चालू घडामोडी - ९ जुलै २०१५


ब्रिक्स बँकेत भारताचे १८ अब्ज डॉलर
  BRICS Bank
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचे वर्चस्व झुगारून निर्माण करण्यात येणाऱ्या ब्रिक्स बँकेच्या १०० अब्ज डॉलरच्या राखीव निधीमध्ये भारत १८ अब्ज डॉलरचे योगदान देणार आहे.
 • एकमेकांना आर्थिक मदत आणि डॉलर रोखतेचे संकट निर्माण झाल्यास या राखीव निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच के. व्ही. कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
 • ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या गटाने ब्रिक्स बँकेची निर्मिती केली आहे. 
 • बँकेसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या एकूण राखीव निधीपैकी सर्वांत मोठा हिस्सा अर्थात ४१ अब्ज डॉलरचे योगदान एकट्या चीनचे आहे. त्यानंतर भारत, रशिया आणि ब्राझीलचे प्रत्येकी १८ अब्ज डॉलर आणि दक्षिण आफ्रिका ५ अब्ज डॉलरची रक्कम देणार आहे. 
 • ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्यवर्ती बँकांनी मॉस्कोमध्ये या विषयीच्या करारावर सात जुलै रोजी स्वाक्षरी केली. त्यानुसार प्रत्येक देश राखीव निधीमध्ये योगदान देणार आहे. 
 • सदस्य देशांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्यास या राखीव निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.
 • ब्रिक्समधील सदस्य देशांशी अशाप्रकारचा राखीव निधी उभारावा, असा ठराव १५ जुलै २०१४ रोजी फोर्तलेझा (ब्राझील) येथे झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता.

इंदरजितला सुवर्णपदक
  Indrajit Singh
 • भारताचा गोळाफेकपटू इंदरजितसिंगने ग्वाँझू (कोरिया) येथे सुरु असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. इंदरजितने आपल्या शेवटच्या प्रयत्नात २०.२७ मीटर अशी कामगिरी नोंदवली. या अखेरच्या प्रयत्नानेच त्याला सुवर्णयश मिळवून दिले.
 • त्याला २०१३मध्ये रशियात झालेल्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 
 • हरियाणाचा इंदरजित सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने यंदाच्या मोसमातील पाचही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवली आहेत. 
 • चीनमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने २०.४१ मीटर अशी कामगिरी नोंदवून सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर एशियन ग्रां. प्री.च्या तिन्ही टप्प्यात सुवर्णपदक मिळवले होते.
 • तसेच, नेमबाजीत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पुरुष संघाने ब्राँझपदकाची कमाई केली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिकमध्ये अचल प्रतापसिंग ग्रेवाल, अमरेंदर पालसिंग चौहान आणि अक्षय जैन या त्रिकुटाने ब्राँझपदक मिळवले. रशियाच्या त्रिकुटाने सुवर्ण, तर कोरियाच्या संघाने रौप्यपदक मिळवले.
 • या बरोबरच भारताच्या खात्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझपदके जमा झाली आहेत.

जमीन गैरव्यवहारात ‘आप’ आमदार मनोज कुमार अटकेत
 • जमीन खरेदी करताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी चौकशीसाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार मनोज कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ९ जुलै रोजी अटक केली.
 • मनोज कुमार हे कोंडली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून जमीन खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 • दिल्लीतील कोंडली भागात एका २६ वर्षीय युवकाला मारहाण केल्याचा गुन्हाही मनोज कुमार यांच्याविरुद्ध दाखल आहे.

वेश्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारचा प्रकल्प
 • देहविक्रीचा व्यवसाय सोडून स्त्रियांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. 
 • ‘मुक्ती आलो’ (स्वातंत्र्याचा प्रकाश) या नावाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 
 • या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तस्करीद्वारे आणलेल्या ५० महिलांना ग्राइंडिंग आणि ब्लॉक प्रिंटिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
 • त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षणाची कल्पना समोर आली आहे. देहविक्रय करणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना हा व्यवसाय सोडून नवा व्यवसायाद्वारे सन्मानजनक जीवन जगण्याची इच्छा आहे. त्यांना तशी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • नऊ महिन्यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थी महिलांना विनामूल्य निवास आणि भोजनासह दरमहा २५०० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणानंतर बचतगटाच्या माध्यमातून स्वत:चा स्वतंत्र छोटा व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ हजार रुपयांचे भांडवलही देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ उर्दु शायर बशर नवाज यांचे निधन
 • जागतिक दर्जाचे ज्येष्ठ उर्दु शायर बशर नवाज (वय ८०) यांचे ९ जुलै रोजी निधन झाले. 
 • जागतिक ख्यातीचे शायर बशर नवाज यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबादेत झाला. १९५४ पासून त्यांनी गझल लेखणास सुरवात केली. याच काळात औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय उर्दु मुशायऱ्यामध्ये त्यांनी आपली पहिली गझल सादर केली.
 • दिल्लीहुन प्रकाशित होणाऱ्या एका वाडःमयीन नियतकालीकात त्यांची पहिली गझल प्रकाशित होऊन तिला वर्षातील सर्वोत्कृष्ट गझलेचा सन्मान मिळाला. 
साहित्य संपदा
 • १९७१ : रायगॉं गझलसंग्रह
 • १९७३ : नया अदब नये मसाईल (समीक्षकपर लेखांचे पुस्तक)
 • १९९८ : अजनबी समंदर (गझलसंग्रह)
 • २००८ : करोगे याद तो (गझलसंग्रह) 
 • बशर नवाज यांनी बाजार, लोरी, जाने वफा, तेरे शहर मे या हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखनही केले आहे. 
 • दुरदर्शनवरुन प्रसारित झालेल्या अमिर खुसरो या मालिकेच्या तेरा भागांचे लेखन तसेच आकाशवाणी आणि दुरदर्शनवरुन प्रसारित झालेल्या अनेक कार्यक्रमांचे लेखन ही त्यांनी केलेले आहे. 
 • इंग्रजी, मराठी, पंजाबी, कन्नड, आदी भाषांमध्ये त्यांच्या गझलांचे अनुवाद झालेले आहे.
 • बशर नवाज यांनी उर्दु साहित्याला आणि गजलेला नवीन ओळख निर्माण करुन दिली. त्यांची गझल जशी समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरली. तशीत ती जगभरातील साहित्यरसिकांच्या देखील पसंतीस उतरली. 

अझीम प्रेमजींकडून ५३,२८४ कोटींची संपत्ती दान
  Azim Premji
 • आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी विप्रो सॉफ्टवेअर कंपनीतील आणखी १८ टक्के शेअर्स समाजसेवी संस्थेच्या नावावर केले आहे. अशाप्रकारे त्यांनी आता एकूण ३९ टक्के शेअर्स समाजसेवी संस्थेच्या नावे केले आहेत. या शेअर्सचे सध्याचे एकूण बाजार मूल्य ५३ हजार २८४ कोटी रुपये आहे.
 • प्रेमजी यांच्या निर्णयामुळे अझीम प्रेमजी ट्रस्टला आता संपत्ती दान केल्याने या माध्यमातून यावर्षी ५३० कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
 • वॉरेन बफे व मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आयोजित केलेल्या गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी करणारे भारतातील विप्रोचे अझीम प्रेमजी पहिले भारतीय आहेत. या मोहिमेद्वारे आता जगभरातील श्रीमंत व्यक्तींनी स्वत:च्या संपत्तीमधील काही हिस्सेदारी समाजासाठी दान केरण्याचे आवाहन केले होते.
 • विप्रो ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.

किंगफिशरची मालकी डच समूहाकडे
  kingfisher-heineken
 • ‘मद्यसमाट’ विजय मल्ल्यांच्या प्रसिद्ध बिअर ब्रँड ‘किंगफिशर’ची मालकी आता ‘हाइंकेन’ या इंटरनॅशनल डच समूहाच्या हाती आली आहे. 
 • विजय मल्ल्या अध्यक्ष असलेल्या युनायटेड ब्रेव्हरिज समूहात हाइंकेन कंपनीची ३९ टक्के हिस्सेदारी होती. कंपनीने आता यूबी समूहातील युनायटेड स्पिरिट्स या कंपनीतील ३.२१ टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. या शेअर्ससाठी कंपनीने तब्बत ८७२ कोटी मोजले आहेत. 
 • या उलाढालीबरोबच कंपनीचा यूबी समूहातील हिस्सेदारीचा टक्का ४२.१ टक्क्यांवर गेला असून ही कंपनी यूबी समूहातील सर्वात मोठी हिस्सेदार बनली आहे. 
 • सर्वाधिक हिस्सेदारीमुळे हाइंकेन कंपनीचं किंगफिशर बिअर व अन्य मद्यपेयांचं उत्पादन करणाऱ्या यूबी समूहावरचं नियंत्रण वाढलं असलं तरी तूर्त मल्ल्या यांच्या स्थानाला कोणताही धक्का बसणार नाही. ३७.५ टक्के शेअर्सची मालकी असलेल्या मल्ल्या यांचं यूबी समूहात समभागधारक म्हणून वर्चस्व कायम राहणार आहे.

MT Facts
 • फिफा रँकिंगमध्ये भारतीय संघ १५६व्या क्रमांकावर घसरला आहे. कोपा अमेरिका स्पर्धेतील उपविजेता संघ अर्जेंटिना अव्वल क्रमांकावर आहे.
 • त्यांच्यानंतर जर्मनी व बेल्जियम हे संघ आहेत. स्पेन संघ दोन क्रमांकानी घसरुन टॉप टेनच्या बाहेर १२व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा