चालू घडामोडी = ३१ ऑगस्ट २०१५


केंद्रीय गृह सचिवपदी राजीव मेहर्षी

    L.C Goyal & Rajiv Mehrishi
  • केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला अर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केला असून, त्यांच्या जागी राजीव मेहर्षी यांची गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.
  • यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात गोयल यांच्याकडे अचानकपणे केंद्रीय गृहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गोयल हे केरळ केडरचे १९७९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अनिल गोस्वामी यांना तडकाफडकी दूर करून त्याजागी गोयल यांना आणण्यात आले होते. २०१७ सालापर्यंत गोयल यांचा कार्यकाळ होता. मात्र त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आहे. 
  • मेहर्षी हे १९७८च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या वित्त विभागात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी ते या पदावरून निवृत्त होणार होते. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, त्यांच्याकडे गृहसचिव पदाची अतिरक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

‘संथारा’वर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती

  • जैन धर्मियांमध्ये पाळल्या जाणाऱ्या उपोषण करून देहत्याग करण्याच्या ‘संथारा’ विधीवर बंदी घालण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे जैन धर्मियांना दिलासा मिळाला आहे.
  • ‘संथारा’ अथवा ‘सल्लेखाना’ असेही नाव असलेल्या या विधीमध्ये जैन धर्मातील श्वेतांबर पंथाचे अनुयायी मरण पत्करण्यासाठी स्वेच्छेने उपवास करतात.
  • आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला आहे, अशी खात्री झाल्यानंतर ‘संथारा’ हा मोक्ष मिळवण्याचा अंतिम मार्ग असल्याची या अतिशय प्राचीन अशा विधीचे पालन करणाऱ्या श्वेतांबरपंथियांची समजूत आहे.
  • ‘संथारा’चे अनुसरण करणे हे आत्महत्या करण्यासारखेच असून असा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला जायला हवा. हे कृत्य भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ अन्वये (आत्महत्येला प्रवृत्त करणे) शिक्षेस पात्र आहे, असा निर्णय राजस्थान न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. सुनील अंबवानी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला होता.
  • न्यायालयाच्या या निकालाविरोधात जैन धर्मियांमध्ये नाराजीची भावना होती. विविध ठिकाणी जैन धर्मियांनी निषेध फेरीही काढली होती. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
  • संथारा व्रताबद्दल विस्तृत माहिती १३ ऑगस्टच्या चालू घडामोडींमध्ये वाचा.

भूसंपादन विधेयकासाठी नवीन अध्यादेश नाही

  • वादग्रस्त भूसंपादन विधेयकाची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत असल्याने आता सरकार त्याबाबत नव्याने अध्यादेश जारी करणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’मध्ये जाहीर केले. 
  • शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या विधेयकामध्ये विविध सूचनांचा समावेश करण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांच्या जोरदार विरोधामुळे अखेर सरकारने या विधेयकावरून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • बहुतांश विरोधी पक्षांनी, तसेच सत्ताधारी एनडीएच्या काही घटक पक्षांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे भूसंपादन विधेयक संसदेत मंजूर झाले नाही. त्यामुळे सरकारने तीन वेळा या विधेयकाचा अध्यादेश जारी केला होता.
  • या विधेयकाची सध्या संसदेची संयुक्त समिती छाननी करत आहे. भूसंपादनाचा विषय घटनेमधील समवर्ती सूचीत असल्यामुळे या विषयावर कायदा करण्याचे काम राज्यांवर सोपवले जावे, अशी शिफारस नीती आयोगाने केल्यामुळे अध्यादेश पुन्हा जारी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’

  • भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळविल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेचे नामकरण ‘दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’ असे करण्यात आले आहे.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांना समर्पित करण्यात आलेल्या ‘फ्रीडम करंडका’साठी ही मालिका खेळविण्यात येईल. 
  • ‘स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हे भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधील समान सूत्र आहे. अहिंसा व असहकाराच्या आयुधांच्या सहाय्याने महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या या प्रकाशमान वाटचालीमधून संपूर्ण जगाने प्रेरणा घेतली.
  • या पार्श्वभूमीवर, या दोन देशांसाठी पथदर्शक व्यक्तिमत्त्वे असलेल्या महात्मा व मदिबा यांना हा करंडक समर्पित करण्यात आला आहे.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक वेस क्रेव्हन यांचे निधन

  • ‘ए नाईटमेअर ऑन एल्म स्टीट’ तसेच ‘स्क्रीम’ अशा प्रसिद्ध भयपटांमधून आपल्या दिग्दर्शनाचा अमीट ठसा उमटविणारे हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक वेस क्रेव्हन यांचे निधन झाले. त्यांना मेंदुचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ते ७६ वर्षांचे होते. 
  • १९८४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट’ हा चित्रपट व या चित्रपटामध्ये अभिनेता रॉबर्ट एनग्ल्युंड याने साकारलेले फ्रेडी क्रुगेर हे खलनायकाचे पात्र अत्यंत गाजले होते. या चित्रपाटाचे लेखन व दिग्दर्शन क्रेव्हन यांनी केले होते.

‘सहज’ एलपीजी ऑनलाइन बुकिंग उपक्रम

  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘सहज’ या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. 
  • यामुळे आता ग्राहकांना आता घरगुती वापराचा गॅस ऑनलाइन बुक करता येणार असून, त्यासाठीचे पैसेही ऑनलाइनच भरता येतील. केंद्र सरकारच्या www.mylpg.in या वेबपोर्टलवरून ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
 दोन किलोचे एलपीजी सिलिंडर 
  • स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडर उपलब्ध करून दिल्यानंतर आता सरकारने किराणा दुकानांमधून दोन किलोचे एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
  • एलपीजी सिलिंडर १४.२ किलोची असतात पण आता ते पाच व दोन किलोमध्ये उपलब्ध केले जात आहेत. १४.२ किलोच्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४१८ रुपये आहे ते गरिबांना परवडत नाही. पाच किलोच्या सिलिंडर २०१३ मध्ये सुरू करण्यात आले, त्याची किंमत १५५ रुपये आहे.

कर्जबाजारी देशांमध्ये भारत ३५वा

    India stands 35th among debt countries
  • सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अर्थात जीडीपीच्या तुलनेत प्रत्येक देशावर किती टक्के कर्ज आहे, याचा आढावा फोर्ब्ज नियतकालिकाने घेतला असून त्यात अशा कर्जबाजारी देशांमध्ये भारताचा ३५वा क्रमांक लागला आहे.
  • कर्जाची टक्केवारी जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये जपानचा प्रथम क्रमांक लागला आहे. जपान हा ग्रीसपेक्षाही कर्जबाजारी असला तरी त्याची निर्यात सक्षम असल्याने त्याच्यावर ग्रीससारखी दिवाळखोरीची वेळ आलेली नाही, असे निरीक्षण फोर्ब्जने नोंदवले आहे. 
  • या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक कर्ज असलेले देश या आजमितीला सर्वात श्रीमंत देश समजले जात आहेत, याकडेही फोर्ब्जने लक्ष वेधले आहे.
  • कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिका (यूएसए), चीन व रशिया अनुक्रमे १६, २२ व ४३व्या क्रमांकावर आहेत. 

जैशाचा राष्ट्रीय विक्रम

  • महिलांच्या मॅरेथॉनमध्ये भारताच्या ओ.पी. जैशा आणि सुधा सिंग या अनुक्रमे १८ आणि १९व्या क्रमांकावर राहिल्या. जैशाने २ तास ३४ मिनिटे व ४३ सेकंद वेळ नोंदवीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
  • या आधीचा विक्रमही जैशाच्या नावावर होता. तिने मुंबई मॅरेथॉनमध्ये २ तास ३७ मिनिटे आणि २९ सेकंद अशी वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. सुधाने २ तास ३५ मिनिटे व ३५ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली.
  • या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या मेअर दिबाबाने सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. दिबाबाने २ तास २७ मिनिटे आणि ३५ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. त्यापाठोपाठ केनियाच्या हेला किप्रोपने (२ तास २७ मि. व ३६ से.) रौप्य आणि बहारिनच्या युनाइस किर्वाने ब्राँझपदक मिळविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा