चालू घडामोडी - ११ जुलै २०१५


 • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन

पीएसएलव्ही-सी २८ चे यशस्वी प्रक्षेपण

 • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि तिचा व्यापारी विभाग असलेल्या ऍट्रिक्सने ११ जुलै रोजी एकूण १४४० किलो वजनाचे पाच व्यापारी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले. 
 • पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रथमच इतक्या मोठ्या वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. भारताची आतापर्यंतची ही सर्वांत अवजड व्यापारी मोहीम होती. तसेच या वर्षातील ही पहिलीच व्यापारी मोहीम होती. या मोहिमेचा कार्यकाळ ७ वर्षे असेल.
पीएसएलव्ही-एक्सएल
  PSLV C28 successfully launched five UK Satellites
 • उंची : ४४.४ मीटर
 • वजन : ३२० टन 
 • किंमत : १४० कोटी 
 • पीएसएलव्हीची मोहीम : ३०वी 
 • ‘पीएसएलव्ही’चे सुधारित व्हर्जन असलेल्या ‘पीएसएलव्ही-एक्सएल’ (पीएसएलव्ही- सी २८) या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ब्रिटनच्या या पाचही उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडले.
 • ‘पीएसएलव्ही-एक्सएल’ हे चार टप्पे असलेले रॉकेट असून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये वेग मिळविण्याकरत अतिरिक्त सहा मोटर्स बसविण्यात आल्या आहेत.
 • पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात घन इंधनाचा वापर केला असून, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनाचा वापर केला आहे.
सोडण्यात आलेले उपग्रह
 • डीएमसी-३ : ब्रिटनच्या पाच उपग्रहांपैकी हे तीन उपग्रह एकसारखे आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी ४४७ किलो आणि उंची ३ मीटर आहे. पृथ्वीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सोडण्यात आलेले हे तीनही उपग्रह पृथ्वीपासून ६४७ किमी अंतरावर सूर्यकक्षेत सोडले जाणार आहेत. छायाचित्रे काढणे, नैसर्गिक स्रोतांची आणि पर्यावरणाची माहिती घेणे आणि आपत्कालीन स्थितीत माहिती पुरविणे हे या उपग्रहांचे प्रमुख काम असणार आहे.
 • सीबीएनटी-१ : हा उपग्रहही पृथ्वी निरीक्षणासाठी सोडला जाणार असून, त्याचे वजन ९१ किलो आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणारा लघुउपग्रह असून याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे. 
 • डी-आर्बिट सेल : हा नॅनो उपग्रह असून त्याचे वजन फक्त ७ किलो आहे. हा उपग्रहसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणार आहे.
 • डीएमसी-३ आणि सीबीएनटी-१ हे उपग्रह सरे सॅटेलाइट टेक्नॉलॉजीने तयार केले असून, डी-ऑब्रिट सेल हा उपग्रह सरे अवकाश संस्थेने तयार केला आहे.
 • १९९९ पासून इस्त्रोने ४५ परदेशी उपग्रह अंतराळात पाठविले आहेत.

भारत, पाकिस्तानला ‘एससीओ’चे सदस्यत्व

  Shanghai_Cooperation_Organisation_(logo)
 • भारत आणि पाकिस्तानने शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (एससीओ) सहभागी होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली आहे.
 • पश्चिमेकडील देशांच्या आघाडीप्रमाणेच ‘एससीओ’चेही महत्त्व असून, त्यावर रशिया आणि चीनचे अधिपत्य आहे. ‘एससीओ’तील सदस्यत्वामुळे भारताला मध्य आशियातील ऊर्जास्रोतांचा लाभ होणार आहे.
 • आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानाला ‘एससीओ’च्या निरीक्षकांचा दर्जा प्राप्त होता.
 • दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियामध्ये आहेत.
शांघाय सहकार्य परिषद
 • स्थापना : २६ एप्रिल १९९६
 • संस्थापक सदस्य : चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताझिकिस्तान
 • उझबेकिस्तान १५ जून २००१ पासून सदस्य
 • उद्देश : मध्य आशियामध्ये संरक्षणासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे.

ब्रिक्स राष्ट्रांच्या समन्वयासाठी मोदी यांचा १० कलमी कार्यक्रम

  BRICS-and-SCO-summit-in-Ufa
 • ‘ब्रिक्स’ गटातील राष्ट्रांमध्ये अधिक निकटचे सहकार्य आणि समन्वयाच्या आवश्यकतेवर भर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्देशाने ९ जुलै रोजी दहा कलमी कार्यक्रम सुचवला.
 • ‘दस कदम : भविष्यासाठी दहा पावले’ असे याचे वर्णन करून मोदींनी उगवत्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या ‘ब्रिक्स’ गटासाठी नवे उपक्रम सुचवले.
 • भारत या गटासाठी पहिला व्यापार मेळावा भरवेल, तसेच रेल्वे आणि शेती या क्षेत्रांसाठी संशोधन केंद्र स्थापन करेल, असे त्यांनी जाहीर करून त्यांनी या दृष्टीने पहिले पाऊल उचलले.
 • जगातील प्रत्येक देशासमोर असलेली आव्हाने लक्षात घेता, सर्व मोठय़ा देशांमध्ये मतैक्य, सहभाग आणि सहकार्य असणे महत्त्वाचे आहे, असे परिषदेच्या पूर्णवेळ अधिवेशनात बोलताना ते म्हणाले.
 • पंतप्रधानांच्या ‘ब्रिक्स’साठी प्रस्तावित उपक्रमांमध्ये व्यापार मेळावा, रेल्वे संशोधन केंद्र, सर्वोच्च अंकेक्षम संस्थांमध्ये सहकार्य, डिजिटल उपक्रम आणि कृषी संशोधन केंद्र यांचा समावेश आहे. 
 • रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, ब्राझीलचे अध्यक्ष दिल्मा रोसेफ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा व चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग या परिषदेत सहभागी झाले होते.

बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोनवर बंदी

 • भारतीय चित्रपटांप्रमाणेच आता बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोन व कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाका येथील उच्च न्यायालयाने दिला आहे.   
 • बांगलादेशमध्ये भारत व भारतीय उपखंडातील अन्य देशांमधील चित्रपटांच्या आयातींवर बंदी आहे. याच धर्तीवर मोबाईल ऑपरेटरतर्फे दिल्या जाणाऱ्या मुल्यवर्धीत सेवांमध्ये भारतीय व अन्य देशांच्या कॉलरट्यून व रिंगटोनवरही बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका ढाका येथील उच्च न्यायालयात दाखल झाली होती.
 • कोर्टाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ग्राह्य धरत भारतीय गाण्यांचा कॉलरट्यून व रिंगटोन म्हणून समावेश करण्यास ऑपरेटर्सना मज्जाव केला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा फटका बांगलादेशमधील लाखो मोबाईलधारकांना बसणार आहे.

मोदी-शरीफ यांच्यात पाच मुद्यांवर सहमती

 • शांघाय सहकार संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने उफा येथे १० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह अनेक मुद्यांवर चर्चा केली.
 • या बैठकीत दोन्ही देशांच्या विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच पकडण्यात आलेल्या दोन्ही देशांच्या मच्छिमारांची बोटींसह येत्या १५ दिवसांत सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • मोदी शरीफ बैठकीनंतर दोन्ही नेत्यानी एक संयुक्त निवेदन जाहीर केले असून त्यात पाच महत्वाच्या मुद्यांची नोंद करण्यात आली आहे.
 • मुंबई हल्ल्याच्या पाकिस्तानातील खटल्याला वेग देण्याची गरज आहे. भारताने आणखी आवाजाचे नमुने द्यावेत अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात अत्यंत मंद गतीने सुरु आहे. पाकिस्तान सरकारने पुरावे न दिल्यामुळे या हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवीही सोडून देण्यात आले आहे.
 • या बैठकीत झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहण्यास कारणीभूत असलेल्या काश्मीरचा मात्र समावेश नव्हता. यामुळे नवाज शरीफ यांच्यावर पाकिस्तानमधून टीका होत आहे.
मोदींना पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण
 • दक्षिण आशियातील ‘सार्क’ राष्ट्रांची शिखर परिषद पुढील वर्षी २०१६ मध्ये इस्लामाबादमध्ये होते आहे. त्या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांना या परिषदेचे निमंत्रण दिले.
 • हे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून, पुढील वर्षी नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाणार आहेत. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.

भारताची लोकसंख्या १ अब्ज २७ कोटी

 • जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी ११ जुलै रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २७ कोटी ४२ लाख ३९ हजार ७६९ वर पोहचली आहे.
 • लोकसंख्या वाढीचा वेग प्रतिवर्षी १.६ टक्के असून, तो कायम राहिल्यास २०५० पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जनसंख्या स्थिरता कोशाने (एनपीएसएफ) ही माहिती दिली आहे.
 • सध्या चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मात्र, त्या देशाच्या तुलनेत भारताचा लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे २०५० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याची भीती आहे.

बिहार विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आघाडीला १४ जागा

 • बिहार विधानपरिषदेच्या निवडणुकीत २४ पैकी १४ जागा भाजपने जिंकल्या असून महाआघाडी करूनही नितीश कुमार यांच्या पक्षाच्या पदरात केवळ ८ जागा पडल्या आहेत. 
 • स्थानीय स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या २४ जागांसाठी ७ जुलै रोजी मतदान झाले होते. 
 • भाजप, लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढली होती तर भाजपला रोखण्यासाठी नितीश यांच्या जेडीयूने लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडी केली होती. 
 • भाजप आघाडीला १४ जागा मिळाल्या, तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास (जेडीयू) ५, लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलास (राजद) ३, राजद समर्थकाला १ आणि कॉंग्रेसला १ अशा जागा मिळाल्या.
 • निवडणुकीपूर्वी जेडीयूचे ३ सदस्य भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला १ जागा मिळाली आहे.

ओमर शरिफ कालवश

  Omar Sharif
 • हॉलिवूडवर निर्विवाद राज्य करणारे, नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विविधांगी भूमिकांमधून रसिकांच्या मनावर गारूड केलेले ज्येष्ठ अभिनेते ओमर शरिफ (वय ८३) यांचे १० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 • 'डॉक्टर झिवागो', 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' आणि 'मेकॅनोज गोल्ड' या चित्रपटांनी त्यांच्या अभिनयाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा रसिकांच्या मनावर कायमचा उमटवला.
 • मायकेल दिमित्री शालोब असे मूळ नाव असलेल्या ओमर शरिफ यांनी आधी इजिप्शि‌यन चित्रपटांमध्ये स्टारडम मिळवले आणि नंतर हॉलिवूडवर राज्य केले. 
 • 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' चित्रपटातील शरीफ अलीची भूमिका त्यांनी संस्मरणीय केली आणि त्यासाठी त्यांचा ऑस्कर नामांकन आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानही झाला. 
 • त्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच डेव्हिड लीन यांच्या 'डॉ. झिवागो' चित्रपटात त्यातील शीर्षक भूमिका तितक्याच वेगळेपणाने उभी केली आणि पुन्हा गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त केला.
 • १९५४ साली शैतान अल सहरा अर्थात, वाळवंटातील शैतान या अरबी चित्रपटात काम करण्यापासून सुरू केलेला अभिनयाचा प्रवास ओमर यांनी २०१३ सालापर्यंत जारी ठेवला होता.

MT Facts
 • जैवविविधतेने नटलेल्या अरुणाचल प्रदेशामध्ये ‘बॅंडेड टिट’ प्रजातीचे नवे फुलपाखरू आढळून आहे. याआधीही याच भागामध्ये कीटकांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळून आल्या होत्या. 
 • या फुलपाखराची जीवनसाखळी मोठी विचित्रपूर्ण आहे. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये केवळ दोन आठवडेच हे फुलपाखरू जगते. उर्वरित काळ ते कोषावस्थेत किंवा अळीअवस्थेत व्यतीत करते. 
 • बंगळूरमधील ‘नॅशनल सेंटर फॉर बॉयोलॉजिकल सायन्सेस’मध्ये कार्यरत असलेले संशोधक कृष्णमेघ कुंटे यांनी आपल्या शोधप्रबंधामध्ये सर्वप्रथम ‘बॅंडेड टिट’ या फुलपाखराचे अस्तित्व मांडले होते; पण अरुणाचल प्रदेशात हे फुलपाखरू सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा