चालू घडामोडी : २३ जानेवारी


नेताजींच्या जीवनाशी संबंधित १०० गोपनीय फायली खुल्या

    Netaji Subhashchandra Bose
  • थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित शंभर गोपनीय फायली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुल्या करण्यात आल्या. यावेळी मोदींच्या हस्ते नेताजीपेपर्स डॉट कॉम या वेबपोर्टलचेही अनावरण करण्यात आले.
  • २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ११९वी जयंती आहे. राष्ट्रीय संग्रहालयामध्ये नेताजींच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रक्रियेला प्रारंभ झाला. यामुळे नेताजींच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू उघड होतील.
  • भारताचे राष्ट्रीय संग्रहालय दरमहा या फायलींच्या २५ डिजिटल प्रती प्रसिद्ध करणार आहे. या कार्यक्रमाला नेताजींच्या सर्व नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते.
  • यापूर्वी ४ डिसेंबर २०१५ रोजी पंतप्रधान कार्यालयाने ३३ गोपनीय फायलींचा संग्रह प्रसिद्ध करत तो भारताच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्त केला होता.

पर्रिकर यांनी देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकावला

  • देशातील सर्वात उंच खांबावर सर्वात मोठा राष्ट्रध्वज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पहारी मंदिर (झारखंड) येथे फडकावला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११९व्या जयंतीला हा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.
  • ६६ फूट लांब व ९९ फूट रूंद असा राष्ट्रध्वज पर्रिकर यांनी २९३ फूट उंच खांबावर फडकावला. आतापर्यंतचा सर्वात मोठा ९६ फूट लांब व ६४ फूट रूंद राष्ट्रध्वज फरिदाबाद येथे २५० फूट उंचीच्या खांबावर गेल्यावर्षी फडकावण्यात आला होता.
  • पर्रिकर यांनी यावेळी रक्षा शक्ती विद्यापीठाची कोनशिलाही ऑनलाईन बसवली. गुजरात, राजस्थान यांच्यानंतर झारखंड हे रक्षा शक्ती विद्यापीठ असणारे तिसरे राज्य ठरले आहे.
  • पोलीस विज्ञान व अंतर्गत सुरक्षा या विषयात हे विद्यापीठ प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम राबवणार आहे. २५ एकर जागेत हे विद्यापीठ उभारले जात असून तेथे दरवर्षी ३०० ते ५०० विद्यार्थी शिकू शकतील.
  • झारखंडचे मुख्यमंत्री : रघुबर दास
  • झारखंडच्या राज्यपाल : श्रीमती द्रौपदी मुरमू

वांडा समूहाची १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

  • चीनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या वांग जिआनलिन यांनी भारतामध्ये औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. गुंतवणुकीचा विचार केला तर भारतातील ही सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ठरेल.
  • जिआनलिन यांच्या वांडा समूहाने हरयाणा सरकारशी करार केला असून औद्योगिक वसाहत उभारण्याची तयारी दर्शवली आहे. वांडा इंडस्ट्रियल न्यू सिटी असं या इंडस्ट्रियल पार्कचे नाव असेल आणि याच वर्षी कामाला सुरुवात होणार आहे. 
  • जवळपास १३ चौरस किलोमीटर विस्तारात ही वसाहत उभी राहणार असून सॉफ्टवेअर, वाहनोद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमधल्या कंपन्या या वसाहतीत असतील.
  • याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून वांडा कल्चरल टुरिझम सिटी आणि रेसिडेंट डिस्ट्रिक्टही विकसित करण्यात येणार आहे.
  • वांडा कराराच्या पूर्ततेसाठी वांग जिआनलिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यामध्ये जून २०१५पासून बोलणी सुरू होती.

फेडररचे ग्रँडस्लॅम विजयाचे त्रिशतक

    Roger Federer
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला ३००वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला.
  • असा विक्रम करणारा फेडरर हा पहिलावहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. आता फक्त मार्टिना नवरातिलोव्हा ३०६ ग्रँडस्लॅम विजयांसह फेडररच्या पुढे आहे.
  • याचप्रमाणे कारकीर्दीतील पाचवे ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्यासाठी तो उत्सुक आहे.
  • १९९९मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या रणांगणावर फेडररच्या ग्रँड स्लॅम विजयाच्या अध्यायाला प्रारंभ झाला होता. त्यावेळी फेडररने मायकेल चँगला पहिल्याच फेरीत हरवले होते. 

शिवनारायण चंद्रपॉल निवृत्त

  • वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने २३ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला.
  • शिवनारायण चंद्रपॉलने आपल्या २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १६४ कसोटी आणि २६८ एकदिवसीय सामन्यांत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • तो वेस्ट इंडीजचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने ११,८६७ धावा केल्या आहेत. तर, ब्रायन लाराच्या ११,९५३ धावा आहेत.
  • त्याला लाराला मागे टाकण्यासाठी अवघ्या ८६ धावांची गरज होती. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा