चालू घडामोडी - २९ मे २०१५


रियो ऑलिम्पिकसाठी अभिनव बिंद्रा पात्र
    Abhinav Bindra
  • ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता सिध्द केली आहे.
  • म्युनिच, जर्मनी येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत बिंद्राने पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात सहावा क्रमांक मिळवला. यामुळे तो रियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचा पात्र होणारा चौथा नेमबाज ठरला आहे.
  • अभिनवने १२२.४ गुणांची कमाई केली. या प्रकारात अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याने पात्रता फेरीत ६२७.५ गुण मिळवले. चीनच्या झ्यू क्विआनने या प्रकारात सुवर्णपदक तर रशियाच्या व्लादिमीर मासलेनिकोव्हने रौप्यपदक पटकावले. 
  • प्रत्येक देशातर्फे ३० नेमबाजपटू ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकतात. भारताकडून आतापर्यंत जितू राय, गगन नारंग, अपूर्वी चंडेला आणि अभिनव बिंद्रा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये अभिनव सहभागी झाल्यास, तर ही त्याची सलग पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा (सिडनी, अथेन्स, बीजिंग, लंडन, रिओ) असणार आहे. 
  • गेल्या वर्षी ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर फ्री पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावत जितू रायने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नेमबाजपटू ठरला होता. 
  • यानंतर युवा अपूर्वी चंडेलाने गेल्या महिन्यात चांगवोन, कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. या पदकासह अपूर्वीची रिओवारी पक्की झाली. 
  • काही दिवसांपूर्वी फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात गगन नारंगने ५० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले होते.

महिला डब्यांत सीसीटीव्ही
  • महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलच्या महिला डब्यांत प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास प्रारंभ होणार आहे. सुरवातीला तीन लोकलमध्ये प्रत्येक महिला डब्यात चार ते आठ कॅमेरे लावण्यात येतील. 
  • महिलांच्या डब्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा घडल्यास आरोपींना तात्काळ ताब्यात घेणे शक्य व्हावे, या हेतूने हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेच्या प्रवासी सुविधा पंधरवड्याचे औचित्य साधून चर्चगेट स्थानकात एका कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद या उपक्रमाचा प्रारंभ करतील.

केथ वाझ बनले लेबर पक्षाचे उपाध्यक्ष
  • भारतीय वंशाचे खासदार केथ वाझ यांची लेबर पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ब्रिटनच्या क्रमांक दोनच्या पक्षाचे दुसरे महत्त्वाचे पद मिळवणारे ते पहिलेच आशियाई ठरले आहेत. वाझ हे लंडनचे सर्वांत अधिक काळ खासदार पदावर असलेले अशियाई आहेत. 
  • निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अध्यक्ष एड मिलिबॅंड यांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्षपदही रिकामेच आहे. त्यामुळे वाझ यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असली तरी सध्या तेच सर्वांत वरिष्ठ पदावर आहेत. 
  • वाझ हे प्रथम १९८७ ला खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग सहा वेळा त्यांनी ब्रिटनच्या संसदेत प्रवेश केला आहे.

जेनेरिक औषधांचे देशात तीन हजार स्टोअर्स
  • देशभरात तीन हजार जेनेरिक औषधांचे स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. 
  • त्यानंतरच्या काळात देशभरात आणखी २५ हजार स्टोअर्स सुरू केले जातील. वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयांमध्ये हे स्टोअर्स असतील. 
  • याकामी सुरवातीला अनुदानही दिले जाईल. यात बेरोजगार तरुणांना संधी दिली जाईल. या सेवेत प्रथम ५०४ औषधांचा व त्यात कर्करोगाच्या औषधांचाही समावेश असणार आहे. 
नीम कोटेड युरिया 
  • युरिया खताचा वातावरणाशी संपर्क आल्यानंतर त्यातील काही भाग हवेत उडून जातो. असे नुकसान टाळण्यासाठी युरिया खताला नीम कोटेड करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी दहा बॅग खत लागते. त्या ठिकाणी साडेआठ बॅगेतच काम होईल. युरिया खताच्या प्रतिबॅगेमागे आता २६८ रुपये लागतात. तुलनेत नीम कोटेड खताला १४ ते १५रुपये अधिक लागतील. 
  • खतनिर्मितीचे काही बंद पडलेले कारखानेही सुरू करून आयात कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

डीआरडीओच्या महासंचालकपदी एस ख्रिस्तोफर
    S. Christopher
  • प्रसिद्ध शास्त्रज्ञ एस. ख्रिस्तोफर यांची २८ मे २०१५ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच्या कार्यकाल नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षे असेल. याचबरोबर ते पुढील २ वर्षांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव म्हणून देखील नियुक्त करण्यात आले आहेत.
  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) क्रिस्तोफर यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. नियुक्तीच्या वेळी, ख्रिस्तोफर डीआरडीओच्या एयरबॉर्न वॉर्निंग सिस्टम तसेच सेंटर फॉर एयर-बॉर्न सिस्टमचे संचालक होते.
  • याव्यतिरीक्त, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून पुढील दोन वर्षांसाठी डॉ. जी. एस. रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी पूर्वी डीआरडीओच्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे संचालक म्हणून काम केले आहे.
  • ख्रिस्तोफर यांची नियुक्ती होण्यापूर्वी महासंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव यांच्यावर देण्यात आली होती.
  • ख्रिस्तोफर यांना पद्मभूषण तसेच डीआरडीओ आउटस्टँडिंग साईंटीस्ट ऑफ द यीअर (२०१२) हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

गुज्जरांना आरक्षण देण्यास सरकार राजी
  • राजस्थान सरकारने गुज्जरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तयारी दर्शविल्यानंतर मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला रस्त्यावरील संघर्ष थांबविण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
  • गुज्जर नेते आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या चर्चेतून हा तोडगा निघाला. गुज्जरांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र विधेयकच विधिमंडळात सादर करणार आहे. 
  • गुज्जर आंदोलनाचा सर्वाधिक फटका रेल्वे सेवेला बसला असून, आतापर्यंत ३२६ गाड्या रद्द करण्यात आली आहेत. 
  • राज्य सरकारने विद्यमान पन्नास टक्क्यांच्या कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी आंदोलकांची मागणी होती; पण यामुळे ओबीसी कोटा कमी होऊन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राज्य सरकारचे म्हणणे होते.

कॅबिनेट सचिवपदी प्रदीपकुमार सिन्हा
  • उत्तर प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार सिन्हा यांची कॅबिनेट सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 
  • सध्याचे कॅबिनेट सचिव अजित सेठ हे निवृत्त होत असून, सिन्हा हे १३ जूनपासून पदभार सांभाळतील. 
  • सिन्हा हे १९७७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पदभार स्वीकारेपर्यंत सिन्हा यांची कॅबिनेट सचिवालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासही मोदी यांनी मान्यता दिली आहे. 
  • सिन्हा यांच्याकडे जुलै २०१३ पासून ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.

मोदींवर टीका केल्याने अभ्यासगटाची मान्यता रद्द
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्याप्रकरणी आयआयटी मद्रासने ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, आयआयटीच्या व्यवस्थापनाने या कारवाईचे समर्थन केले आहे. 
  • या अभ्यासगटाच्या टीकात्मक विश्लेषणाविरोधात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली होती. हा अभ्यासगट केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेला चिथावणी देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाजाविषयी द्वेष पसरवीत आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. 
  • मर्यादांचे उल्लंघन आणि अधिकारांचा गैरवापर केल्याने या अभ्यासगटाची मान्यता रद्द करण्यात आली, असे विद्यार्थ्यांचे प्रमुख शिवकुमार श्रीनिवासन यांनी सांगितले. यासंबंधीचे पोस्टर प्रसिद्ध करण्यासाठी अथवा अन्य बौद्धिक कार्यक्रमासाठी अभ्यासगटाच्या विद्यार्थ्यांनी माझी परवानगी घेतली नव्हती, असे श्रीनिवासन यांनी नमूद केले. 
अभ्यासगटाचा विरोध 
  • आयआयटीच्या व्यवस्थापनाने केलेली कारवाई एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी असल्याचे अभ्यासगटाच्या सदस्यांनी म्हटले आहे. आमचा अभ्यासगट डॉ. आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारांच्या प्रसाराचे काम करतो. समाजातील शोषितांना जातीव्यवस्थेचे धोके दाखवून देण्याचे काम आम्ही करतो.
  • जातीव्यवस्थेच्या निर्मितीमागे निश्चित कोणती विचारसरणी आहे हे उघड करण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे अभ्यासगटाने संचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

अजून ३९ खेळाडू 'टॉप'मध्ये
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी दमदार कामगिरी करावी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आम्ही पुरवू, असे केंद्र सरकारने जाहीर करत टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेला प्रारंभ केला आहे. 
  • या योजनेचा काही नामांकित खेळाडूंना लाभ मिळाला असून दुसऱ्या टप्प्यात अजून ३९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तिरंदाजपटू दीपिका कुमारी आणि तरुणदीप राय यांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • रिओमध्ये होणाऱ्या २०१६च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी खेळाडूंना आर्थिक मदत मिळावी, यासाठी योजना बनवण्यात आली आहे. यापूर्वी ४५ खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 
  • ‘टॉप’च्या समितीने नवीन नावांची शिफारस केली असून या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर आहेत. 
  • नवीन यादीमध्ये अ‍ॅथलीट टिंटू लुका, अश्विनी अकुंजी, सिनी जोस, मनदीप कौर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिरंदाजपटू डोला बॅनर्जी, बोम्बायला देवी यांचा समावेश आहे. बॉक्सिंगमध्ये सर्जुबाला आणि सुमीत सांगवान यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे.
  • या योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा