चालू घडामोडी - १ जुलै २०१५


दिनविशेष
  • १ जुलै : महाराष्ट्र कृषी दिन
  • १ जुलै १९१३ : वसंतराव नाईक जन्मदिन (हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री)

ब्लॅकस्टोन उद्योगसमुहाची महाराष्ट्रात ४५०० कोटींची गुंतवणूक
  • अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १ जुलै रोजी ब्लॅकस्टोन उद्योगसमुहाशी सामंजस्य करार केला. देशभरात सुरू होत असलेल्या ‘डिजिटल इंडिया वीक’ला या कराराने महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे.
  • ब्लॅकस्टोन उद्योगसमुहाने महाराष्ट्रात ४५०० कोटींची गुंतवणूक जाहीर केली असून यामुळे तब्बल ५० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
  • यापैकी हिंजेवाडी (पुणे) येथे १ हजार २०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कसाठी १ हजार ५०० कोटी, मुंबईतील अन्य आयटी पार्कमध्ये १ हजार ५० कोटी आणि ईऑन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटी याप्रमाणे ही गुंतवणूक होणार आहे.
  • ब्लॅकस्टोन ही वित्तीय सल्लागार आणि गुंतवणूक व्यवस्थापन विषयक जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था आहे.
  • याव्यतिरिक्त कोकाकोला कंपनी महाराष्ट्रातील लोटे परशुराम (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 
  • तसेच सिटी बँकेचे प्रबंध संचालक (आॅपरेशन्स) जगदीश राव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सिटी बँक, मुंबई व पुण्यात कार्यविस्तार करणार असून त्यामुळे ४ हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत.

अफगाणी सुप्रीम कोर्टात महिला जज
  • अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी यांनी अनिसा रसूली यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे. 
  • अफगाणिस्तानच्या सुप्रीम कोर्टात प्रथमच एका महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे कर्मठ इस्लामी समर्थकांमध्ये संताप उसळला आहे.
  • अनिसा रसूली या अफगाण विमेन्स जज असोसिएशच्या त्या प्रमुख असून, बालगुन्हेगारांच्या न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत. 
  • सुप्रीम कोर्टात एकूण नऊ न्यायाधीश असून, रसूली या एकमेव महिला आहेत. कर्मठवाद्यांच्या विरोधामुळे रसूली यांच्या नियुक्तीच्या घोषणेला महिनाभर विलंब झाला आहे.
  • या नियुक्तीला अफगाण संसदेची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. महिलांना सरकार आणि प्रशासनातील महत्त्वाची पदे देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. एप्रिल महिन्यात अफगाण संसदेने चार महिलांसह काही मंत्र्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती.
  • माजी शिक्षक आणि जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ असलेले घनी यांनी यापूर्वी गोर आणि दैकुंडी प्रांताच्या गव्हर्नरपदी महिलांची नियुक्ती केली आहे. सर्व मंत्र्यांनी आपापल्या उपमंत्रिपदी महिलांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी नुकतीच केली आहे. 
  • जूनमध्ये धर्मगुरूंच्या एका गटाने काबूलमध्ये महिला न्यायाधीशाची सुप्रीम कोर्टात नियुक्ती करण्याविरोधात मेळावा घेतला होता.

एसएमएसचे जनक मॅट्टी मॅक्कोनेन कालवश
  • ‘मोबाईल नेटवर्क्स’द्वारे संदेश पाठविण्याची पद्धत विकसित करण्यास हातभार लावणारे मॅट्टी मॅक्कोनेन यांचे वयाच्या ६३व्या आजारामुळे निधन झाले. ते फिनलंडचे नागरिक होते. 
  • मॅक्कोनन यांनी १९८४ साली झालेल्या दूरसंचारविषयक परिषदेमध्ये 'शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस'ची (एसएमएस) संकल्पना मांडली. ३ डिसेंबर १९९२ रोजी जगातील पहिला एसएमएस पाठवला गेला होता. या संकल्पनेचे श्रेय त्यांना दिले जाते.
  • एसएमएसचे जनक म्हणून जगभर ओळखले जात असूनही एसएमएस तंत्रज्ञान विकसित करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी कधीही स्वत:कडे घेतले नाही. 
  • जगभरात आजच्या घडीला दररोज काही ट्रिलियन टेक्स्ट मेसेज पाठवले जातात.

धीरुभाई अंबानींचा पाठ्यपुस्तकात धडा
    Mobile Number Portability
  • रिलायन्स ग्रुपचे संस्थापक कै. धीरुभाई अंबानी यांचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. 
  • उद्योजक बनण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी गुजरात सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • गुजरातमधील शालेय अभ्यासक्रम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी हा  निर्णय घेतला आहे. 
  • गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष नितीन पेठानी यांनी सांगितले, की धीरुभाईंसारख्या उद्योजकाने यशस्वी होण्यासाठी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी त्यांचा धडा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
  • अंबानी यांच्यासोबतच आपल्या कार्याने समाजासाठी योगदान देणाऱ्या इतर महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती देणारा धडाही पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी ३ जुलैपासून
  • ३ जुलैपासून कोणताही क्रमांक कोणत्याही सेवापुरवठादाराकडे हस्तांतरिक करण्यासाठी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे भारतातील मोबाईलधारकांना मोबाईल क्रमांक न बदलता कोणत्याही सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करता येणे शक्य होणार आहे.
  • यापूर्वी एखादा क्रमांक अन्य सेवापुरवठादाराकडे हस्तांतरित करण्यासाठी मर्यादा होत्या. मूळ सेवापुरवठादाराच्या सेवा ज्या परिक्षेत्रात उपलब्ध आहेत तेथेच मोबाईल क्रमांक अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरीत करता येणे शक्य होते. 
  • मात्र, ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार कोणताही ग्राहक कोणत्याही सेवापुरवठादाराकडील कोणताही क्रमांक भारतातील कोणत्याही ठिकाणी अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करू शकेल.
  • पूर्ण नंबर पोर्टेबिलिटी सुरुवातीला ३ मे अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) तांत्रिक बदल करण्यासाठी आणखी काही कालावधीसाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे दूरसंचार विभागाने दोन महिन्याची परवानगी दिली होती.
  • केंद्रीय दूरसंचार मंत्री : रवी शंकर प्रसाद
  • दूरसंचार विभागाचे अध्यक्ष आणि दूरसंचार सचिव : राकेश गर्ग

‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर देशभर बंदी
  • अभिनेता सनी देओल अभिनित ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्लीच्या न्यायालयाने देशभर बंदी लादली आहे. 
  • या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे प्रथमदृष्ट्या दिसत असून, यातील वादग्रस्त संवाद व दृश्ये काढून टाकेपर्यंत ‘मोहल्ला अस्सी’ प्रदर्शित करण्यास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
  • चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल व साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहेत. हिंदीतील प्रसिद्ध लेखक काशीनाथ सिंग यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर लीक झाला आणि हा चित्रपट वादात सापडला आहे.
  • 'मोहल्ला अस्सी' या चित्रपटात भगवान शंकराचं एक पात्र दाखवण्यात आलं आहे. हे पात्र चित्रपटात चुकीच्या पद्धतीनं रंगविण्यात आलं आहे. चित्रपटात शिवीगाळीच्या भाषेचाही वापर करण्यात आला आहे.
  • त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मोठ्या प्रमाणात लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण देशभर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्यात येत आहे.

मूडीजच्या 'इनसाइड इंडिया' या अहवालानुसार भारतीय अर्थचक्राची गती मंद
  • केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणापथाची गती मंदावल्याबाबत 'मूडीज' या जागतिक पतमानांकन संस्थेने चिंता व्यक्त केली आहे.
  • जगभरातील पतमानांकन ठरवणाऱ्या मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने 'इनसाइड इंडिया' या अहवालात, भारताच्या अर्थवृद्धीच्या शक्यतांबाबत एकंदर दृष्टिकोन सकारात्मक असून, त्यामुळे मूडीजने ७.५ टक्के दराने आर्थिक विकास साधला जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगातील प्रगत जी २० राष्ट्रांच्या तुलनेत हा सर्वाधिक विकास दर आहे.
  • भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत बनली असून ती मार्च २०१६ पर्यंत तशीच राहणार आहे. कारण यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रातील अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) हा बँकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
  • मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेमुळे रेल्वे, संरक्षण, विमा यांसारख्या क्षेत्रांत थेट परदेशी गुंतवणुकीला चालना मिळाली असल्याचे 'मूडीज'चे म्हणणे आहे. डिझेल नियंत्रणमुक्त करणे, खाणकामावरील बंदी उठवणे यासारखे निर्णय उद्योगपूरक ठरल्याचे या अहवालात म्हंटले आहे.

नादिया जिल्ह्याला संयुक्त राष्ट्राचा लोकसेवा पुरस्कार
  • २६ जून २०१५ रोजी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्याला संयुक्त राष्ट्राचा लोकसेवा पुरस्कार-२०१५ प्रदान करण्यात आला. नादिया जिल्ह्याला सर्वांसाठी शौचालय या प्रकल्पाच्या यशस्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, सर्वांसाठी शौचालय योजना शौचालयाच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक अप्रतिम मॉडेल आहे. नादिया जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,५६,००० शौचालये बांधली आहेत.
  • जगभरातील लोकांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करण्यासाठी सुरु केलेल्या नवकल्पनांना संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे ‘लोकसेवा पुरस्कार’ देण्यात येतो.
  • हा पुरस्कार प्रभावी लोकशाही सरकारच्या सर्वश्रेष्ठ योजनांना आंतरराष्ट्रीय मंच उपलब्ध करून देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा