चालू घडामोडी - १४ जुलै २०१५


महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात

    Maharashtra Legislature
  • महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १४ जुलैपासून सुरवात झाली असून, पहिल्याच दिवशी सुमारे १४ हजार ७९३ कोटींच्या पुरवण्या मागण्या विधानसभेत पटलावर मांडल्या गेल्या.
  • या मागण्यांवर २० व २१ जुलै रोजी चर्चा व मतदान होणार आहे. यातील ५९६२ कोटी इतक्या मागण्यांचा भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे, तर बाकीचा निधी केंद्राचे अनुदान, अर्थसंकल्पातील तरतुदी यातून खर्च करणे प्रस्तावित आहे.
  • विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. गेली १५ वर्षे सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायरीवर ठाण मांडत निदर्शने करीत होते. 
  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीबरोबरच, भाजपचे मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबन लोणीकर यांच्या राजीनाम्याची व या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही त्यांनी जोरकसपणे केली.
  • पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे विधिमंडळ कामकाज राज्यमंत्रिपदाचा कार्यभार दिला आहे. मंत्री गिरीश बापट आजारी असल्याने या मंत्रिपदाचा कार्यभार उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे दिला होता. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत या विभागाला राज्यमंत्रिपद नव्हते.
विधिमंडळ प्रमुख
विधानसभाविधानपरिषद
अध्यक्षहरिभाऊ बागडे
(भाजप)
रामराजे नाईक निंबाळकर
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
उपाध्यक्षअजून निवड झालेली नाही.वसंत डावखरे
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
विरोधी पक्षनेतेराधाकृष्ण विखे पाटील
(कॉंग्रेस)
धनंजय मुंडे
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)

‘एचआयव्ही’वरील औषधांना उत्पादन शुल्कात सूट

  • एड्‌स झालेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या औषधांना उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा निर्णय १४ जुलै २०१५ रोजी केंद्र सरकारने घेतला. राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले असून, त्यामुळे एड्‌सच्या रुग्णांना ही औषधे कमी दरात उपलब्ध होऊ शकतील.
  • ह्यूमन इम्युनो डिफिसिएन्सी व्हायरसचा (एचआयव्ही) प्रतिकार करण्यासाठी मुख्यतः वापरण्यात येणाऱ्या औषधांना ही सूट मिळणार असून, ती ३१ मार्चअखेरपर्यंत लागू असेल.
  • ‘एचआयव्ही’ची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • या औषधांच्या यादीत झीडोउडीन ३०० एमजी, लॅमीउडीन ३०० एमजी, नेव्हिरॅपीन २०० एमजी यांसह इतरही काही औषधांचा समावेश आहे. त्याबरोबर ‘एचआयव्ही’चे निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यावरही (किट) उत्पादन शुल्कातून सूट देण्यात येणार आहे. 
  • ‘एचआयव्ही’च्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे. कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याच्या कारणामुळे सुरवातीला हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. 
  • भारतात ‘एचआयव्ही’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी सुमारे दहा टक्के रुग्णांना ‘एचआयव्ही’चा प्रतिकार करण्यासाठी त्याविरोधातील औषधांची त्वरित आवश्यकता आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिकमध्ये सुरवात

    Nashik Kumbh Mela 2015
  • सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंख १४ जुलै रोजी पहाटे ६ वाजून १६ मिनिटांनी धर्मध्वजारोहणाने फुंकला गेल्यानंतर कुंभमेळ्याला सुरवात झाली.
  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कुंभमेळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
  • नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त साधू-महंत व भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. रामकुंड व कुशावर्तावर पवित्र स्नानाला सुरवात झाली आहे. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून सर्व सोई-सुविधी पुरविण्यात आल्या असून, पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
  • कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या सिंहस्थ धर्मध्वज शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने अवघी कुंभनगरी दुमदुमून निघाली होती. दीड किलोमीटर दूर शोभायात्रेने डोळ्यांचे पारणे फेडले. या शोभायात्रेने जगाला सामाजिक एकतेचा संदेश दिला.
  • गंगा-गोदावरी मंदिर : नाशिकला रामकुंडावर श्री गंगा-गोदावरी मंदिर आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर फक्त सिंहस्थाच्या १३ महिन्यांच्या कालावधीतच उघडले जाते. उर्वरित ११ वर्षे ते बंद असते. ध्वजारोहणानंतर त्याचे कुलूप उघडण्यात येईल.

भारत व ताजिकिस्तानचा दहशतवादविरोधी लढाईतील परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्धार

  • भारत व ताजिकिस्तानने दहशतवादविरोधी लढाईतील परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्धार १३ जुलै रोजी केला.
  • मोदी आणि ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमामअली रहमान यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांत व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याखेरीज लष्करी संबंध बळकट करण्याबाबतही सहमती झाली.
  • सहा देशांच्या आठदिवसीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमामअली रहमान यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांनी विविध क्षेत्रांत संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केला. 
  • उभय देशांनी संस्कृती आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दोन करार केले. मोदी आणि रहमान यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले.
 

विम्बल्डन २०१५ पेस-हिंगीस विजयी

    Leander Paes of India and Martina Hingis of Switzerlan claimed Wimbeldon 2015 Mixed Doubles
  • लिएंडर पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस हिच्या समवेत मिश्र दुहेरीत ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर पेया व हंगेरीच्या टिमिया बाबोस या जोडीवर ६-१, ६-१ असा सहज विजय मिळवीत विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
  • पेसचा हा आठवा मिश्र दुहेरीचा किताब असून, त्याने हिंगीससमवेत दुसरा किताब जिंकला आहे.
  • हिंगीसने सानिया मिर्झा हिच्यासमवेत महिला दुहेरीचा किताबही नावावर केला आहे. हिंगीसचा हा १८ वा ग्रँडस्लॅम किताब असून, मिश्र दुहेरीतील हा तिसरा चषक तिने नावावर केला आहे.
लिएंडर पेसचे दुहेरीतील ग्रँडस्लॅम
स्पर्धामिश्र दुहेरीदुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन२००३, २०१०, २०१५२०१२
विम्बल्डन१९९९, २००३, २०१०, २०१५१९९९
यूएस ओपन२००८२००६, २००९, २०१३
फ्रेंच ओपन-१९९९, २००१, २००९

मलाला युसुफझाईने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासित मुलींसाठी शाळा सुरू केली

  • नोबेल पुरस्कार मिळवणारी जगातील सर्वांत लहान वयाची व्यक्ती ठरलेल्या मलाला युसुफझाई हिने आपला अठरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. हा वाढदिवस तिने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासितांबरोबर साजरा करत तेथील मुलींसाठी शाळा सुरू केली आहे.
  • द मलाला फंड या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शाळा सीरियाच्या सीमेनजीक असलेल्या लेबनॉनमधील निर्वासितांच्या छावणीत सुरू झाली आहे. या शाळेचा सर्व खर्च मलालानेच सुरू केलेली ‘द मलाला फंड’ उचलणार आहे. या शाळेमध्ये १४ ते १८ या वयोगटातील दोनशे मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.
  • मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविल्यामुळेच तालिबानने मलालावर २०१२ मध्ये हल्ला केला होता. त्या हल्ल्यातून वाचलेल्या मलालाने मुलींच्या शिक्षणासाठी अधिक जोमाने पुढाकार घेतला आहे.
 

इराकमध्ये गेल्या १६ महिन्यांमध्ये १५ हजार नागरिकांची हत्या

  • इराकमध्ये गेल्या १६ महिन्यांमध्ये १५ हजार नागरिकांची हत्या व ३० हजार नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने १३ जुलै २०१५ रोजी एका अहवालाद्वारे प्रसिद्ध केली आहे. 
  • दहशतवादी हल्ल्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. मृतांमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. ३० एप्रिलपर्यंत १५ हजार सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. 
  • इराकमध्ये दहशतवादी संघटनांनी विविध ठिकाणी हल्ले केले आहेत. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शिवाय, नागरिकांची हत्या व हल्लाद्वारे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही मोठी आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी हे थांबविण्याची मागणी केली आहे.

‘ऑनलाइन टॅक्स रिटर्न प्रक्रिया’ अधिक सुलभ

  • कराविषयक माहिती देणारे इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे बंगळूरला पाठविण्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने १३ जुलै रोजी इ-फायलिंग प्रणालीचे उद्घाटन केल आहे. 
  • या प्रणालीद्वारे पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना तसेच प्राप्तीकर विभागाकडून परताव्याचा कोणताही दावा न करणाऱ्या करदात्यांना बंगळूरला कागदपत्रे न पाठविता केवळ ऑनलाईन रिटर्न भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून ‘ऑनलाइन टॅक्स रिटर्न प्रक्रिया’ अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
  • या नव्या प्रणालीमुळे बंगळूर येथील आयटी सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला (सीपीसी) पेपर ऍक्नॉलेज्मेंट (पोच पावती) पाठवण्याची गरज भासणार नाही. शिवाय दिलेल्या इतर पर्यायाद्वारे म्हणजे ज्यांच्याकडे इंटरनेट बॅंकिंग असेल असे करदाते आयटीआरचे ‘इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन’ करू शकणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांसाठी बंदी

    Gurunath Meiyappan and Raj Kundra
  • इंडियन प्रिमीअर लीगच्या सहाव्या सत्रातील भ्रष्टाचार व स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
  • या दोन संघांबरोबरच बेटिंगमध्ये अडकलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचा गुरूनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा या दोघांवर कुठल्याही प्रकारे बीसीसीआयशी संबंधित क्रिकेटमध्ये सहभागी होण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील  त्रिसदस्यीय समितीने १४ जुलै रोजी हा ‘आयपीएल’वर शिस्तभंगाची कारवाई करणारा आत्तापर्यंतचा सगळ्यात कठोर निर्णय सुनावला.
  • बीसीसीआयने क्रिकेटचे पावित्र्य अबाधित रहावे, समाजकंटकांपासून खेळ सुरक्षित रहावा यासाठी सगळ्या प्रकारच्या शिस्तीला महत्त्व द्यावे असे बीसीसीआयचे कानही न्यायाधीश लोढा यांनी टोचले आहेत.

देशातील सर्वात लांब बोगदा काश्मीरमध्ये

  • उधमपूरपासून ४० किलोमीटर अंतरावरील नाथा टॉप या कणखर दगडी डोंगराच्या पोटात अकराशे मीटर खोल असलेल्या ९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याची साडेचार किलोमीटरची दोन टोके मधोमध सांधणारा अखेरचा सुरुंग स्फोट १३ जुलै २०१५ रोजी दुपारी करण्यात आला.
  • देशातीलच नव्हे, तर दक्षिण पूर्व आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे जम्मू ते श्रीनगर हे २९३ कि.मी.चे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. मार्च महिन्यात याचे लोकार्पण होईल. 
  • आणखी १४ किलोमीटरचा नियोजित जोजीला बोगदा पूर्ण झाल्यास हे अंतर तब्बल ९० कि.मी.ने कमी होईल.

चीनचा महासंगणक लागोपाठ पाचव्यांदा पहिल्या क्रमांकावर

  • चीनचा 'तिआनहे -२' हा महासंगणक लागोपाठ पाचव्यांदा जगातील सर्वात वेगवान संगणक ठरला आहे. फ्रँकफर्ट येथे घेण्यात आलेल्या सुपरकॉम्प्युटिंग विषयावरील परिषदेच्या वेळी या महासंगणकाने २०१३ पासून पाचव्यांदा जगातील वेगवान महासंगणक म्हणून मान मिळवल्याचे सांगण्यात आले.
  • चांगसा येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी या संस्थेने हा महासंगणक तयार केला आहे. २०१३ मध्ये हा महासंगणक ग्वांगझाऊ येथील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर येथे हलवण्यात आला आहे.
नवीन महासंगणकाची निर्मिती
  • आतापर्यंत या महासंगणकाने वेगात बाजी मारली असून चीनमध्ये व परदेशात त्याचे ४०० ग्राहक आहेत. 
  • जनुक विश्लेषण, जनुकीय औषध निर्मिती, उच्च गती रेल्वे यांच्या कामात त्याचा वापर केला जातो. चीनच्या डॉनिंग इनफॉर्मेशन इंडस्ट्री या कंपनीने नवीन महासंगणक तयार करण्याचे काम हाती घेतले असून तो लाखो महापद्म गणने सेकंदाला करू शकेल.

MT Facts
  • २०१५चा अमेरिका सुंदरीचा मुकुट ओक्लाहोमाच्या ऑलिव्हिया जॉर्डन हिने पटकावला. तिने ५० प्रतिस्पर्धी सौंदर्यवतींवर मात केली.
  • ल्युसियानातील बॅटन रुझ सिव्हिक सेंटर येथे १२ जुलै २०१५ रोजी हा सोहळा झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा