चालू घडामोडी : २ जानेवारी


सेन्सॉर बोर्डाच्या पुनर्रचनेसाठी बेनेगल समिती

  • चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे म्हणजेच सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी केंद्र सरकारने विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. आगामी दोन महिन्यांत ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल.
  • बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीत निर्माते राकेश ओ. पी. मेहरा, पीयूष पांडे, चित्रपट समीक्षक भावना सोमैया व अरुण जेटली यांच्या मंत्रालयातील संयुक्त सचिव संजय मूर्ती यांचाही यात समावेश आहे.
  • बॉलिवूडसह देशभरातील चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाची परवानगी अत्यावश्यक असते. साहजिकच या मंडळाच्या अध्यक्षांसह त्यावरील सदस्य हे चित्रपट क्षेत्रातील जाणकार असावेत अशी अपेक्षा असते.
  • प्रत्यक्षात गेली काही वर्षे हे मंडळ त्यातील सदस्यांमुळे सातत्याने वादात सापडत राहिले. वशिल्याने पात्रता नसलेल्या लोकांची या मंडळावर बिनदिक्कत वर्णी लागत राहिल्याच्या व चित्रपटांना सेन्सॉरची परवानगी देताना सर्रास भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत.
  • सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष : पहलाज निहलानी

अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मंजूर

  • पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यात आले असून, १ जानेवारीपासून तो भारताचा नागरिक असेल.
  • मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्याला भारतात राहू देण्यात यावे, अशी विनंती करत अदनान सामीने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करत काही दिवसांपूर्वी अदनान सामीने पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग केला होता.
  • मूळचा लाहोरचा असणारा अदनान सामी १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा पर्यटक व्हिसावर भारतात आला होता. अदनान सामी गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहत आहे. त्याने बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही अनेक गाणी गायली आहेत.
  • कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांचे निधन

  • यांचे निस्पृह वृत्ती आणि ऋजू व्यक्तिमत्वाने भारतीय राजकारणात आदराचे स्थान मिळविणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अर्धेंदू भूषण ऊर्फ ए. बी. बर्धन (९२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
  • नव्वदीच्या दशकाचे वैशिष्टय़ राहिलेल्या आघाडीच्या अस्थिर राजकारणात त्यांनी पक्षाचे सुकाणू समर्थपणे सांभाळले होते.
  • बर्धन दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात राहत होते. महाराष्ट्रातील कामगार संघटना व डाव्या चळवळीवर त्यांनी आपल्या निरलस योगदानाने छाप पाडली होती.
  • १९५७मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले. परंतु, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
  • त्यानंतर ते ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ या देशातील सर्वात जुन्या कामगार संघटनेचे सचिव व अध्यक्ष बनले.
  • १९९० मध्ये दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करत ते कम्युनिस्ट पक्षाचे उपसचिव बनले. १९९६मध्ये इंद्रजित गुप्त यांच्या जागी त्यांची पक्षाच्या सचिवपदावर नियुक्ती झाली. 

माळढोक पक्षी अभयारण्याच्या क्षेत्रात घट

  • माळढोक पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी असलेल्या माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे.
  • यापूर्वी माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र १२२९ चौरस कि.मी. होते. आता ते ४०० चौरस कि.मी. करण्यात येणार आहे.
  • विस्तारित क्षेत्रामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अभयारण्याच्या अखत्यारीत आल्या होत्या. या शेतकऱ्यांना जमीन विकणे, बँकेकडून कर्ज मिळण्यावर गदा आली होती; परंतु आता क्षेत्रफळ घटल्याने ही समस्या कायमची सुटणार आहे. 
  • अभयारण्याच्या विकासासाठी राज्य सरकारला १ कोटी ३८ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • केंद्रीय पर्यावरणमंत्री : प्रकाश जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा