चालू घडामोडी : १४ जानेवारी


भारत-पाक परराष्ट्र सचिवस्तरीय बैठक तूर्तास रद्द

  • पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान १५ जानेवारी रोजी होणारी नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
  • २ जानेवारी रोजी अतिरेक्यांनी पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला केला, ज्यात ७ जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मदच्या या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने हा हल्ला चढवला होता.
  • पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्याचे भारताने स्पष्ट केले होते, तसे काही पुरावेही पाकिस्तानला देण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. त्यामुळे पाकिस्तान सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये काही जणांना संशयावरून ताब्यात घेतले.
  • या सर्व पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही बैठक तूर्तास रद्द करण्यात आली.

सानिया-हिंगिस जोडीचा जागतिक विक्रम

  • भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीने सलग २९ सामन्यात विजय मिळवताना महिला दुहेरीचा २२ वर्षापुर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
    Sania Mirza and Martina Hingis sets up new world record
  • याआधी रिकोची गिगि फर्नांडेझ आणि बेलारूसच्या नताशा झवेरेवा या जोडीने १९९४ साली सलग २८ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.
  • या विजयासह सानिया-हिंगस जोडीने सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांनी रोमानियाच्या रालुसा ओलारू आणि कझाकस्तानच्या यारोस्लावा श्वेडोवाचे आव्हान ४-६, ६-३, १०-८ असं संपुष्टात आणले. 
  • गतवर्षी एकत्र आलेल्या सानिया-हिंगीस यांनी एकामागोमाग एक विजेतेपदांचा धडाका लावताना १० डब्ल्यूटीए दुहेरी स्पर्धा जिंकल्या. तसेच यंदाच्या वर्षाची दणक्यात सुरुवात करताना या अव्वल जोडीने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

फिफाचे सरचिटणीस जेरोमी व्हॅल्क निलंबित

  • आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सरचिटणीस जेरोमी व्हॅल्क यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.
  • फिफाची सप्टेंबर २०१५ मध्ये बैठक झाली होती, त्या वेळी व्हॅल्क यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईवर नुकत्याच झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले असून त्यांच्यावर फिफाने आठ वर्षांकरिता बंदी घातली आहे. व्हॅल्क हे ब्लाटर यांचे निकटवर्तीय मानले जातात.
 जेरोमी व्हॅल्क यांच्यावरील आरोप 
  • २०१४ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी व्हॅल्क यांनी मदत केली होती असा त्यांच्यावर आरोप आहे.
  • २०१० च्या विश्वचषक स्पर्धेचे संयोजनपद मिळविण्यासाठी दक्षिण आफ्रिका फुटबॉल महासंघाने कॅरेबियन फुटबॉल प्रमुख जॅक वॉर्नर यांना दहा दशलक्ष डॉलर्सची रक्कम दिली होती. ही रक्कम देण्याबाबत व्हॅल्क यांचा हात असल्याचा आरोप व्हॅल्क यांच्यावर अमेरिकन गुन्हा अन्वेषण विभागाने ठेवला आहे.

  • व्हॅल्क यांना २००६ मध्येही फिफावरून बडतर्फ करण्यात आले होते. फिफाचे प्रायोजक मास्टरकार्ड कंपनीबरोबर असलेला करार ऐन वेळी रद्द करीत व्हिसा कार्ड कंपनीबरोबर करार करण्यात आला होता.
  • त्यामुळे फिफाला मास्टरकार्ड कंपनीला नुकसानभरपाई म्हणून ९० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले होते. व्हॅल्क यांच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला होता.
  • त्यामुळे त्यांना बडतर्फीच्या कारवाई सामोरे जावे लागले होते मात्र ब्लाटर यांनी पुन्हा त्यांची नियुक्ती केली होती. 

डॉ. पुनीता कुमार-सिन्हा इन्फोसिसच्या संचालकपदी

  • देशातील बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने डॉ. पुनीता कुमार-सिन्हा यांची संचालकपदी ( स्वतंत्र कार्यभार ) नियुक्ती केली आहे. 
  • डॉ. पुनीता सिन्हा (वय ५३) यांनी अमेरिकेतील अग्रमानांकीत कंपन्यांमध्ये काम केले आहे. आंतरराष्ट्रीय आणि उभरत्या बाजारांध्ये २५ वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी फंड मॅनेजमेंटचं काम पाहिलं आहे. यासह एसएकेएस मायक्रो फायनॅन्स आणि शोमा लिमिटेड या मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळात त्या होत्या.
  • डॉ. पुनीता सिन्हा या मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अर्थ राज्यमंत्री असलेल्या जयंत सिन्हा यांच्या पत्नी आहेत.
  • पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील वॉर्टन स्कूलमधून पुनीता सिन्हांनी मास्टर्सची पदवी घेतली आहे. तसेच आयआयटी दिल्लीतून त्यांनी केमिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे.
  • डॉ. पुनीता सिन्हा यांच्या इन्फोसिसमधील नियुक्तीवरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे. केंद्रीय मंत्र्याची पत्नी असल्याने पुनीता सिन्हा या इन्फोसिसच्या संचालकपदावर निवडल्या गेल्या अशी टीका करण्यात येतेय. 

अॅलन रिकमनचे निधन

  • 'हॅरी पॉटर' या जगप्रसिद्ध चित्रपट मालिकेतील 'प्रोफेसर स्नेप'ची भूमिका अजरामर करणारे ब्रिटिश अभिनेते अॅलन रिकमन यांचे निधन झाले. ६९ वर्षांचे रिकमन ब-याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते.
  • हॅरी पॉटरशिवाय त्यांच्या डाय हार्ड, ट्रूली मॅडली डीपली आणि रॉबिन हूड-प्रिन्स ऑफ थिफ्ज या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा