चालू घडामोडी : १७ जानेवारी



इराणवरील आर्थिक निर्बंध हटविले

  • इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात जागतिक पातळीवर जुलै २०१५मध्ये करण्यात आलेल्या यशस्वी करारानंतर इराणवरील जाचक आर्थिक निर्बंध पूर्णत: हटविण्यात आल्याची घोषणा १७ जानेवारी रोजी अमेरिका व युरोपीय महासंघाद्वारे करण्यात आली आहे.
  • मात्र, त्याचवेळी इराणने राबवलेल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरून अमेरिकेने पुन्हा नवीन र्निबध लादले.
  • इराणचे अध्यक्ष : हसन रुहानी
 पार्श्वभूमी 
  • इराण अण्वस्त्रांची निर्मिती करत असल्याच्या संशयावरून त्याच्यावर गेल्या काही वर्षांपासून कठोर आर्थिक र्निबध लादण्यात आले होते. तेलसाठय़ांच्या बाबतीत समृद्ध असलेल्या इराणची अर्थव्यवस्था या आर्थिक र्निबधांमुळे मोडकळीस आली होती.
  • या पार्श्वभूमीवर १४ जुलै २०१५ रोजी इराणने अमेरिकेसह ब्रिटन, रशिया, चीन, फ्रान्स व जर्मनी या देशांशी करार केला होता. त्यानुसार इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर बंधने घालण्याचे मान्य केले होते.
  • संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये इराण अणुकरारात मान्य केलेल्या अटींचे काटेकोर पालन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणवरील र्निबध उठवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
 र्निबध उठल्याने इराणला मिळणारा लाभ 
  • आंतरराष्ट्रीय बाजारात इराणचे तेल विकले जाऊ शकेल. त्यातून अब्जावधी डॉलरची कमाई होऊन इराणची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होणार आहे 
  • इराणच्या १०० अब्ज डॉलर किमतीच्या मालमत्ता गोठवण्यात आल्या होत्या. त्या खुल्या करण्यात आल्या आहेत
  • इराणच्या बँका आता जागतिक पातळीवर व्यवहार करू शकतील
  • इराणचे अन्नपदार्थ, गालिचे व व्यावसायिक विमानांचे सुटे भाग यांचा व्यापार सुरू होऊ शकेल
 अणुकरारातील अटी काय होत्या? 
  • युरेनियमचे सेंट्रीफ्युजेस दोनतृतीयांशने कमी करणे.
  • युरेनियमचा साठा कमी करणे.
  • शस्त्रयोग्य प्लुटोनियमची निर्मिती करणाऱ्या ‘अराक’ अणुभट्टीचा गाभा बंद करणे.

कोहलीच्या वेगवान ७००० धावा

  • विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ७००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सच्या नावावर होता.
  • कोहलीने १६१ डावांमध्ये ७००० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर, डिव्हिलर्सला त्यासाठी १६६ डावांत फलंदाजी करावी लागली होती.
  • या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर आहे.

सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा बोपन्ना-मर्जिया उपविजेते

  • दुहेरीतील भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जेमी मरे आणि ब्रुनो सोरेस या जोडीने फायनलमध्ये विजय मिळवून किताब आपल्या नावे केला.
  • बोपन्ना आणि मर्जिया या चौथे मानांकन प्राप्त जोडीला अंतिम सामन्यात ब्रिटनचा जेमी मरे आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस यांच्याकडून ३-६, ६-७ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला.
  • गत वर्षी स्पर्धेच्या दुहेरी लढतीत बोपन्नाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरसह जेतेपदाला गवसणी घातली 

‘आय-पॅक’ संस्थेची स्थापना

  • प्रशांत किशोर यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापनाचे व्यावसायिक संस्थाकरण केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘आय-पॅक’ नावाची सल्लागार संस्था उभारली आहे. या संस्थेचे मुख्यालय पाटण्यात असेल.
  • या संस्थेसाठी निवडणूक नियोजन, माहिती गोळा करणे, संदर्भ पाहणी, प्रत्यक्ष प्रचारात सहभाग, प्रसारमाध्यमांचा वापर, सोशल नेटवर्किंग साईट्चा वापर, संशोधन, विश्लेषण आदीची आवड असलेल्या युवकांची चार स्तरावर निवड होणार आहे.
  • परिचय पत्राची निवड, फोनवरून संभाषण, प्रकरण (केस) अभ्यास व सरतेशेवटी मुलाखत अशी निवड प्रक्रिया असेल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांना वर्षांला लाखो रूपयांचे पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. अलीकडेच या विद्यार्थ्यांच्या मुलाखती नोएडात पार पडल्या आहेत.
 प्रशांत किशोर यांच्याबद्दल 
  • २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणावर निवडणूक व्यवस्थापनाची चर्चा झाली. भाजप व नरेंद्र मोदी यांनी प्रशांत किशोर यांनाच या कामी नेमले होते. ‘चाय पे चर्चा’ पासून ते ‘निचली राजनिती’ पर्यंतची आखणी प्रशांत किशोर यांनी केली होती.
  • मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप अध्यक्ष झालेल्या अमित शहा यांच्याशी मतभेद झाल्याने प्रशांत किशोर यांनी बिहारचा रस्ता धरला व थेट मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी केली.
  • भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निवडणूक ‘मायक्रोमॅनेजमेंट’ उध्वस्त करून प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नितीशकुमार व त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला.

तैसई लँग वेन तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्षा

  • तैवानच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या तैसई लँग वेन यांनी सत्ताधारी कोमिटांग पक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. तैसई यांच्या डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला ६० टक्के मते पडली आहेत.
  • कोमिटांग पक्षाच्या येथील मुख्यालयासमोर जमलेल्या भावनाप्रधान समर्थकांना संबोधित करताना पक्षाचे उमेदवार इरिक चू यांनी पराभव मान्य केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा