चालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५


माजी सैनिकांचे उपोषण मागे

 • ‘समान हुद्दा समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) योजनेतील स्वेच्छानिवृत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पंधरा वर्षे सेवा करणाऱ्या प्रत्येक जवानाला तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या जवानालाही या योजनेचा लाभ होणार आहे” असा खुलासा केला.
 • त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. परंतु लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी म्हटले.
 दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ 
  Delhi Metro Badarpur-Faridabad line
 • ६ सप्टेंबर २०१५ रोजी दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर फरीदाबाद येथे पंतप्रधानांनी सभा घेत हरियानाच्या विकासाबाबत आणि ओआरओपीविषयी स्पष्टीकरण दिले.
 • यावेळी पंतप्रधानांनी एस्कॉर्ट्स मुजेसर स्टेशनपासून बाटा चौक पर्यत मेट्रोने प्रवास करत मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
 • औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या हरियानाला राजधानी दिल्लीला जोडण्यासाठी मेट्रो मार्गाची सुरवात करण्यात आली आहे. दिल्लीतील बदरपूर पासून फरीदाबादमधील मुजेसर स्थानकापर्यत ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
 • आयटीओ ते बदरपूरपर्यतच जाणारी मेट्रो आता फरीदाबाद ते मुजेसर स्टेशन म्हणजे १४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान नऊ स्थानके आहेत. याप्रकल्पासाठी तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
 • हरियाणाचे मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर

काळा पैसा बाळगणाऱ्यांची गुप्त माहिती देणाऱ्यांना बक्षीस

 • केंद्र सरकारने काळा पैसा बाळगणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली असून, या संदर्भात केंद्रीय आयकर विभागाने नवीन मार्गदर्शिका काढली आहे.
 • यानुसार जे लोक करबुडवे, काळा पैसा बाळगणाऱ्यांची गुप्त माहिती देतील त्यांना संबंधितांच्या करवसुलीच्या दहा टक्के अथवा पंधरा लाख यापैकी जी रक्कम अधिक असेल ती बक्षीस म्हणून देण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष करविभागाच्या (सीबीडीटी) संमतीने बक्षीस देण्यात येईल.
 • परदेशात जाणारा काळा पैसा रोखण्याचे सीबीडीटीसमोर मोठे आव्हान आहे. या संदर्भात एक विशेष तपास पथकही केंद्र सरकारने तयार केले आहे.

राज्यातील शिक्षकांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना

 • राज्यातील शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना लागू करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे.
 • राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आजारात या योजनेचा फायदा होईल. राज्यातील शेकडो रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत.
 • सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो. या नवीन योजनेत शिक्षकांना मेडिकल कार्ड दिले जाणार असून, रुग्णालयात ते दाखविल्यावर पैसे न भरता उपचार घेता येतील.
 • शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष शिक्षक आमदार रामनाथ मोते व नागो गाणार यांनी ही योजना सुचवली आहे.

शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

  Shane Watson
 • ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शेन वॉटसनला नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या ऍशेस मालिकेत संघाबाहेर ठेवण्यात आले होते.
 • वॉटसनने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत ५९ कसोटी सामने खेळले आहे. त्याने शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेत खेळली होती. मायकेल क्लार्क, ख्रिस रॉजर्स यांच्यानंतर आता वॉटसननेही निवृत्ती जाहीर केली आहे.
 • वॉटसनने एक कसोटी आणि नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे.

‘गोंडवाना’च्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर

 • गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहील. गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध सुरू होता.
 • डॉ. विजय आईंचवार यांच्या नियुक्तीची मुदत संपल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार डॉ. एम. डी. चांदेकर यांच्याकडे होता.
 • पूर्णवेळ कुलगुरूंच्या निवडीसाठी न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीत महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार आणि गोव्याचे डॉ. रेड्डी यांचा समावेश होता.
 • चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासासाठी २०११ मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

चीन आणि पाकिस्तानचा संयुक्त युध्दसराव

 • चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलाने संयुक्त सरावाला ६ सप्टेंबर २०१५ रोजी सुरवात केली. या सरावामध्ये दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला.
 • हा सराव किती काळ चालणार आणि कोठे सुरू आहे, याबाबत माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानमध्ये २०११, चीनमध्ये २०१३ आणि पुन्हा पाकिस्तानमध्ये २०१४ मध्ये असा सराव झाला होता.

इटालियन ग्रां. प्री.मध्ये लुइस हॅमिल्टन विजेता

 • लुइस हॅमिल्टनने इटालियन ग्रां. प्री. शर्यत जिंकून विश्वविजेतेपदाकडे आगेकूच करताना ५३ गुणांची आघाडी घेतली. हॅमिल्टनचे हे फॉर्म्युला-वन शर्यतीचे ४०वे जेतेपद आहे. या जेतेपदामुळे हॅमिल्टनच्या खात्यात एकूण २५२ गुण जमा झाले आहेत.
 • या शर्यतीत सबेस्टीयन वेटेलने दुसरे स्थान तर विल्यम्सच्या फेलिपे मासाने तिसरे स्थान पटकावले.
 • विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत १९९ गुणांसह मर्सिडिजचा निको रोसबर्ग दुसऱ्या स्थानावर, तर १७८ गुणांसह फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल तिसऱ्या स्थानावर आहे.

अपूर्वी चंडिलाला रौप्यपदक

  ISSF World Cup Finals Apurvi Chandela wins silver
 • जयपूरची युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंडिलाने आयएसएसएफ रायफल आणि पिस्तुल विश्वचषक स्पर्धेतील १० मीटर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली.
 • इराणच्या अहमदी ईलाहेने सुवर्णपदक जिंकले तर सर्बिच्या आंद्रीया अर्सोव्हिकने कांस्यपदक मिळवले.
 • एप्रिल महिन्यात चँगवॉन (कोरिया) येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी (रायफल/पिस्तुल) स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई करून अपूर्वीने आधीच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवले आहे. 
 • तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे. वर्षभरातील चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धामधील १० सर्वोत्तम गुण ग्राह्य धरून विश्वचषक अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड होते.

व्हिलर बेटाचे कलाम बेट म्हणून नामांतर

 • क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले जाणारे व्हिलर बेटाचे (Wheeler Island) आता कलाम बेट (A P J Abdul Kalam Island)  म्हणून नामांतराची अधिकृत घोषणा ओडिशा सरकारने केली आहे. देशातील तरुणाईला हे बेट आपली शक्ती विकासकामासाठी वापरण्याकरिता सतत प्रेरणा देईल.
 • ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांच्या कार्यकाळात १९९३ मध्ये सरकारने व्हिलर बेट डीआरडीओच्या ताब्यात दिले. कलाम यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने या बेटावर देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरु केल्या.
 • ऑगस्ट महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम (८३) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मेघालय येथे निधन झाले होते. कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण कलाम रोड असे करण्याच्या निर्णय स्थानिक पालिकेने घेतला. या नामांतरानंतर आता व्हिलर बेटाचे कलाम बेट असे नामांतर करण्यात आले आहे.
 • ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनायक

भ्रष्टाचारच्या निपटाऱ्यासाठी आठ वर्षे : सीव्हीसी 

  Central Vigilance Commission
 • सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्धची भ्रष्टाचार; तसेच शिस्तभंगाच्या प्रकरणांचा अंतिम निपटारा होण्यासाठी सरासरी आठ वर्षांचा कालावधी लागत असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) केलेल्या नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
 • भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील तपास अहवालांवर फर्स्ट स्टेज अॅडव्हाइस (एफएसए) दिला जातो, तर सुनावणी पूर्ण करून अंतिम निकाल होण्यापूर्वी 'सेकंड स्टेज अॅडव्हाइस' (एसएसए) दिला जातो. दर वर्षी सुमारे पाच हजार प्रकरणांत हे अॅडव्हाइस मागविले जातात.
 • अनियमितता झाल्याच्या तारखेपासून भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणांमध्ये अंतिम निपटारा होण्यासाठी सरासरी आठ वर्षे लागतात, तर अनियमिततेचा शोधण्यासाठी सरासरी दोन वर्षे लागतात.
 • तीन सदस्यांच्या समितीने हा अभ्यास केला आहे. निष्पाप अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये, तसेच दोषी अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळू नये यासाठी भ्रष्टाचार व अनियमिततेच्या प्रकरणांचा वेळेत निपटारा होण्याची गरज आहे, असे समितीने म्हटले आहे.

मालवाहतुकीच्या वाहनांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी सस्ताभाडा.कॉम

 • प्रवासी वाहतुकीसाठी बुक केल्या जाणाऱ्या वाहनांप्रमाणेच आता मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग करता यावे यासाठी www.sastabhada.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूक धारकांची नोंद करण्यात येणार आहे.  इंब्युलीयन्स इन्फोवेब कंपनीच्या मदतीने www.sastabhada.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सस्ताभाडा या संकेतस्थळावरून ट्रक किवा टेम्पो बुक केल्यास गाडीच्या मालकासह वाहन बुक करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होणाच्या विश्वास संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी व्यक केला आहे.
 • इंब्युलीयन्स इन्फोवेब प्रायवेट लिमिटेडने यासाठी एक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली मुळे कोणतीही जीपीएस प्रणालीचा वापर न करता किवा वाहकाकडे कोणतेही साधन न देताही वाहने ट्रॅक होऊ शकतात. 
 • सध्या ही कंपनी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा