चालू घडामोडी : १५ जानेवारी


‘जुनो’ या यानाचा विक्रमी प्रवास

  • गुरू ग्रहाच्या अभ्यासासाठी सोडण्यात आलेल्या ‘जुनो’ या यानाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सौरशक्तीवर धावणाऱ्या या यानाने सूर्यापासून तब्बल ७९.३० कोटी किलोमीटर अंतर कापले आहे.
  • अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ (नासा) या संस्थेमार्फत ५ ऑगस्ट २०१२ रोजी सोडण्यात आलेले हे यान ४ जुलै २०१६रोजी गुरु ग्रहावर पोहचेल.
  • जुलैमध्ये तेथे पोचल्यावर गुरूपासून पाच हजार किलोमीटर अंतरावरून ते एक वर्ष तेथे घिरट्या घालून माहिती गोळा करेल. गुरूवरील वातावरण, त्याची जडणघडण आणि अन्य बाबींची माहिती ‘जुनो’कडून पाठविली जाणार आहे.
  • सूर्यापासून प्रचंड अंतर कापण्याचा या आधीचा विक्रम ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’च्या ‘रोसेटा’ या यानाने केला होता. ‘67 पी/चुर्युमोव्ह-गेरासिमेन्को’ या धूमकेतूच्या अभ्यासासाठी ऑक्टोबर २०१२ मध्ये सोडण्यात आलेल्या ‘रोसेटा’ने ७९.२० कोटी किलोमीटर अंतर कापले होते.
 ‘जुनो’बद्दल 
  • वजन : ४ टन 
  • सौरपंखांची लांबी : ९ मीटर लांबीचे २ सौरपंखे
  • सौरपंखांवरील सौरघट : १८,६९८ व त्यापासून १४ किलोवॉट वीजनिर्मिती
  • निर्मितीचा खर्च : १.१ अब्ज डॉलर
  • यानाचा वेग : ३८,००० किलोमीटर प्रतितास 
  • यानाने कापलेले अंतर  : ७९.३० कोटी किलोमीटर

जागतिक बॅंकेकडून ‘आधार’ प्रणालीचे कौतुक

  • जागतिक बॅंकेतर्फे १५ जानेवारी २०१६रोजी डिजिटल लाभांशांसंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार भारतातील आधार ही डिजिटल ओळख प्रणाली भारत सरकारसाठी उपयुक्त ठरली आहे.
  • आधार कार्ड योजनेने भारत सरकारचे वर्षाला साडेसहाशे कोटी रुपये वाचविले असून, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. यासोबतच सर्व घटकांचा समावेश, उपयुक्तता व नावीन्यता या कसोट्यांवरही आधार प्रणाली उत्कृष्ट आहे, असे जागतिक बॅंकेकडून आज सांगण्यात आले.
  • भारतातील अंदाजे शंभर कोटी लोक आधार प्रणालीद्वारे जोडले आहेत. या प्रणालीद्वारे गरीब वंचितांनाही डिजिटल ओळख मिळाली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
  • जागतिक बॅंक समूहाचे प्रमुख : जिम यॉंग कीम
  • जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ : कौशिक बसू

संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम पहिले राज्य

  • संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. सिक्कीममध्ये सुमारे ७५ हजार हेक्टर शेतजमिनीत शाश्वत शेती सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरच्या अखेरीस सिक्किंने संपूर्ण सेंद्रिय हा दर्जा मिळविला आहे.
  • गंगटोक येथे १८ जानेवारी रोजी शाश्वत शेतीविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या या दर्जाची औपचारिक घोषणा करतील.

भारत अमेरिकेचा सर्वांत मोठा शास्त्रज्ञ निर्यातदार

  • नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या अहवालानुसार इतर देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातून अमेरिकेमध्ये नऊ लाख पन्नास हजार शास्त्रज्ञ आणि अभियंते स्थलांतरित झाले आहेत. 
  • इतर देशांमधून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झालेल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची संख्या २००३मध्ये दोन कोटी सोळा लाख होती. ही संख्या २०१३मध्ये दोन कोटी नव्वद लाखांवर गेली आहे.
  • यापैकी बहुतांश भारतीय आहेत. दहा वर्षांमध्ये वाढलेल्या संख्येपैकी तब्बल ८५ टक्के फक्त भारतीयच आहेत.
  • अमेरिकेतील एकूण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांपैकी १६ ते १८ टक्के स्थलांतरित आहेत. यापैकी २२ टक्के व्यक्तींना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.
  • अमेरिकी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या तुलनेत स्थलांतरित नागरिकांनी अधिक चांगले यश मिळविल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

जेष्ठ अभिनेते राजेश विवेक यांचे निधन

  • लगान, स्वदेस या गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे १५ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. हैदराबादमध्ये ते एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते.
  • त्यांनी श्याम बेनेगल यांच्या जुनून (१९७८) चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदापर्ण केले होते. 'महाभारत', 'भारत एक खोज' आणि 'अघोरी' या गाजलेल्या दूरचित्रवाहीनी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
  • सुरुवातीला 'विराना', 'जोशिले' या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून आपली छाप उमटवली होती. त्यानंतर त्यांनी विनोदी भूमिकेतून आपली छाप उमटवली. बंटी और बबली, भूत अंकल, अग्निपथ, सन ऑफ सरदार या चित्रपटातही भूमिका केल्या होत्या.
  • ऑस्कर पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या 'लगान' चित्रपटात त्यांनी साकारलेली गुरनची भूमिका प्रचंड गाजली होती. स्वदेस चित्रपटात त्यांनी पोस्टमास्तरची भूमिका केली होती. गाजलेल्या बँडिट क्वीन (१९९४) चित्रपटात त्यांनी दरोडेखोराची भूमिका केली होती.

उत्तरप्रदेशमध्ये २ पत्नी असणारा शिक्षक नोकरीस अपात्र

  • उत्तर प्रदेश सरकारने दोन पत्नी असणारी व्यक्ती उर्दू शाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने आदेशही जारी केले आहेत.
  • पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये ३५०० उर्दू शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपली वैवाहिक स्थिती आणि त्याबाबतची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • दोन पत्नी असलेले पुरुष किंवा पतीला आणखी एक पत्नी असलेल्या महिला या नोकरीसाठी अपात्र ठरणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

इंडोनेशियामध्ये इसिसचा दहशतवादी हल्ला

  • १४ जानेवारी २०१६ रोजी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे मोटारसायकलवर आलेल्या सुमारे १४ हल्लेखोरांनी गोळीबार केला, ग्रेनेड फेकले आणि सुमारे आठ ठिकाणी मोठे बॉम्बस्फोट केले. जकार्तामधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऑफिसला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
  • या हल्ल्यामध्ये १७ जण ठार झाले आहेत. त्यात पाच हल्लेखोर आणि सात पोलिसांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकही आहेत. इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
  • पाच तासांच्या संघर्षानंतर जकार्ता पोलिसांनी थमरीना मार्गावरील सरीनाह शॉपिंग मॉल सुरक्षित जाहीर केला.
  • इंडोनेशियात २००९नंतर हा पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला आहे. २००९मध्ये वेळी दोन मोठ्या हॉटेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० जण ठार झाले होते.
  • इंडोनेशियाचे राष्ट्रपती : जोको विडोडो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा