनाची नोंद 
    A view of Rajpath from the top of India Gate on the eve of International Yoga Day in New Delhi
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर करण्यात आलेल्या योग कार्यक्रमाच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विक्रमांची नोंद झाली. 
  • या कार्यक्रमात एकाचवेळी ३५,९८५ नागरिकांनी भाग घेतला. दुसरा विक्रम म्हणजे या कार्यक्रमात ८४ देशांचे नागरिक सहभागी झाले होते. 
  • यापूर्वी हा विक्रम विवेकानंद केंद्राच्या वतीने १९ नोव्हेंबर २००५ रोजी ग्वाल्हेर येथे आयोजित योगशिबिराच्या नावावर होता. या शिबिरात २९,९७३ लोकांनी सहभाग घेतला होता. 
  • गिनीज बुकने किमान ५० देशांचे नागरिक एखाद्या योग कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विक्रमाची नोंद करण्याचे ठरविले होते. मात्र, राजपथावर तब्बल ८४ देशांचे नागरिक सहभागी झाले होते.
  • आयुष मंत्री : श्रीपाद नाईक

रामचंद्र गुहा यांना जपानचा प्रतिष्ठित ‘फुकुओका’ पुरस्कार
    Ramachandra Guha
  • प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना जपानचा प्रतिष्ठित ‘फुकुओका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गुहा यांची निवड शैक्षणिक क्षेत्रात झाली आहे. 
  • गुहा यांच्या व्यतिरिक्त थांट मिंट यू आणि मिन्ह हान्ह यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हान्ह यांनी कला आणि संस्कृती, तर यू यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 
  • आशियामध्ये कला, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱयांना ‘फुकुओका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • या पुरस्काराचा वितरण सोहळा १७ सप्टेंबर रोजी फुकुओका आंतरराष्ट्रीय काँगेस सेंटरमध्ये पार पडणार आहे. 
  • यापूर्वी रवि शंकर, पद्य सुब्रम्हण्यम, रोमिला थापर, अमजद अली खान, आशिष नंदी, पार्थ चटर्जी, वंदना शिवा, नलिनी मालणी या भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 
  • प्रसिद्ध भारतीय इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय इतिहास सर्वसामान्य व्यक्तीच्या नजरेतून पुस्तकात उतरवलेला आहे. भारतातील इतिहास सोप्या भाषेत सांगण्याचे काम त्यांनी केले आहे. भारतात विविध भाषा, परंपरा, धर्म आणि जाती असून त्यांच्या पुस्तकातून या बाबतची सविस्तर माहिती मिळते. 

आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे नाव
    CR-7
  • शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधलेल्या एका नवीन आकाशगंगेला पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या सन्मानार्थ सीआर-७ (कॉसमॉस रेडशिफ्ट-७) असे नाव दिले.
  • ख्रिस्तीयानो रोनाल्डोला सीआर-७ या नावानेही ओळखले जाते.
  • आतापर्यंत ज्ञात असलेल्या हिमको या सर्वात दूरच्या आकाशगंगेपेक्षा सीआर-७ तीन पट जास्त तेजस्वी आहे. कॉसमॉस रेडशिफ्ट-७ किंवा सीआर-७ विश्वातील सर्वात जुनी आकाशगंगा मानली जाते.
  • शास्त्रज्ञांनी विश्वाच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतच्या सर्वात तेजस्वी आकाशगंगेचा शोध लावला असून, या आकाशगंगेतील ताऱ्यांची हि पहिली पिढी आहे.
  • खगोलशास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून ताऱ्यांच्या पहिल्या पिढीचे अस्तित्वाबद्दल अनुमान लावत आहेत. त्यांना  पॉपुलेशन-३ तारे म्हणून ओळखले जाते. पॉपुलेशन-३ ताऱ्यांची निर्मिती बिग बँगनंतर झाली आहे.

युपीएससीमध्ये अंध, ‘सेरेब्रल’ग्रस्तांनाही लेखनिक
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व (प्रीलिम) आणि मुख्य परीक्षेत अंध, अपंग सेरेब्रल पाल्सीग्रस्त उमेदवारांना लेखनिकाची मदत घेता येऊ शकेल. केंद्रीय लोकसेवा संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
  • अशा प्रकारच्या उमेदवारांना प्रति तासाला २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. 
  • अंध, लोकोमोटर अपंगत्व असलेले आणि सेरेब्रल पाल्सीग्रस्त उमेदवारांचे लेखनकार्य जर त्याच्या अपंगत्वामुळे (किमान ४० टक्के दुर्बलता) प्रभावित होत असेल, तर त्याला नागरी सेवेच्या प्रारंभिक आणि मुख्य परीक्षेत लेखनिकाची मदत घेण्याची अनुमती दिली जाईल.
  • सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे शरीराची हालचाल प्रभावित होत असते, तर लोकोमोटिव्ह दुर्बलता ही सांधे व स्नायूंमधील अकार्यक्षमता दर्शविते. 

स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्यांच्या बाबतीत भारत ६१वा
  • स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या परदेशी व्यक्तींच्या बाबतीत भारताचे जागतिक क्रमवारीतील स्थान तीनने घसरून ६१वर आले आहे. 
  • स्वित्झर्लंडमधील बँकिंग व्यवस्थेमध्ये जगभरातील सुमारे १.६ लाख कोटी डॉलर संपत्ती ठेवलेली आहे. त्यातील भारतातून ठेवण्यात आलेल्या संपत्तीचा वाटा अत्यल्प ०.१२३ टक्के आहे. 
  • स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्यांच्या बाबतीत ब्रिटन आणि अमेरिका पहिल्या दोन स्थानांवर आहेत, तर या क्रमवारीत पाकिस्तान ७३व्या स्थानी आहे. 
  • स्वित्झर्लंड मध्यवर्ती बँकिंग प्राधिकरण असलेल्या ‘एसएनबी’ने (स्विस नॅशनल बँक) ही माहिती जाहीर केली आहे. 
  • स्वित्झर्लंडमधील वेगवेगळ्या बँकांमध्ये परदेशी व्यक्तींनी पैसे ठेवले आहेत. त्यापैकी ‘यूबीएस’ आणि ‘क्रेडिट सुइस’ या दोन बँकांमध्ये दोन तृतीयांश रक्कम असल्याचे समोर आले आहे. 
  • स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेले पैसे २०१४मध्ये दहा टक्क्यांनी घटून १ अब्ज ८० कोटी स्विस फ्रँक्सवर (सुमारे १२ हजार ६१५ कोटी रुपये) आले आहेत.

नालसर विद्यापीठाने लिंग ओळखमुक्त पदवी प्रदान केली
    Nalsar University Degree
  • हैदराबादस्थित नालसर विधि विद्यापीठाने पदवीच्या आनंदिता मुखर्जी या विद्यार्थिनीला लिंग ओळखमुक्त अशी पदवी प्रदान केली. या पदवीत विद्यार्थिनीच्या नावासमोर ‘मिस’ नव्हे तर ‘एमएक्स’ असे लिहिलेले आहे. 
  • देशातील एखाद्या विद्यापीठाने जारी केलेली अशा प्रकारची ही पहिली पदवी आहे.
  • पदवी प्रमाणपत्रावरील आपल्या नावासमोर ‘कुमारी/श्रीमती’ किंवा ‘श्री वा श्रीमान’ असे कुठलेही लिंगाची ओळख दर्शविणारे संबोधन वा उपाधी न लिहिता ‘एमएक्स’ लिहावे, अशी विनंती आनंदिता हिने केली होती. तिची ही विनंती मान्य करून विद्यापीठाने ‘एमएक्स आनंदिता मुखर्जी’ या नावाने तिला पदवी प्रमाणपत्र बहाल केले.
  • एमएक्स हे लिंग ओळखमुक्त असे संबोधन आहे. याप्रती अलीकडे आकर्षण वाढायला लागले आहे.

वादग्रस्त ट्विटमुळे भाजपचे राम माधव गोत्यात
    Ram Madhav
  • उपराष्ट्रपती हमीद अन्सारी योगदिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले, अशा आशयाचं ट्विट भाजप नेते राम माधव यांनी केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावर उपराष्ट्रपतींना कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते असा खुलासा उपराष्ट्रपतीच्या कार्यालयातर्फे करण्यात आला.
  • सरकारने या मुद्द्यावर प्रोटोकॉलचं कारण पुढे केलं आहे. पंतप्रधान हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आणि त्यापेक्षा उच्चपदारीवल व्यक्तीला निमंत्रण देणं अयोग्य ठरलं असतं. अन्सारींना बोलवून उपराष्ट्रपती पदाच्या गरीमेला ठेच पोहचली असती. त्यामुळे त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही, असं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.
  • अन्सारी हे राज्यसभेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्यसभा टीव्हीचेही प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी योग दिनाचा कार्यक्रम राज्यसभा टीव्हीवर लाईव्ह केला नाही, असा आरोपही भाजप नेते राम माधव यांनी ट्विटमधून केला होता. 
  • पण राज्यसभा टीव्हीचे सीईओ गुरुदीप सिंग सप्पल यांनी हे आरोप फेटाळून लावले. राज्यसभा टीव्हीने राजपथावरील योग दिनाचा कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट केला. शिवाय ३ लघुपट आणि एक विशेष रिपोर्टही योगावर सादर केले, असं सप्पल म्हणाले.
  • राम माधव यांनी खरी परिस्थिती समोर आल्यानंतर वादग्रस्त ट्विटमागे घेत माफी मागितली. सरकारनेही सारवासारव करीत चुकीची कबुली दिली.

अफगाणिस्तानच्या संसदेवर तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला
  • अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील संसदेवर तालिबानी दहशतवाद्यांनी २२ जून रोजी हल्ला केला. संसदेच्या इमारतीबाहेर दहशतवाद्यांनी चार शक्तिशाली बाँबस्फोट घडवून आणले असून, या स्फोटांनी संपूर्ण काबूल शहर हादरले आहे. 
  • यावेळी गोंधळ उडाल्याने खासदारांना सुरक्षित आश्रय शोधावा लागला, तसेच हा हल्ला दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपणामुळे दिसू शकला.
  • या हल्ल्यात सात हल्लेखोरांसह दोनजण ठार झाले असून त्यात एका मुलाचा समावेश आहे. 
  • अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रीपदाच्या उमेदवाराचा परिचय करून दिला जात असताना हा हल्ला झाला. हा हल्ला दोन तास सुरू होता. त्यानंतर आत्मघाती कार बॉम्बरसह सात हल्लेखोरांना सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ठार करण्यात आले.
  • तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
  • यापूर्वी २०१२ मध्ये आत्मघाती हल्लेखोरांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. २००१ मध्ये अमेरिकी आक्रमणानंतर अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता संपुष्टात आली होती. काबूलमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा ठिकाणांवर तालिबानने हल्ला केल्याने नाटो सेनेच्या मदतीशिवाय अफगाणिस्तानचे सैन्य तालिबानला तोंड देऊ शकत नाही हे परत सिद्ध झाले आहे. नाटोने त्यांची मोहीम डिसेंबरमध्ये बंद केली होती.

निको रॉसबर्ग ऑस्ट्रियन ग्रांप्रीचा विजेता 
  • मर्सिडिज संघाच्या निको रॉसबर्ग याने रविवारी संघ सहकारी ल्युईस हॅमिल्टनला मागे टाकत जागतिक फॉर्म्युला वन मालिकेतील ऑस्ट्रियन ग्रांप्री जिंकली. रॉसबर्गचे फॉर्म्युला वनमधील एकूण अकरावे विजेतेपद ठरले. तसेच, रॉसबर्गचे हे या मोसमातील हे तिसरेच जेतेपद ठरले. यापूर्वी रॉसबर्गने या मोसमात स्पॅनिश ग्रांप्री आणि मोनॅको ग्रांप्री जिंकली होती.
  • मर्सिडीजचा हॅमिल्टन दुसऱ्या क्रमांकावर, विल्यम्स संघाचा फिलिपे मासा तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
  • या विजेतेपदासह रॉसबर्गच्या खात्यात २५ गुण, तर हॅमिल्टनच्या खात्यात १८ गुण जमा झाले आहेत. 
  • ड्रायव्हर्सच्या गुणतक्त्यात हॅमिल्टन १६९ गुणांसह आघाडीवर असून, त्यापाठोपाठ १५९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर निको रॉसबर्ग आहे. फेरारीचा सेबॅस्टियन व्हिटेल १२० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय क्रिकेट चाहत्यावर बांगलादेशमध्ये हल्ला
    Sudhir Gautam
  • भारतीय क्रिकेट संघ आणि सचिन तेंडुलकर यांचा कट्टर चाहता म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सुधीर गौतम यांच्यावर २१ जून रोजी बांगलादेशच्या समर्थकांकडून हल्ला करण्यात आला. 
  • भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना जिंकून बांगलादेशने मालिका जिंकल्यानंतर हा प्रकार घडला. 
  • सुधीर गौतम सामना संपल्यानंतर मैदानाच्या बाहेर रिक्षा पकडत असताना त्यांच्यावर काही अतिउत्साही बांगलादेशी क्रिकेट समर्थकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी ते विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशच्या केलेल्या पराभवाचा बदला घेत असल्याचे म्हणत होते. 
  • मात्र, त्याठिकाणी वेळीच दोन पोलीस आल्याने सुधीर गौतम यांची सुटका झाली.

शालेय अभ्यासक्रमात योगा विषय सक्तीचा
  • आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी २२ जून रोजी दिल्लीत केंद्र सरकारच्या अखत्यारित चालणाऱ्या सर्व विद्यालयांमध्ये ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी योगा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय जाहीर केला. शिक्षकांच्या अभ्यासक्रमातही योग प्रशिक्षण दिले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
  • केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 
  • या विषयाचा विद्यार्थ्यांवर कुठलाही अतिरिक्त ताण पडणार नाही. कारण या विषयाअंतर्गत ८० गुण प्रात्यक्षिकासाठी आणि केवळ २० गुण लेखी परीक्षेसाठी असतील.
  • तसेच पुढील वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर योग स्पर्धा घेतली जाईल व या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्याला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल असेही स्मृती इराणी यांनी सांगितले.
  • योगाची वाढती मागणी बघता योगाशिक्षकांसाठी अभ्यासक्रम राबवण्याचा सरकारचा विचार आहे. यात योगा विषयात पदवी, पदव्यूत्तर, डिप्लोमा कोर्स सुरु केले जातील.

जपानच्या सॉफ्ट बँक कोर्पची भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक
  • २२ जून २०१५ रोजी जपानच्या सॉफ्ट बँक कोर्पने भारती इंटरप्रायजेज (भारत) आणि फाक्सकॉन (तैवान) यांच्या अल्प भागीदारीसह भारतात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली.
  • जपानमध्ये मुख्यालय असलेली दूरसंचार व इंटरनेट कंपनी सॉफ्ट बँकने यापूर्वी भारतात आपण येत्या १० वर्षांत दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते. 
  • या तिन्ही कंपन्या मिळून भारतात २० गीगा वॅट्सचे अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारतील. 

चांद्रयान-२ची प्रतिकृती इस्रोकडे सुपूर्द
  • भारताच्या दुसऱ्या चांद्र मोहिमेतील चांद्रयान-२ची प्रतिकृती (ऑर्बिटर क्राफ्ट मोड्युल स्ट्रक्चर) इस्रोकडे सोपविण्यात आली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ही प्रतिकृती तयार केली आहे. 
  • चांद्रयान-२ हे चांद्रयान-१ची सुधारित आवृत्ती आहे. तीन टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. 
  • इस्रोच्या नियोजनानुसार, चांद्रयान-२ येत्या दोन-तीन वर्षांत भूस्थिर उपग्रह वाहकाद्वारे अवकाशात सोडण्यात येईल.

अँडी मरे क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेत विजयी
    Andy Murray wins Queens Club
  • अँडी मरेने २१ जून रोजी क्विन्स क्लब टेनिस स्पर्धा जिंकली. त्याचे हे कारकिर्दीतील चौथे क्वीन्स जेतेपद ठरले आहे. फायनलमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. 
  • याआधी जॉन मॅकेन्रो, बोरिस बेकर, अँडी रॉडिक व लिटन ह्युईट यांनी ही स्पर्धा चारवेळा जिंकली आहे.
  • २०१५च्या एटीपी मोसमातील मरेचे हे तिसरे जेतेपद आहे. याआधी त्याने माद्रिद व म्युनिच स्पर्धा जिंकली आहे. २०१३च्या विम्बल्डन जेतेपदानंतर मरेने प्रथमच ग्रास कोर्टवरील स्पर्धा जिंकली.

नमाज पढण्यास चीनमध्ये बंदी
  • मुस्लिम बहुसंख्य असलेल्या शिनजियांग प्रांतातील सरकारी अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांनी रमजान महिन्यात रोजे ठेवण्यास आणि मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्यास चीन सरकारने बंदी घातली असून तेथील उपाहारगृहेही दिवसभर खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा