चालू घडामोडी - २८ डिसेंबर २०१५


मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला भारत दौऱ्यावर

 • मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला भारत दौऱ्यावर आले आहेत. २८ जानेवारी रोजी त्यांनी हैदराबादमध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंची भेट घेतली. याआधी दोन आठवड्यांपूर्वी गुगल सीईओ सुंदर पिचाई भारत दौऱ्यावर आले होते.
 • यावेळी नायडूंनी आंध्रप्रदेशात मायक्रोसॉफ्टचे आणखी एक ऑफिस सुरु करण्याचा नडेला यांना प्रस्ताव दिला. मायक्रोसॉफ्टचे हैदराबादमध्ये एक मोठे कॅम्पस आहे. आणखी एका ऑफिसमुळे हैदराबादमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.
 • मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नडेला दुसऱ्यांदा भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
 सत्या नडेला यांच्याबद्दल 
 • भारतीय वंशाचे ४८ वर्षीय सत्या नडेला गेल्या वर्षी ४ फेब्रुवारी २०१४ रोजी मायक्रोसॉफ्टचे सीईओ नियुक्त झाले. जगातली क्रमांक एकची कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदी नियुक्त होणारे ते पहिले भारतीय आहेत.
 • सत्या नडेलांचे वडील बी. एन. युगंधर माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे सचिव होते. काही काळ ते नियोजन आयोगाचे सदस्य देखिल होते. आता ते निवृत्त आहेत. वडिलांच्या भेटीसाठी सत्या आले आहेत.
 • सत्या नडेला यांनी वर्गमैत्रिण अनुपमासोबत लग्न केले आहे. अनुपमाचे वडील के. आर. वेणुगोपाल देखील आयएएस अधिकारी होते आणि ते युगंधर यांचे बॅचमेट होते.

वार्षिक १० लाख उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही

 • वार्षिक १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळणार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे.
 • नोंदणी असणाऱ्या ग्राहकाचे किंवा त्याच्या पती किंवा पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांवर असेल, तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत.  केंद्र सरकारने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
 • गेल्या महिन्यात केंद्रीय नागरीविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोलकात्यामध्ये पेड एलपीजीबाबत संकेत दिले होते.
 • यापूर्वी सरकारकारने स्वतःच्या इच्छेने एलपीजी गॅस वर मिळणारे अनुदान दुसऱ्यांना देण्याचे आव्हान केले होते. आतापर्यंत ५७ लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आतापर्यंत केंद्र सरकार सर्व ग्राहकांना एका वर्षातील १२ एलपीजी सिलिंडरवर अनुदान देत होते. मोदी सरकारच्या 'पहल' या योजने अंतर्गत एलपीजी अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यांत जमा केले जाते.

रिलायन्स जियोचे उद्घाटन

  Reliance Geo
 • रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला महत्त्वकांक्षी ४जी प्रोजेक्ट अर्थात 'जियो'ची घोषणा केली आहे. रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला कंपनीने ही सेवा लॉन्च केली आहे.
 • शाहरूख खानला 'रिलायन्स जियो'चे ब्रँड अॅम्बेसडर बनवण्यात आले आहे.
 • रिलायन्स कंपनीने आपल्या एक लाखांहुन जास्त कर्मचाऱ्यांना निशुल्क जियो मोबाइल सेवा देण्याची घोषणा केली आहे. येत्या मार्च-एप्रिलपासून ही ग्राहकांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी

 • बीसीसीआयची कार्यपद्धती पारदर्शक करण्यासाठी न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीची नियुक्ती करण्यात आली होती. जस्टिस लोढा या समितीचे अध्यक्ष होते.
 • लोढा समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) स्वरूप पुढच्या वर्षी पूर्णपणे बदलू शकते.
 हे बदल होऊ शकतात 
 • बीसीसीआयची सूत्रे क्रिकेटपटूंच्या हाती सोपवताना नेतेमंडळी आणि व्यावसायिक लोकांना बाहेर करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयचा पाया, व्यवस्थापन, काम करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलून जातील. 
 • प्रत्येक राज्यातून एकाच रणजी संघाची सूचना आहे. सध्या महाराष्ट्रातून तीन (मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ) तर गुजरातमधूनही तीन (गुजरात, बडाेदा, सौराष्ट्र) आणि आंध्रच्या दोन टीम (हैदराबाद, आंध्र प्रदेश) खेळतात. 
 • बीसीसीआयला सोसायटीमधून एका पब्लिक ट्रस्टमध्ये बदलण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या बीसीसीआय तामिळनाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १९७५ नुसार रजिस्टर्ड आहे.
 • बीसीसीआयचे उत्पन्न वितरित करण्याच्या मॉडेलमध्येही बदल करण्याची सूचना आहे.

ब्रिटीश थिंक टँक ‘सीआयबीआर’चा अहवाल

 • भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी आणि २०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थसत्ता म्हणून उदयाला येईल. पंधरा वर्षांनंतर भारताची अर्थव्यवस्था आजच्या पाचपट मोठी अर्थात १०,१३३ अब्ज डॉलरची असेल.
 • २०२९नंतर चीन व अमेरिकेला पिछाडीवर टाकून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. इंग्लंडचा मंद विकास दर पाहता भारत २०१९मध्ये इंग्लंडला मागे टाकेल. अर्थात २०१९ मध्ये भारत राष्ट्रकुल देशांत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 
 • अर्थव्यवस्थेचा आकार पाहता १५ वर्षांत फ्रान्स आणि इटलीला जी-८ मधून बाहेर पडावे लागेल. भारतासह ब्राझील या गटात सहभागी होईल. विशेष म्हणजे सध्या ब्राझील आणि फ्रान्सचा जीडीपी भारताहून अधिक आहे. परंतु १५ वर्षांनंतर आपली अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा तीनपट अधिक असेल.
 • ६८ युनिकॉर्नमध्ये ११ भारतीय : एक अब्ज डॉलरहून अधिक किंमत असलेल्या स्टार्टअप्सला युनिकॉर्न म्हटले जाते. जगातील ६८ युनिकॉर्नमध्ये ११ भारतीय आहेत.

धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये भारत दुसरा

 • भारतात सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या झपाटयाने कमी होत असली तरी, महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 
 • १९८० मध्ये भारतात धुम्रपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण ५३ लाख होते. २०१२ मध्ये हेच प्रमाण १ कोटी २७ लाख झाले आहे. जागतिक तंबाखू सेवनाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
 • धुम्रपानासंबंधी आरोग्य मंत्रालयाने संसदेत दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये ९३.२ अब्ज सिगारेटची विक्री झाली. २०१२-१३ च्या तुलनेत सिगारेट विक्रीमध्ये १० अब्जने घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये सिगारेटच्या उत्पादनातही ११७ अब्जवरुन १०५.३ अब्जपर्यंत घसरण झाली आहे.

रमादी शहर इराक आर्मीच्या ताब्यात

 • इराक आर्मीने रमादी शहर इसिसच्या ताब्यातून सोडवण्यात यश मिळवले आहे. गेल्या १८ महीन्यांदरम्यान आर्मीने मिळवलेला हा पहिला विजय आहे. इसिसने सिरिया आणि इराकच्या एका मोठ्या भागावर ताबा मिळवलेला आहे.
 • यूफ्रेट्स व्हॅली (फरात नदी घाटी) मध्ये असलेले रमादी शहर अनबर प्रांताची राजधानी आहे. 
 • यापूर्वी इराकच्या आर्मीने तिकरित शहरावरही ताबा मिळवला होता. त्याठिकाणी इराणी शिया मिलिशियाने त्यांना मदत केली होती.
 • जून २०१४मध्ये इसिसने सुमारे एक तृतीयांश इराकवर ताबा मिळवून सिरिया आणि इराकमध्ये खलीफाच्या सत्तेची घोषणा केली होती. 

दोन अपत्यांच्या धोरणास चीनमध्ये मान्यता

 • गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. सत्तारूढ सरकारने ‘हम दो, हमारे दो’ अर्थात दोन अपत्यांच्या धोरणास अधिकृतपणे मान्यता दिली आहे.
 • एक जानेवारीपासून नवे धोरण अमलात येणार आहे. गत तीन दशकांपासूनचे जुने धोरण यामुळे संपुष्टात येईल.
 • नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीत १५९ सदस्यांच्या अनुमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सध्या चीनची लोकसंख्या १ अब्ज ३७ कोटी एवढी आहे. 
 • जगातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये एक मूल धोरणामुळे अलीकडच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून सरकारने हे धोरणच बदलण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शहा निलंबीत

 • पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शहाच्या नमुन्यांमध्ये वाडाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचे (क्लोरटालिडोनचे) घटक सापडल्यामुळे यासिरला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.
 • आयसीसीचे डोपिंग विरोधी जे नियम आहेत त्यानुसार यासिरवर आता पुढील कारवाई होईल. यासिरने १३ नोव्हेंबरला २०१५ रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुने दिले होते.

1 टिप्पणी: