चालू घडामोडी - २२ डिसेंबर २०१५


“बालन्याय दुरुस्ती विधेयक २०१५” राज्यसभेत मंजूर

 • “बालन्याय (देखरेख आणि संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०१५”ला राज्यसभेने सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने आवाजी मतदानाने त्याला मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ते लागू होईल.
 • त्यामुळे आता अत्याचार, हत्या, अपहरण यांसारख्या सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यांत १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आरोपीला प्रौढ मानले जाईल. त्याला प्रौढांप्रमाणेच शिक्षा होऊ शकेल.
 • लोकसभेत हे विधेयक ७ मे २०१५ रोजी मंजूर झाले होते.
अशा कायद्याची गरज का?
 • सध्याच्या कायद्यात १८ वर्षांपर्यंतच्या बालगुन्हेगाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत सुधारगृहात ठेवण्याची तरतूद होती. त्यामुळे दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ च्या निर्भया सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका झाली होती. सुप्रीम कोर्टानेही कायदा नसल्याने शिक्षा वाढवली नव्हती.
 • या घटनेनंतरच, गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीन गुन्हेगारांसाठी निश्चित केलेली वयोमर्यादा घटवून ती १६ वर्षे करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
१६ वर्षांवरील प्रत्येक अल्पवयीन गुन्हेगाराला प्रौढ मानले जाईल का?
 • नाही. १६ वर्षांवरील अल्पवयीन गुन्हेगारांची तपासणी बाल न्याय मंडळाचे मनोवैज्ञानिक आणि तज्ज्ञ करतील. अपराध प्रौढाच्या मानसिकतेतून केला आहे काय, हे मंडळच निश्चित करेल.
निर्भयाचा गुन्हेगार पुन्हा तुरुंगात जाईल?
 • नाही. राष्ट्रपती ज्या दिवशी विधेयकावर स्वाक्षरी करतील त्या दिवसापासूनच लागू होईल. निर्भयासह इतर जुन्या प्रकरणांत ते लागू होणार नाही. म्हणजेच भविष्यातील गुन्ह्यांसाठीच या कायद्याचा वापर होऊ शकेल. जुन्या प्रकरणांत नाही.
फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल का?
 • नाही. बालगुन्हेगारांचे तीन प्रकार आहेत.
  1. अत्यंत गंभीर गुन्हे. त्यात ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे.
  2. गंभीर गुन्हे. त्यात ३ ते ७ वर्षे शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
  3. लहान गुन्हे. त्यात ३ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतुद आहे.
 • बालगुन्हेगाराला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होणार नाही.

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी आमचे Mobile Application डाउनलोड करा.
कृपया तुमच्या मित्रांना हे Application नक्की शेअर करा.

ब्रेंडन मॅक्युलम निवृत्त होणार

 • न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 • मॅक्युलम हा सलग १०० कसोटी खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० फ्रेबुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणाऱ्या मालिकेतील तो त्याच्या १००व्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. ३४ वर्षीय मॅक्युलमच्या कसोटी व क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे.
 मॅक्युलमची कारकीर्द 
 • मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने खेळलेल्या २९ सामन्यांपैकी ११ सामन्यांत संघाने विजय मिळविला आहे.
 • मॅक्युलमने ९९ कसोटीत ६,२७३ धावा केल्या असून ११ शतके व ३१ अर्धशतके ठोकली आहेत. तर २५४ एकदिवसीय सामन्यात ५ शतके व ३१ अर्धशतकांसह ५९०९ धावा केल्या आहेत.
 • ५२ कसोटी सामन्यांत यष्टिरक्षण करणाऱ्या मॅक्युलमने १९४ झेल टिपले. त्याच्याकडे २०१२मध्ये संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले.
 • न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा मॅक्युलम हा एकमेव फलंदाज आहे. त्याने वेलिंग्टन येथे गेल्यावर्षी भारताविरुद्ध ३०२ धावांची खेळी केली होती.
 • वन-डे क्रिकेटमध्ये मॅक्युलमची सरासरी ५९.४३ आहे. न्यूझीलंडतर्फे हा विक्रम आहे.

पाटण्यामध्येही जुन्या डिझेल गाडयांवर बंदी

 • डिझेल गाडया मोठया प्रमाणावर प्रदूषण करत असल्यामुळे आता दिल्ली पाठोपाठ बिहारची राजधानी पाटण्यामध्ये डिझेल गाडयांवर बंदी घालण्यात येणार आहे.
 • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंधरावर्ष जुन्या डिझेल गाडयांवर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या फक्त पाटण्यामध्येच हा आदेश लागू होणार आहे.
 • दिल्लीमध्येही येत्या एक जानेवारीपासून गाडया सम आणि विषम क्रमांकानुसार एकदिवसाआड रस्त्यावर धावणार आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘पॅन’द्वारे एनपीएस खाते ऑनलाइन उघडणे शक्य

 • पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत (एनपीएस) ऑनलाइन खाते उघडण्यासाठी आधारची सक्ती रद्द केली आहे. आता पॅन कार्ड आणि बँक केवायसी क्रमांकाच्या आधारावर ऑनलाइन एनपीएस खाते उघडता येईल.
 • एक प्रयोग म्हणून आधार क्रमांकाच्या आधारावर एनपीएस खाते उघडण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती, पण ऑक्टोबरमध्ये आधारच्या वापरावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ती थांबवण्यात आली. या निर्णयामुळे एनपीएस खाते ऑनलाइन सुविधा सुरू करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा