चालू घडामोडी - १९ व २० ऑगस्ट २०१५


अश्वनी लोहानी 'एअर इंडिया'चे नवे अध्यक्ष

  Mr Ashwini Lohani
 • 'एअर इंडिया'चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 'इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स'चे (आयआरएसएमई) अधिकारी अश्वनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. 
 • एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या अध्यक्षपदी सध्या असलेले रोहित नंदन यांचा विस्तारित कार्यकाळ आज, २१ ऑगस्ट रोजी संपतो आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लोहानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या नियुक्तीचे आदेश जारी केले.
 • 'आयआरएसएमई'च्या १९८०च्या बॅचचे अधिकारी असलेले लोहानी सध्या मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून भोपाळ येथे कार्यरत आहेत.
 • 'एअर इंडिया'चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन उत्तर प्रदेश केडरचे १९८२च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता; मात्र त्या वेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
 • कठीण काळातून कंपनीला वर काढून जागतिक दर्जाच्या स्टार अलायन्स या गटात सहभागी होण्यापर्यंतची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. ती बाब लक्षात ठेवून त्यांना २१ ऑगस्ट २०१५पर्यंतची मुदतवाढ गेल्या ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती.

'फिच' पाठोपाठ ‘मूडीज’नेही आर्थिक विकासदर खुंटवला

 • आर्थिक सुधारणांना मिळत नसलेली गती आणि देशाच्या बहुतांश भागावर घोंघावणारे कोरडय़ा दुष्काळाचे सावट यामुळे आघाडीच्या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताच्या आर्थिक विकास दराचे अंदाज खालावत आणले आहेत.
 ‘मूडीज’चे अंदाज 
  Moodys lowers India growth forecast
 • चालू आर्थिक वर्षांसाठी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन हे ७ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे ‘मूडीज’ने ताज्या अंदाजात म्हटले आहे. पतसंस्थेने यापूर्वीचा विकास दर ७.५ टक्के अपेक्षिला होता.
 • मान्सूनचा सुरू होऊनही सुरुवातीच्या टप्प्यात त्यात समाधानकारक प्रगती दिसत नसल्याच्या आधारावर विकास दर कमी अंदाजण्यात आला आहे, असे याबाबतच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
 • भारताच्या विकास दराबाबत अंदाज व्यक्त करताना मुख्य जोखीम ही आर्थिक सुधारणांबाबत संथ गती असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
 • आर्थिक सुधारणा ही काळाची गरज असून त्यापासून सरकार फारकत घेत असल्याचे दिसत असल्याचेही अहवालाने मत नोंदविले आहे.

 'फिच'चे अंदाज 
 • जागतिक पतमानांकन संस्था 'फिच'नेही महिन्याभरापूर्वीच भारताच्या अर्थवृद्धीदराबाबत अंदाज कमी केला आहे. वर्ष २०१५-१६ साठी फिचने भारताच्या विकास दराबाबतच आपला आधीचा अंदाज ८ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
 • तर पुढील २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही ८.३ टक्क्यांवरून ८.१ टक्के असा कमी केला आहे. कमी पावसाबरोबरच भांडवली खर्चात न आलेला उठाव तसेच कमी निर्यात मागणी आदी कारणे त्यासाठी देण्यात आली होती.
 • मूडीजचा भारताच्या विकास दराबाबतचा अंदाज हा अर्थ खात्यांच्या अंदाजापेक्षाही कमी आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ७.५ टक्क्यांपासूनही लांबला आहे.

अर्थ मंत्रालयाने ८ ते ८.५ टक्के विकास दर अंदाजला असताना रिझर्व्ह बँकेचा अंदाजही ७.६ टक्के इतकाच आहे. पतमानांकन संस्थांच्या घसरत्या अंदाजांनी देशाच्या पतमानांकनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्टेट बँकेचे 'बडी' अ‍ॅप

  SBI Buddy App
 • देशातील सर्वात मोठय़ा भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाइलद्वारे कैक प्रकारचे बँकिंग व्यवहार शक्य करणारे अ‍ॅप 'बडी' या नावाने प्रस्तूत केले.
 • अनेक प्रकारच्या देयकांचा भरणा, सिनेमा, विमान प्रवास तिकिटांचे आरक्षण, हॉटेल बुकिंग यासाठी केवळ मोबाइल फोनचा वापर या अ‍ॅपद्वारे शक्य होईल.
 • अ‍ॅक्सेन्च्युअर आणि मास्टरकार्ड यांच्या सहयोगाने बनविलेले हे अ‍ॅपद्वारे व्यवहार सुरक्षित व विनासायास असण्याबरोबरच, त्यात देयकांचा भरणा करण्याच्या तारखांचे स्मरण करून देणारे गजर हे अतिरिक्त वैशिष्टय़ आहे.
 • स्टेट बँकेच्या अध्यक्षा : अरुंधती भट्टाचार्य
 ‘आयसीआयसीआय’ची 'स्मार्ट व्हॉल्ट' 
 • खासगी क्षेत्रातील अग्रेसर आयसीआयसीआय बँकेनेही तिच्या सेवेतील डिजिटल संक्रमणाची चुणूक दाखविताना, १८ ऑगस्ट रोजी 'स्मार्ट व्हॉल्ट' नावाची नवीन सुविधा प्रस्तुत केली.
 • या सुविधेचा विकास बँकेने भारतीय कंपन्यांच्या भागीदारीतूनच केला असल्याने, देशाने अवलंबिलेल्या  मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या फलश्रुतीचेही उदाहरण प्रस्तुत करण्यात आले आहे.
 • स्मार्ट व्हॉल्ट सुविधा म्हणजे व्यक्तिगत खातेदारांना महत्त्वाचे दस्तऐवज जतन करण्याचा व केव्हा-कधीही विनासायास उपलब्ध होणारा डिजिटल कुलूपबंद खण असून, बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली आणि बायोमेट्रिक व पिनद्वारे शहानिशा करूनही ते उघडता येणार आहे.
 • हे डिजिटल खण वेगवेगळ्या दोन-तीन आकारांत उपलब्ध करण्यात येणार असून, आकारमानानुसार या सुविधेसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
 • आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्याधिकारी : चंदा कोचर

पीएफमधील रक्कम ऑनलाइन काढण्याची योजना पुनर्विचारार्थ

 • भविष्य निर्वाह निधी खात्यातील ऑनलाइन रक्कम काढण्यासाठी आधार कार्ड क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावर निधीचे व्यवस्थापन पाहणारी निवृत्त निधी संघटना (ईपीएफओ) पुनर्विचार करणार आहे.
 • सरकारच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एका निकालाद्वारे दिला होता. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तत्पूर्वी ईपीएफओने तिच्या खातेदारांसाठी निवृत्त निधीची रक्कम ऑनलाइन माध्यमातून काढून घेण्यासाठी लाभधारकांना आधार कार्ड क्रमांक सक्तीचा केला होता.
 • ज्या धारकांकडे आधार कार्ड क्रमांक आहे त्यांचे भविष्य निर्वाह खाते संकेतस्थळाद्वारे जोडून ही उपाययोजना संबंधित खात्यातून रक्कम काढून घेण्यासाठी उपयोगात आणण्याची संघटनेची योजना आहे. त्याबाबत कायदेशीर मत विचारात घेण्यात येणार आहे.
 • विद्यमान रचनेत खातेधारकाला निधी काढायचा असेल तर लेखी अर्ज  सादर करावा लागतो. तसेच यापूर्वी खातेदाराला त्याच्या बँकेचा 'रद्द' धनादेश निर्वाह निधी संघटनेकडे द्यावा लागत असे.
 • नव्या रचनेत खातेधारकाला वैश्विक खाते क्रमांक दिला गेला आहे. आधार कार्ड व बँक खाते हे भविष्य निर्वाह निधी खात्याशी जोडले गेल्यानंतर रक्कम काढावयाची झाल्यास ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ती आपोआपच संबंधिताच्या बँक खात्यात जमा होण्याचा पर्याय होता.
 • भविष्य निर्वाह आयुक्त : के. के. जालान

कनिका कपूर मिस एशिया २०१५

 • कोचीमध्ये १८ ऑगस्ट रोजी झालेल्या ‘मिस एशिया २०१५’ स्पर्धेमध्ये भारताची ‘मिस इंडिया’ कनिका कपूर विजेती ठरली आहे. 
 • या स्पर्धेमध्ये १२ देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये या स्पर्धेत चीन, भूतान, मलेशिया, इराण, नेपाळ, श्रीलंका, तिबेट याशिवाय अन्य काही देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
 • ‘मिस फिलिपाईन्स’ असलेली अल्फे मॅरी नाथानी उपविजेती ठरली आहे. 
 • पुरस्काराच्या स्वरुपात तिला ५० लाख रुपये मिळाले आहेत.

सिडबीद्वारे इंडिया अॅस्पिरेशन फंडाची स्थापना

  SIDBI
 • लघु उद्योग विकास बँकेने (सिडबी) इंडिया अॅस्पिरेशन फंडाची (आयएएफ) स्थापना केली. याचे अनावरण मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झाले.
 • स्टार्टअप फंड ऑफ फंड्सला प्रोत्साहन देण्यासाठी आयएएफचा उपयोग होणार आहे. आयएएफचे व्यवस्थापन सिडबी करणार आहे.
 • सध्या देशात नवउद्योगांचे वारे वहात असून यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरुण उद्योजकांच्या नवकल्पना राबवण्यासाठी लवचिक आर्थिक परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आयएएफ महत्त्वाचा आहे.
 • या फंडाची मदत घेऊन उद्योग सुरू झाले तर त्यातून येत्या ४ ते ५ वर्षांत लाखो शिक्षित तरुणांना रोजगार मिळेल. तसेच स्माइल योजनेतून मेक इन इंडिया उपक्रम राबवण्याचा सरकारचा निर्धार आहे.
 • सिडबीचे अध्यक्ष : डॉ. क्षेत्रपती शिवाजी
 स्माइल योजना 
 • याचवेळी अरुण जेटली यांनी मेक इन इंडिया लोन फॉर स्मॉल इंडस्ट्रीज अर्थात स्माइल योजनेचीही सुरुवात केली. ही योजना १० हजार कोटी रुपयांची आहे.

सायना पुन्हा प्रथम क्रमांकावर

  Saina Nehwal
 • भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही स्पेनची कॅरोलिना मारिन हिला मागे टाकून पुन्हा एकदा विश्व बॅडमिंटन क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. जकार्ता येथे नुकत्याच आटोपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात सायनाला मारिनने पराभूत केले होते.
 • ऑलिम्पिक कांस्य विजेती सायना २० ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफच्या रँकिंगमध्ये ८२७९२ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचली.
 • या आधी इंडियन ओपन जिंकल्यानंतर सायना एक मार्च रोजी अव्वल स्थानावर दाखल झाली होती. नंतर लवकरच माघारली; पण मे महिन्यात पुन्हा नंबर वन बनली. जूनमध्ये कॅरोलिनाने सायनाला मागे टाकले होते. 
 • पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप आठव्या स्थानावर आला आहे. इंडियन ओपन विजेता किदाम्बी श्रीकांत हा एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आला आहे. 
 • दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणारी पी. व्ही. सिंधू १४व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यादेखील दहाव्या स्थानावर झेपावल्या आहेत. मिश्र दुहेरीत मात्र पहिल्या २५ खेळाडूंत एकही भारतीय नाही.

अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी सेबॅस्टियन को

  Sebastian Coe
 • आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या निवडणुकीत इंग्लंडच्या सेबॅस्टियन को यांची अध्यक्षपदी निवड झाली. को यांनी सर्जेय बुब्का यांच्यावर मात केली. बुब्का यांच्या ९२ मतांच्या तुलनेत को यांना ११५ मते मिळाली.
 • अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले बुब्का उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत विजयी झाले. बुब्का यांच्यासह कतारचे दहलान अल हमाद, कॅमेरूनचे हमाद कलकाबा मलबौम आणि क्युबाचे अल्बटरे ज्युआनटोरेना उपाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
 • अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या कथित उत्तेजक सेवन प्रकरण को यांच्यासाठी अध्यक्ष म्हणून पहिले आव्हान असणार आहे.
 महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी भारताचे सुमारीवाला 
 • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
 • बीजिंग, चीन येथे झालेल्या महासंघाच्या ५०व्या बैठकीत कार्यकारिणी समितीसाठी निवडणुका झाल्या. कार्यकारिणी सदस्य म्हणून नऊ सदस्यांची निवड झाली. माजी अ‍ॅथलिट सुमारीवाला यापैकी एक असणार आहेत.
 • सदस्यपदासाठीच्या निवडणुकीत सुमारीवाला यांना ६१ मते मिळाली. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणीत नियुक्ती होणारे सुमारीवाला पहिले भारतीय आहेत.
 • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी २००१ ते २०१३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी होते. मात्र भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांना ही संधी मिळाली होती.

श्रीलंकेत विक्रमसिंघे आघाडी सरकारचे पंतप्रधान

  Ranil Wickremesinghe
 • श्रीलंकेमध्ये १८ ऑगस्ट रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवणारे रानील विक्रमसिंघे यांनी कोलंबोतील अध्यक्ष सचिवालयात चौथ्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
 • शपथविधीनंतर लगेचच विक्रमसिंघे यांची युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) आणि श्रीलंकेचे अध्यक्ष सिरिसेना मैत्रीपाल यांची श्रीलंका फ्रीडम पार्टी (एसएलएफपी) यांनी सत्तेसाठी एकत्र येत ऐतिहासिक करार केला. 
 • श्रीलंकेच प्रथमच दोन प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी देशाची सत्ता सांभाळण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
 • श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पुन्हा सत्तासंपादनाच्या आशा धुळीस मिळवत विक्रमसिंघे यांनी संसदीय निवडणुकीत २२५ सदस्यांच्या सभागृहात १०६ जागांवर विजय मिळवला. साध्या बहुमतासाठी त्यांना ७ जागा कमी पडल्या. त्यामुळे एसएलएफपी पक्षाची मदत घेण्यात आली.
 • सरकारने तमिळ नागरिकांसह सर्व अल्पसंख्याकांना सामावून घेण्यासाठी वांशिक सलोखा जपणारी नवीन राज्यघटना तयार करण्यास नवीन आपली कटिबद्धता व्यक्त केली.
 • सध्याच्या निवडणुकीतील प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाची यंत्रणा रद्द करून निवडणूक सुधारणा करण्याची ग्वाहीदेखील नवीन सरकारने दिली.

ख्रिस रॉजर्स अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्त

 • ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ख्रिस रॉजर्सने अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्तीची औपचारिक घोषणा केली. अ‍ॅशेस मालिकेतील ओव्हल येथे होणारी पाचवी कसोटी ३७ वर्षीय रॉजर्सचा शेवटचा सामना असणार आहे.
 • इंग्लंड दौऱ्यात डोक्यावर चेंडू आदळल्याने रॉजर्सला चक्कर जाणवली होती. मात्र तरीही लॉर्ड्स कसोटीत खेळताना त्याने शानदार शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
 • २००८ मध्ये रॉजर्सने भारताविरुद्ध पर्थ कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला ५ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. मात्र पस्तिशीनंतरही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली.
 • २४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना रॉजर्सने ४२.८६च्या सरासरीने १९७२ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
 • याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने देखील अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचे घोषणा केली आहे.

टाटा समूहाची ‘उबर’मध्ये गुंतवणूक

 • वैयक्तिक गुंतवणुकीद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये रस दाखविणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहातील खासगी समभाग निधी गटाने उबर या टॅक्सी सेवा कंपनीत हिस्सा खरेदी केली आहे.
 • उबर ही मूळची अमेरिकेतील टॅक्सी सेवा कंपनी असून गेल्या काही महिन्यांपासून ती मोबाइल व्यासपीठावर व्यवसाय विस्तार करत आहे. उबरमध्ये यापूर्वी एका आघाडीच्या प्रसारमाध्यम समूहानेही गुंतवणूक केली आहे.
 • भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रात उबरने दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. कंपनीच्या १८ शहरांमध्ये टॅक्सी धावत असून तिच्याबरोबर १.५० लाख चालक जोडले गेले आहेत.
 • कंपनीच्या ग्राहकसंख्येत महिन्याला ४० टक्के वाढ नोंदली जात आहे. कंपनीकडे सध्या ३५ टक्के बाजारहिस्सा आहे.
 • उबर ही काही दिवसांपूर्वी टाटा यांनी वैयक्तिक गुंतवणूक केलेल्या ओलाची स्पर्धक कंपनी आहे.
 • रतन टाटा यांची वैयक्तिक स्वरूपात अल्टाएरोज एनर्जीज, स्नॅपडील, ब्ल्यूस्टोन, स्वास्थ्य इंडिया, अर्बनलॅडर, कारदेखो.कॉम, ग्रामीण कॅपिटल, पेटीएम, शिओमी व कार्या या १० कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

लाचखोर मेव्हणा अटकेत

 • गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मेव्हणा दिलीप माळवणकर याला एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. 
 • तो गोवा स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीआयडीसी) मध्ये कामाला आहे.
 • 'तुएम औद्योगिक इस्टेट'मधील एका प्लॉटच्या भूसंपादनात मदत करू, असे सांगून मालवणकर याने उद्योजक संजय कुमावत यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
 • मालवणकरसह 'जीआयडिसी'शी संबंधित अजित गौनेकर या अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे

क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल यांचा लग्नसोहळा चेन्नईत १९ ऑगस्ट रोजी पार पडला. १९ ऑगस्ट रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले असून, २० ऑगस्टला तेलुगू पद्धतीने या दोघांचे पुन्हा लग्न होणार आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा