चालू घडामोडी : २० जानेवारी


‘आयआरएनएसएस-१ई’चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) २० जानेवारी २०१६ रोजी भारतीय विभागीय दिशादर्शक उपग्रहाचे (आयआरएनएसएस-१ई) पीएसएलव्ही-३१ प्रक्षेपकाच्या माध्यमातून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले.
  • इस्त्रो‘च्या श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण तळावरून ‘आयआरएनएसएस-१ई’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ४४.४ मीटर इतकी उंची असलेल्या या उपग्रहाचे वजन १४२५ ग्रॅम इतके आहे.
  • भारताने आत्तापर्यंत चार दिशादर्शक उपग्रह (आयआरएनएसएस-१ए, १बी, १सी आणि १डी) अवकाशात सोडले आहेत. पुढच्या दोन महिन्यात आणखी दोन दिशादर्शक उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहेत.
  • अवकाशातील सात आणि पृथ्वीवरील दोन अशा एकूण नऊ उपग्रहांच्या साहाय्याने भारतीय दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
  • भारताची दिशादर्शक यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत जगातील असा चौथा देश असेल ज्याच्याकडे स्वत:ची उपग्रह आधारीत दिशादर्शक यंत्रणा असेल. 
  • या दिशादर्शक यंत्रणेमुळे भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अधिक सुरक्षित होणार असून, लष्कराला विशेषकरुन क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करण्यासाठी मदत मिळणार आहे. 
  • भारताच्या भरवशाच्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाव्दारे केलेले हे ३३वे यशस्वी प्रक्षेपण होते. इस्त्रोची नव्या वर्षातील ही पहिलीच मोहिम होती.
भारताचे आजपर्यंतचे सोडलेले दिशादर्शक उपग्रह
१ जुलै २०१३आयआरएनएसएस-१ए
४ एप्रिल २०१४आयआरएनएसएस-१बी
१६ ऑक्टोबर २०१४आयआरएनएसएस-१सी
२८ मार्च २०१५आयआरएनएसएस-१डी
२० जानेवारी २०१६आयआरएनएसएस-१ई

फ्रान्समध्ये आर्थिक आणीबाणी

  • युरोपीय संघातील प्रमुख देश असलेल्या फ्रान्सला आर्थिक समस्यांनी घेरले आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांनी आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे.
  • फ्रान्समध्ये बेरोजगारांची संख्या वाढत असून, हे प्रमाण १०.६ टक्क्यांवर गेले आहे. बेरोजगारांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकार अनुदान देण्यात येणार असून, यासाठी फ्रान्स सरकारने दोन अब्ज युरोचे पॅकेज जाहीर केले आहे. 
  • आर्थिक आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ नोकरी नसलेल्या कर्मचाऱ्याला संधी दिल्यास कंपनीला सरकारकडून २००० युरोचे अनुदान दिले जाणार आहे.
  • युरोपमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ९.८ टक्के आहे. जर्मनीमध्ये हे प्रमाण ४.२ टक्के आहे. गेल्या तीन दशकांपासून समस्या बनलेल्या बेरोजगारीशी सामना करताना अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करणे हे सरकारसमोर आव्हान आहे. बेरोजगारीमुळे आर्थिक आणि सामाजिक अनिश्चितता वाढली असल्याने सरकारला आर्थिक आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. 

तामिळनाडूमध्ये ‘अम्मा कॉल सेंटर’

  • नागरिकांना सरकारी सेवा तत्पर सेवा मिळावी, यासाठी तामिळनाडू सरकारने ‘अम्मा कॉल सेंटर’चे उद्घाटन २० जानेवारी २०१६ रोजी केले.
  • हे कॉल सेंटर वर्षभर दिवसा सुरू राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जयललिता यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला. सरकारी कामाबाबतच्या तक्रारी नागरिकांनी ११०० हा टोल फ्री क्रमांकांवर नोंदविल्यास त्यांना तत्पर सेवा उपलब्ध होईल.
  • तक्रारींचे स्वरूप आणि ती करणाऱ्याचे नाव यांची संगणकावर नोंद झाल्यानंतर ई-मेल, एसएमएस व दूरध्वनीद्वारे ती पुढे संबंधित विभागांना पाठविण्यात येणार आहे.
  • या प्रक्रियेची माहिती तक्रारदाराला एसएमएसवरून कळविण्यात येणार आहे. तक्रारी, समस्येवर काय कार्यवाही झाली, हेही एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
  • नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न या कॉल सेंटरद्वारे होणार आहे. विविध माध्यमांद्वारे समस्या मांडता येणार असल्यामुळे त्या सुटण्याची शक्यता यापुढे वाढणार आहे.

पाकिस्तानमधील यू-ट्यूबवरील बंदी हटविली

  • पाकिस्तानमध्ये गेल्या तीन वर्षांपासून असलेली यू-ट्यूबवरील बंदी मागे घेण्यात आली आहे. सरकारला आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढून टाकता येण्यासारखे स्थानिक व्हर्जन गुगलने तयार केल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • यू-ट्यूबवर २०१२मध्ये ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’ हा इस्लामविरोधी चित्रपट अपलोड झाल्यानंतर अनेक मुस्लिमबहुल देशांमध्ये हिंसाचार उसळला होता. पाकिस्तानमध्येही हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्यानंतर सरकारने यू-ट्यूबवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
  • यू-ट्यूबच्या नव्या व्हर्जननुसार, सरकारला वाटणारा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकता येणे शक्य असल्याने आता ही बंदी मागे घेतली आहे. गुगलने मात्र आपण ठरविलेल्या नियमांव्यतिरिक्त स्वत:हून कोणताही मजकूर काढून टाकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोट्यधीशांच्या संख्येत भारत चौथा

  • न्यु वर्ल्ड हेल्थ संस्थेच्या ‘एशिया पॅसिफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’नुसार, एशिया-पॅसिफिक देशांमधील सर्वाधिक निव्वळ मूल्य संपदा (हाय नेट वर्थ) असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
  • ज्या व्यक्तीकडे १० लाख डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांना हाय नेट वर्थ इंडिविज्युअल्स अर्थातच कोट्याधीश मानले जाते.
  • भारतात तब्बल २.३६ लाख कोट्यधीश असून आशिया-पॅसिफिक क्षेत्रात कोट्यधीशांच्या संख्येत भारताचा चौथा क्रमांक लागतो. एशिया-पॅसिफिक क्षेत्रात जपानमध्ये सर्वाधिक (१२.६० लाख) कोट्याधीश आहेत.
  • कोट्याधीशांच्या संख्येत चीन (६.५४ लाख) व ऑस्ट्रेलिया (२.९० लाख) अनुक्रमे दुसऱया व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतानंतर सिंगापूर पाचव्या क्रमांकावर असून येथील कोट्याधीशांची संख्या २.२४ लाख आहे.
  • दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा क्रमांक खुप खाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.

पाकच्या पेशावरमधील विद्यापीठावर हल्ला

  • पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील बाचा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात २५ जण ठार तर शेकडो विद्यार्थी जखमी झाले आहेत. 
  • बाचा खान हे वायव्य पाकिस्तानच्या चारसड्डा परिसरात आहे. या विद्यापीठात कविसंमेलनाचे आजोजन करण्यात आले होते, ज्यास उपस्थित राहण्यासाठी अनेक पाहुणे व ६०० हून अधिक विद्यार्थी विद्यापीठात आले होते. याच कार्यक्रमाच्या लगबगीचा व परिसरातील दाट धुक्याचा फायदा घेत हे दहशतवादी विद्यापीठाच्या आवारात घुसले व त्यांनी हल्ला केला. 
  • सुमारे ३५ मिनिटांच्या या थैमानानंतर लष्करी जवानांनी विद्यापीठात प्रवेश केला. दोन तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्यांना कंठस्नान घालून विद्यापीठातील क्रौर्य रोखले.
  • गेल्या वर्षी पेशावरमधील लष्कराच्या शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ला झाला होता ज्यात १३४ विद्यार्थी प्राणास मुकले होते.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान : नवाज शरीफ

1 टिप्पणी: