चालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५


भारत आणि मलेशिया दरम्यान तीन सामंजस्य करार

    Modi visit Malaysia
  • द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
  • भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.
  • दोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.
  • तसेच, भारताचा नीती आयोग आणि मलेशियाच्या परफॉरर्मन्स मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी युनिट (पेमांडू) यांच्यादरम्यान कार्यकुशल व्यवस्थापन क्षेत्रात योजना आणि अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
 निती आयोगाचा पेमांडूशी सहकार्य करार 
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात कामगिरी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख यासाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘द परफॉरमन्स मॅनेजनेंट डिलिव्हरी युनिट’ (पेमांडू) आणि भारताचा निती आयोग यांच्यात सहकार्य करार करण्यात आला.
  • ‘पेमांडू’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दातोश्री इद्रिस जाला आणि भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव अनिल वाधवा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
  • ‘बिग फास्ट रिझल्ट’ पद्धती वापरून प्रामुख्याने तांत्रिक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येणार आहे. ही पद्धत ‘पेमांडू’ने विकसित केली आहे. सरकारी कार्यक्रम, विकासात्मक योजना तयार करण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
  • मलेशियाचे पंतप्रधान : मोहंमद नजीब बिन तुन अब्दुल रझाक

भारत आणि सिंगापूर देशांमध्ये दहा करार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान भारत आणि सिंगापूर देशांमध्ये संरक्षणासह विविध क्षेत्रांशी संबंधित दहा करार करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
  • याच वेळी दोन देशांमधील भागीदारी धोरणात्मक पातळीवर नेल्याची घोषणाही करण्यात आली. दोन देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि राजकीय, संरक्षण, सुरक्षा सहकार्य, अर्थ आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रांमध्ये नवे संबंध निर्माण करण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी केली असून, यामुळे दोन्ही देशांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
  • संरक्षण सहकार्य वाढविण्याबरोबरच सायबर सुरक्षा, जहाज बांधणी आणि नागरी उड्डाण या क्षेत्रांमध्ये हे दहा करार करण्यात आले.
  • सुरक्षा सहकार्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत सायबर सुरक्षेबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, तंत्रज्ञानासाठी संयुक्त संशोधन, सायबर सुरक्षा धोरणाबाबतच्या माहितीचे आदानप्रदान याबाबतीत सहकार्य केले जाणार आहे.
  • सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस आणि नीती आयोगामध्ये झालेल्या योजना सहकार्य करारानुसार शहर नियोजन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन याबाबतच्या ज्ञान आणि माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच दोन्ही संस्थांमध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारीही होणार आहे.
  • सिंगापूरचे पंतप्रधान : ली सेन लुंग
 भारत आणि सिंगापूर दरम्यान झालेले दहा करार खालीलप्रमाणे... 
  • भारत आणि सिंगापूरमधील संबंध धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेणे.
  • संरक्षण मंत्री पातळीवर चर्चा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव, संयुक्त उत्पादन आणि विकासासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण कंपन्यांमध्ये सहकार्य वाढविणे.
  • सुरक्षा सहकार्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान विभाग, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद गट (सर्ट-इन) आणि सिंगापूर सायबर संस्थेदरम्यान करार.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यात नागरी उड्डाण सेवेबाबत आणि जयपूर आणि अहमदाबाद विमानतळ व्यवस्थापनाबाबत करार.
  • नीती आयोग आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेसमध्ये योजना सहकार्य करार.
  • भारताचा अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग आणि सिंगापूरचा केंद्रीय अंमलपदार्थ विभाग यांच्यामध्ये अंमलीपदार्थाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी सामंजस्य करार.
  • भारताच्या गाव आणि देश नियोजन संस्था आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यामध्ये नगर नियोजन आणि प्रशासन सहकार्य करार.
  • जहाज बांधणी करार.
  • सिंगापूरमधील आशियाई संस्कृती संग्रहालयाला कर्जपुरवठा.
  • दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणि नागरिकांमध्ये थेट संवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

ट्युनिशियात दहशतवादी हल्ला

  • आफ्रिका खंडातील माली देशानंतर ट्युनिशिया देशात दहशतवाद्यांनी अध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • या हल्ल्यानंतर ट्युनिशियात महिनाभरासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, ट्युनिस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  • ट्युनिशियाचे अध्यक्ष : बेजी केड इसेबसी

रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडले

  • अनेकदा इशारा देऊनही हवाई हद्दीचा भंग करणारे रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडले. मात्र, तुर्कस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याचा दावा रशियाने फेटाळून लावला आहे.
  • रशियाच्या ‘एसयू-२४’ प्रकारच्या लढाऊ विमानावर तुर्कस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. त्यानंतर हे विमान कोसळले, असा दावा रशियाने केला आहे. तर ‘एफ-१६ एस’ प्रकारच्या विमानातून रशियाच्या विमानावर हल्ला करण्यात आल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे.
  • लढाऊ विमान पाडण्यात आल्यानंतर या विमानातील दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या मदतीने बाहेर उड्या घेतल्या. विमान सीरियातील लटकिया भागात कोसळले. हा भाग सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दोन्ही वैमानिकांच्या शोधासाठी मोठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

एक लाख कोटींचा 'राईस मिल' घोटाळा?

  • कोळसा खाण, २-जी प्रमाणेच सुमारे एक लाख कोटींचा ‘राईस मिल’ घोटाळा ‘कोब्रापोस्ट’ने ‘कॅग’च्या हवाल्याने समोर आणला आहे.
  • देशभरातील शेतकऱ्यांकडून सरकार प्रत्येक हंगामात मोठ्या प्रमाणावर कच्चा तांदूळ खरेदी करते. किमान हमीभावाने ही खरेदी केली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी हे धान्य 'राईस मिल्स'कडे पाठवलं जातं.
  • मात्र मिलकडून केवळ पक्का तांदूळच सरकारला परत मिळतो. त्याची कणी वा कोंडा सरकारला परत मिळत नाहीत. राज्य सरकारं आणि केंद्राच्या या चुकीच्या धोरणामुळे मिल मालकांनी कणी आणि कोंडा विकून सरकारच्या तिजोरीचे आतापर्यंत करोडो रुपयांचे नुकसान केले आहे, असा दावा ‘कोब्रापोस्ट’ने केला आहे.
  • गेल्या १० वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत सुमारे १ लाख कोटींचे सरकारचे नुकसान झाले आहे. 'कॅग'च्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे.

पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यवसायासाठी करण्यास मनाई

  • रामायण किंवा कुराण या धर्मग्रथांच्या नावांवर कोणी एक व्यक्ती हक्क सांगू शकत नाही. एखादी वस्तू वा सेवेचा व्यवसाय करायचा असल्यास 'ट्रेडमार्क' म्हणून या नावांचा वापर केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.
  • रामायण, कुराण, बायबल, गुरू ग्रंथ साहिब असे अनेक पवित्र तसेच धार्मिक महत्त्व असलेले ग्रंथ आहेत. त्यामुळेच या ग्रंथांच्या नावांचा वापर व्यवसायासाठी आपण करू शकत नाही असेल असे न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने सांगितले.
  • ईश्वर अथवा धर्मग्रंथांचं नाव 'ट्रेडमार्क' म्हणून वापरण्यास परवानगी दिल्यास लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही खंडपीठ म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा