चालू घडामोडी - ८ जुलै २०१५


मनरेगा हा जगातील सर्वात मोठा लोकनिर्माण कार्यक्रम
    MGNREGA_Logo
  • जागतिक बॅंकेच्या ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या 'द स्टेट ऑफ सोशल सेफ्टी नेट्स २०१५' या अहवालात भारतातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेला ‘रोजगार हमी योजना कार्यक्रम’ (मनरेगा) हा जगातील सर्वात मोठा लोकनिर्माण कार्यक्रम आहे, अशी स्तुती जागतिक बॅंकेने केली आहे.
  • हा कार्यक्रम देशातील जवळजवळ १५ टक्के लोकांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करीत असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
  • जगात सर्वात मोठा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम राबविणाऱ्या पाच देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे. भारत, चीन, दक्षिण अफ्रीका आणि इथोपीया या देशांचा यामध्ये समावेश आहे.
  • पाच देशात सुरु असलेल्या या कार्यक्रमांतर्गत ५२.६ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून केवळ 'मनरेगा' अंतर्गत १५ टक्के (१८.२ कोटी) लोकांना याचा लाभ मिळत असल्याने 'मनरेगा' अव्वल स्थानावर असल्याचे अहवालात म्हटले आहे. 
  • भारतातील शाळात राबविण्यात येत असलेला 'मध्यान्ह भोजन कार्यक्रम' हा शाळात राबविण्यात येत असलेला सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचेही जागतिक बॅंकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

भारत आणि बांगलादेशचे नागरिकत्व निवड सर्वेक्षण
  • भारत आणि बांगलादेश यांनी ऐतिहासिक भूसीमा करारांतर्गत एकमेकांच्या सीमाक्षेत्रातील १६२ वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ५१ हजार ५८४ लोकांच्या राष्ट्रीयत्वाची निवड नोंदविण्यासाठी एक संयुक्त सर्वेक्षण सुरू केले आहे. ३१ जुलैपूर्वी हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. 
  • ५० पथकांनी बांगलादेशमधील १११ भारतीय वस्त्यांची आणि २५ पथकांनी भारतात ५१ अशाच वस्त्यांच्या सर्वेक्षणास सुरवात केली. या पथकांमार्फत २३ जुलैपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. 
  • दोन्ही देशांनी ४१ वर्षे जुन्या भूसीमा वादावर नुकताच तोडगा काढला होता. 
  • प्रत्येक पथकात दोन्ही देशांच्या पाच व्यक्ती आहेत आणि त्यांच्याद्वारे वस्त्यांमधील लोकांना त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पसंती विचारली जाईल. त्यानंतर भारत आणि बांगलादेशचे संयुक्त शिष्टमंडळ सर्वेक्षणाला अंतिम रूप देईल. 
  • ३१ जुलैपर्यंत या अहवालाला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि लोकांच्या पसंतीनुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल.
  • अधिक माहिती : भारत आणि बांगलादेश ऐतिहासिक भूसीमा करार

रेल्वेचा ५० हजारावा डबा सेवेत
  • केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ७ जुलै २०१५ रोजी रेल्वेच्या ५० हजाराव्या डब्याचे लोकार्पण केले. सार्वजनिक वाहतुकीतील हा एक इतिहास असून आता एक लाखाव्या डब्याची निर्मिती करण्यासाठी आपण वेगळा विचार करण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली. 
  • चेन्नईतील रेल्वेचे डबे बनविण्याच्या कारखान्यात ठेवलेल्या या थ्री टीयर एसी डब्याचे प्रभू यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळ दाबून लोकार्पण केले. 
  • हा डबा गुणवत्तेच्या कसोटीवर सर्वोत्तम आहेच; पण त्याचबरोबर अंतर्गत सजावट, वेग, इंधनक्षमता, कमी आवाज आदी वैशिष्ट्यांनीही परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. चेन्नईतील या कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी पाच लाखाच्या बक्षिसाचीही घोषणा त्यांनी केली. 
  • चेन्नईतील हा रेल्वे डबा बनविण्याचा कारखाना १९५५ मध्ये सुरू करण्यात आला होता, तेव्हापासून अव्याहतपणे येथून दरवर्षी सुमारे दीड हजार डबे तयार होत आहेत. 
सौरऊर्जेवर धावणार रेल्वे 
  • मंत्रालय सध्या पूर्णपणे सौरऊर्जेवर धावणारी रेल्वे बनविण्याच्या प्रयत्नात असल्याचे प्रभू यांनी सांगितले. सध्या रेवाडी-सीतापूर पॅसेंजरवर सोलर पॅनेल (सौर घट) बसविण्यात आले असून भविष्यात पर्यावरण सुरक्षेचा विचार करता सीएनजीवर धावणारी रेल्वे तयार करण्याचाही मंत्रालयाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्तीचे निधन
  • जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असलेले जपानमधील साकारी मोमोई (वय ११२) यांचे ५ जुलैच्या मध्यरात्री निधन झाले.
  • उत्तर टोकियोमधील सईतामा शहरात साकारी मोमोई राहत होते. राईट बंधुंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी साकारी यांचा जन्म झाला होता. 
  • साकारी यांना गेल्या वर्षी जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेल्या वर्षी त्यांची नोंद झाली होती आणि त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले होते. ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

मॅगीची पाकिटे नष्ट करण्यासाठी ‘अंबूजा सिमेंट’ची मदत
  • अन्न व औषध प्रशासनाने मॅगी नूडल्सवर बंदी आणल्यानंतर ‘नेस्ले इंडिया’ने मॅगी नूडल्सची पाकिटे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पाकिटे नष्ट करण्यासाठी ‘अंबूजा सिमेंट’ची मदत घेण्यात येणार असून त्यासाठी त्यांना २० कोटी रुपये दिले आहेत. 
  • मॅगीमध्ये चवीसाठी मोनोसोडियम ग्लुटामेटचा मर्यादबाहेर समावेश केल्याने केंद्रीय अन्न व सुरक्षा नियामक मंडळाने (एफएसएसएआय) मॅगीवर बंदी आणली होती. त्यामुळे ‘नेस्ले इंडिया’च्या नऊ प्रकारच्या नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती. तसेच बाजारातील नूडल्स परत मागविण्यात आल्या होत्या. 
  • ‘नेस्ले इंडिया’ने या नूडल्स नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारातील तब्बल ३२० कोटी रुपयांच्या नूडल्स परत मागविण्यात आल्या आहेत. ‘अंबुजा’च्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सिमेंट प्रकल्पात या नूडल्सची पाकिटे जाळण्यात येणार आहेत.

सप्टेंबरपर्यंत फ्लिपकार्टचे संकेतस्थळ पूर्णत: बंद केले जाणार 
    Flipkart
  • ऑनलाईन खरेदी विश्वामधील भारतातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ने लवकरच आपले संकेतस्थळ बंद करुन केवळ ‘मोबाईल ऍप्लिकेशन’द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या नव्या धोरणानुसार, येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत फ्लिपकार्टचे संकेतस्थळ पूर्णत: बंद केले जाणार आहे. 
  • स्मार्ट फोन व मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे भारतामध्ये ऍप्सच्या माध्यमामधून आवश्‍यक वस्तुंची खरेदी करण्याकडे कल वाढतो आहे. 
  • फ्लिपकार्टच्या या ऍपमध्ये ग्राहकाचे स्थान, प्राधान्य आणि खरेदीचे प्रकार ध्यानी घेऊन त्यानुसार प्रयोगात्मक बदल करण्याची सोयही ‘ई-टेलर्स’ना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. संकेतस्थळाच्या व्यवस्थेमुळे सध्या अशा प्रकारच्या प्रयोगांवर मर्यादा येत आहेत. 
  • ‘भारतामध्ये मोबाईल फोन्सच्या वापरामध्ये प्रचंड वाढ होते आहे. फ्लिपकार्ट कंपनीकडे येणारे सुमारे ७५ टक्केग्राहक याआधीच ऍप्सच्या माध्यमामधून येत आहेत.

डॉ. चंद्र भानू सत्पथी अमेरिकेच्या ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये
  • साईचे निस्सीम भक्त असलेले आध्यात्मिक विचारवंत डॉ. चंद्र भानू सत्पथी यांनी अमेरिकेच्या ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ या लोकप्रतिनिधी सभागृहात साईबाबांचे सर्वधर्मसमभाव आणि मानवतेचे महत्त्व पटवून दिले.
  • बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यानंतर अमेरिकेच्या ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये धार्मिक विचार व्यक्त करण्याचा सन्मान मिळविणारी दुसरी व्यक्ती डॉ. सत्पथी ठरली आहे.
  • वॉशिंग्टनमधील अमेरिकी कॉंग्रेसच्या अधिवेशनात ‘अतिथी गुरू’ म्हणून त्यांना २४ जून रोजी विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले होते.
  • अधिवेशनाच्या सुरवातीलाच डॉ. सत्पथी यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर डॉ. सत्पथी यांनी भारतातील एकात्मता आणि अखंडतेचे उदाहरण देत, द्वेषभावना, हिंसेला दूर लोटून पवित्र विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. ‘सबका मालिक एक है’ असा साईनामाचा गजरही त्यांनी केला.
डॉ. चंद्र भानू सत्पथी यांच्याबद्दल
  • उत्तर प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक म्हणून डॉ. सत्पथी २००८ मध्ये निवृत्त झाले. सध्या ते मुरादाबाद शहरामध्ये ‘शिर्डी साई पब्लिक स्कूल’ आणि ‘साई अस्पताल प्रबंध कमिटी’द्वारे समाजसेवा करत आहेत. 
  • सांगितीक क्षेत्रामध्येही त्यांनी नावलौकिक मिळविला असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय मूल्य रुजविण्याचाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.
  • डॉ. सत्पथी यांनी साईबाबांच्या विचार आणि कार्याची प्रेरणा घेऊन सर्वधर्मीयांसाठी देशभर कार्य उभारले आहे. विशेषतः गरीब रुग्ण, विद्यार्थी, निराधार वृद्धांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. 
  • समाजसेवा करतानाच देश-परदेशामध्ये साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसाराचे कामही ते करत आहेत.

रेल्वेची स्थानक जवळ आल्याचा संदेश पाठविण्याची सुविधा
  • मुंबई राजधानीने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे स्थानक आल्याचा संदेश पाठविण्याची सुविधा रेल्वे ८ जुलैपासून सुरू करत आहे. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रात्री अकरा ते सकाळी सहाच्या दरम्यान या सुविधेचा लाभ मिळेल. 
  • प्रवाशांना त्यांच्या मुक्कामाचे ठिकाण येण्याआधीच कळविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही योजना रात्रीच्या वेळी धावणाऱ्या अन्य रेल्वे गाड्यांसाठीही सुरू करण्यात येणार आहे. 
  • ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा एक भाग म्हणून पेपरलेस तिकिटे काढता यावीत यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे लवकरच एक मोबाईल ऍप्लिकेशनही सुरू करण्यात येणार आहे, या सर्व योजनांचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.

वर्ल्ड हॉकी लीग
  • भारतीय महिला हॉकी संघाने विश्व हॉकी लीग सेमीफायनल्सच्या पाचव्या स्थानासाठी झालेल्या प्लेऑफ लढतीत जपानवर १-० अशी मात केली. त्यामुळे भारताच्या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.
  • भारतीय महिलांची ही ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची ३६ वर्षानंतरची पहिलीच वेळ असेल. याआधी, १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला खेळल्या होत्या.
  • ख्रिस सिरिएल्लोने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान बेल्जियमवर १-०ने मात करून विश्व हॉकी लीग उपांत्य फेरीचे विजेतेपद मिळवले. महिला गटात हॉलंडने कोरियावर २-१ने मात करून विजेतेपद मिळवले.

छातीवर चेंडू आदळल्याने क्रिकेटरचा मृत्यू
  • छातीवर वेगवान चेंडू आदळल्याने बावलान पद्मनाभन या २४ वर्षीय ब्रिटिश तमिळ युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश तमिळ क्रिकेट लीगमधील सामन्यादरम्यान ही दुर्घटना घडली. 
  • 'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी, ५ जुलै रोजी ही घटना घडली. 
  • एमपी स्पोर्ट्स क्लबकडून डिविजन थ्रीचा सामना खेळत असतानाच पद्मनाभन याच्या छातीवर चेंडू आदळला. याबाबत तातडीने साउथ ईस्ट कोस्ट अॅम्ब्युलन्स सर्व्हिसला कळवण्यात आले. 
  • त्यानंतर दोन अॅम्बुलन्स, दोन कार आणि एक एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. प्रथम मैदानातच पद्मनाभनवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती फारच चिंताजनक असल्याने त्याला तिथून किंगस्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.

योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव यांची जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
  • लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारा योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव यांची जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
  • लास व्हेगास येथे सप्टेंबर महिन्यात (७ ते १२) ही जागतिक स्पर्धा होणार आहे. आता जागतिक स्पर्धेतून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना पात्र होण्याची संधी असेल. 
  • ६५ किलो वजनी गटात योगेश्वरने अमितकुमारला पराभूत केले होते. तर महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने परवीन राणाला ६-५ असे नमविले होते.

 MT Facts
  • अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झालेली ११ राज्ये : छत्तीसगड, हरियाना, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदिगढ हा केंद्रशासित प्रदेश
  • उर्वरित राज्यांना अंमलबजावणीसाठी ३० सप्टेंबर ही शेवटची दिनांक. (याआधी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे)
  • केंद्रीय अन्नमंत्री : रामविलास पासवान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा