चालू घडामोडी : १८ जानेवारी


मुंबई मॅरेथॉन २०१६

  Standard Chartered Mumbai Marathon 2016
 • १३व्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीत पेसमेकर (मुख्य शर्यतपटूची गती कायम राखणारा) म्हणून पहिल्यांदाच सहभागी झालेल्या केनियाच्या गिडीयन किपकेटरने स्पर्धा विक्रमासह जेतेपदाला गवसणी घातली.
 • किपकेटरने २ तास ०८ मिनिटे व ३५ सेकंदांत ४२.१९५ किलो मीटरचे अंतर पूर्ण करून मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धा विक्रम नोंदवला. त्याने २०१३मध्ये युगांडाच्या जॅक्सन किप्रोपने नोंदवलेला २ तास ०९ मिनिटे व ३२ सेकंदांचा विक्रम मोडला.
 • इथोपियाचा सेबोका डिबाबा (२ तास ०९ मिनिटे व २० सेकंद) आणि केनियाचा मॅरियस किमुताई (२ तास ०९ मिनिटे व ३९ सेकंद) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • महिला गटात माजी विजेत्या आणि स्पर्धा विक्रम नावावर असलेल्या केनियाच्या व्हॅलेंटाइन किपकेटरला (२:३४:०७ सेकंद) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेनेमोने २ तास २७ मिनिटे ५० सेकंदाची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला, तर केनियाच्या बोरनेस कितूरला २ तास ३२ मिनिटांच्या वेळेसह दुसरे स्थान मिळाले.
 भारतीय गटातील निकाल 
 • रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सैन्यदलाच्या नितेंद्र सिंग रावतने पूर्ण मॅरेथॉन भारतीय गटात स्पर्धा विक्रमाची नोंद केली. त्याने २ तास १५ मिनिटे व ४८ सेकंदात शर्यत पूर्ण करून २०१२ मध्ये राम सिंग यादवच्या (२:१६:५९ सेकंद) स्पर्धा विक्रमाला मागे टाकले.
 • पूर्ण मॅरेथॉन महिला विभागात सुधा सिंगने (२:३९:२८ सेकंद) प्रथम स्थान पटकावले, तर ललिता बाबर (२:४१:५५ सेकंद) आणि ओ. पी. जैशा (२:४३:२६ सेकंद) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 अर्ध मॅरेथॉन 
 • अर्ध मॅरेथॉन महिला विभागात नागपूरच्या मोनिका राऊतने १ तास १७ मिनिटे २० सेकंदांची वेळ नोंदवून बाजी मारली, तर सांगलीच्या मनीषा साळुंखेने (१:१९:१७ सेकंद) आणि नाशिकच्या मोनिका आथरेने (१:२०:०८ सेकंद) अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
 • पुरुष विभागात कोल्हापूरच्या दीपक कुंभारने १ तास ०६ मिनिटे ०१ सेकंदासह अव्वल स्थान पटकावले. बेल्लिअप्पा एबी. (१:०६:३७ सेकंद) आणि इंद्रजीत पटेल (१:०६:५९ सेकंद) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गौरव सहस्त्रबुद्धेला 'भारत पुरस्कार'

 • भारतीय बाल कल्याण परिषदेच्या २०१५च्या शौर्य पुरस्कारांची १८ जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली. एकूण २५ पुरस्कार प्राप्त शूर बालकांमध्ये महाराष्ट्रातील एकूण ४ बालकांचा समावेश आहे. 
 • नागपूरच्या हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागातील अंबाझरी तलावात बुडणाऱ्या ४ मुलांचे प्राण इयत्ता १०वीत शिकत असलेल्या गौरवने वाचवले होते. या मुलांना वाचवताना गौरवला मात्र आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. 
 • गौरवच्या त्यागाला सलाम करत परिषदेनं गौरवला मरणोत्तर 'भारत पुरस्कार' देण्याची घोषणा केली. परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्कारांमध्ये भारत पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.
 • गौरव सहस्त्रबुद्धेसोबतच जळगाव जिल्ह्यातील निलेश भील, वर्धा येथील वैभव घांगरे, मुंबईतील वाळकेश्वरचा मोहित दळवी यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
 • भारतीय बाल कल्याण परिषेदेच्या अध्यक्षा : गीता सिद्धार्थ 

अजित चंडिला व हिकेन शहावर बंदी

 • आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरलेल्या अजित चंडिला याच्यावर आजीवन, तर हिकेन शहा याच्यावर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शिस्तपालन समितीने याबाबतचा अंतिम निर्णय दिला आहे.
 • तीन वर्षांपूर्वीच्या आयपीएलच्या ६व्या पर्वात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना संघसहकारी श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्या साथीने स्पॉटफिक्सिंग केल्याचा या तिघांवर आरोप होता. श्रीशांत आणि अंकित या दोघांना बीसीसीआयने यापूर्वीच आजीवन बंदीची शिक्षा ठोठावली आहे.
 • स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चांडिला याच्याबरोबर पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावरदेखील आरोप ठेवण्यात आला आहे. शिस्तपालन समितीने रौफ यांच्यावरील निर्णय ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे.
 बीसीसीआयचा निर्णय 
 • अजित चंडिलाला भ्रष्टाचार आणि गैरवर्तन प्रकरणी दोषी सिद्ध ठरवण्यात आले आहे. त्याच्यावर बीसीसीआयच्या करप्शन कोड अंतर्गत आजीवन बंदी लावण्यात आली आहे. तो क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत कोणत्याच माध्यमातून सहभागी होऊ शकणार नाही.
 • हिकेन शाहला बीसीसीआयच्या अँटी करप्शन कोड अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावर पाच वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. त्यादरम्यान तो क्रिकेटबरोबर संबध ठेवू शकणार नाही.
 शिस्तपालन समितीचे सदस्य 
 • शशांक मनोहर (बीसीसीआय अध्यक्ष)
 • ज्योतिरादित्य सिंधिया
 • निरंजन शाह

पंजाबी गायिका मनप्रीत अख्तर यांचे निधन

 • 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील 'तुझे याद न मेरी आयी' या गीतामुळं हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध पंजाबी गायिका मनप्रीत अख्तर यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले.
 • संगीताची पार्श्वभूमी असलेल्या मनप्रीत यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली होती. शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या अख्तर यांनी हिंदी व पंजाबी चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली होती.
 • 'कुछ कुछ होता है'मधील तुझे याद न मेरी आई' या गीतामुळे त्या खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

हैदराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थ्याची आत्महत्या

 • हैदराबाद केंद्रीय विद्यापीठामधील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी केंद्रीय श्रम मंत्री बंडारू दत्तात्रय आणि विद्यापीठाच्या कुलगुरुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 • १७ जानेवारी रोजी २५ वर्षीय रोहित वेमलू या दलित विद्यार्थ्याने वसतीगृहात गळफास घेतला होता. या घटनेच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत विद्यीपीठ प्रशासन आणि बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली होती.
 • आत्महत्या केलेला रोहित वेमलु गुंटूर येथील रहिवासी होता. गेल्या आठवड्यात विद्यापीठाने वसतीगृहातील पाच विद्यार्थ्यांना निलंबित केले होते, त्यापैकी एक रोहित होता. रोहित विद्यापीठात पीएचडी करत होता.
 • रोहित वेमलु हा आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्याच्यासह चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालय यासह अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती.
 • या पाच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ १० विद्यार्थी संघटनांनी उपोषण करत त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. या संघटनांचे म्हणणे होते, की सर्व विद्यार्थी सामाजिक बहिष्काराचे शिकार आहेत.

ब्रिटनमध्ये इंग्रजी भाषा येणे अनिवार्य

 • ब्रिटनमध्ये राहणाऱ्या सर्व स्थलांतरितांना इंग्रजी भाषेच्या एका चाचणीत उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 • या चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास, कितीही वर्षे ब्रिटनमध्ये वास्तव्य असले तरीही त्या व्यक्तीस मायदेशी परत धाडले जाईल, असा निर्णय पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी जाहीर केला. 
 • पालकांपैकी एक जण ब्रिटनमध्ये स्थायिक झाले असतील, तर त्यांच्या मुलांना आपोआप ब्रिटनचे नागरिकत्व मिळते. ज्यांचे वडील ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत; त्यांना मूळ देशी परत पाठविले जाणार नाही.
 • अशा कुटुंबामध्ये त्या मुलांच्या आईने इंग्रजी भाषेची चाचणी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यामुळे एखादी महिला या चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झाली, तर तिला मूळ देशी जावे लागेल; मात्र तिचा पती आणि मुले ब्रिटनमध्ये राहू शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा