चालू घडामोडी : ३ जानेवारी


पठाणकोट तळावर दहशदवादी हल्ला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला अचानक दिलेल्या भेटीला आठवडाही उलटत नाही तोच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळाला लक्ष्य केले.
  • हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळाला सामरिकदृष्टय़ा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या ३५ किमी अंतरावरच हा तळ आहे. दोन हजार एकरांवर पसरलेल्या या तळावर मिग-२१ ही लढाऊ विमाने व एमआय-२५ ही हेलिकॉप्टर यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे.
  • या तळावर पहाटे साडेतीनच्या सुमारास लष्करी वेशातील पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. ग्रेनेड लाँचर, मॉर्टर, एके-४७ बंदुका आदी शस्त्रांनिशी सज्ज असलेल्या या दहशतवाद्यांना शीघ्र कृती दल व सुरक्षा दलांनी अडवले. तेथूनच चकमकीला सुरुवात झाली.
  • सुरक्षा दले व दहशतवादी यांच्यात तब्बल आठ तास चकमक चालली. त्यात सहा दहशतवादी ठार झाले तर हवाई दलाचे ७ जवान शहीद तर २० जवान जखमी झाले.
  • हल्लेखोर दहशतवाद्यांना पाकिस्तानातील बहावलपूर येथून जीपीएस यंत्रणेद्वारे हल्ल्यासाठी मार्गदर्शन केले जात होते. दहशतवाद्यांना मिग विमाने व एमआय-२५ ही हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त करायचे होते. मात्र, त्यांचा मनसुबा उधळून लावण्यात हवाई दलाला यश आले.
 युनाइडेट जिहाद कॉउंसिलने घेतली हल्ल्याची जबाबदारी 
  • या हल्ल्याची जबाबदारी युनाइडेट जिहाद कॉउंसिलने घेतली असून त्यात एकूण १५ दहशतवादी संघटना सहभागी आहेत.
  • सय्यद सलाहुद्दीन युनाइडेट जिहाद कॉउंसिलचा प्रमुख आहे व हिजबुल मुजाहिदीन ही यातील सर्वात मोठी संघटना आहे.
  • जैश-ए-मोहम्मदही याच युनाइडेट जिहाद कॉउंसिलचा भाग आहे. हा हल्ला काश्मिरी दहशतवाद्यांच्या एका गटाने केल्याचे काउंसिलने सांगितले.

१०३व्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटन

  • स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास हा केंद्रबिंदू असलेल्या १०३ व्या सायन्स काँग्रेसला २ जानेवारी रोजी म्हैसूर (कर्नाटक) थेथे प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायन्स काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे.
  • सुमारे १३ वर्षांच्या कालखंडानंतर कर्नाटकमध्ये, तर ३४ वर्षांनंतर म्हैसूरमध्ये पुन्हा एकदा सायन्स काँग्रेसचे आयोजन केले जात आहे.
  • म्हैसूर विद्यापीठ यंदा शताब्दी साजरी करीत आहे. त्यानिमित्त सायन्स काँग्रेस भरविण्याचा मान म्हैसूरला देण्यात आला आहे. देशभरातील नामवंत ५०० शास्त्रज्ञ सायन्स काँग्रेसला उपस्थित राहणार आहेत.
  • यंदाच्या सायन्स काँग्रेसमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने विविध चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • याशिवाय 'प्राइड ऑफ इंडिया' हे प्रदर्शन, 'हॉल ऑफ प्राइड', 'विज्ञानज्योत', महिला व मुलांसाठी विशेष सायन्स काँग्रेस, तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार, आयएससीए पुरस्कार, शास्त्रज्ञांची भेट आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी कराराची अंमलबजावणी

  • पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात गेल्या वर्षी झालेला करार आता अंमलात आला. या करारानुसार व्हॅटिकनच्या रोमन कॅथॉलिक चर्चचे अधिकारक्षेत्र पॅलेस्टाइनच्या भूमीपर्यंत विस्तारणार आहे. तसेच पॅलेस्टाइनमधील अल्पसंख्य ख्रिस्ती धर्मियांना संरक्षणही मिळणार आहे.
  • या कराराचे स्वरूप बहुतांशी धार्मिक असले तरी त्याकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या नजरेतून पाहिले जात आहे. स्वतंत्र पॅलेस्टाइला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या वाढत्या मान्यतेचे हे प्रतीक आहे. 
  • व्हॅटिकनच्या रोमन कॅथॉलिक चर्चने फेब्रुवारी २०१३ मध्ये स्वतंत्र पॅलेस्टाइनला मान्यता दिली. त्यानंतर २६ जून २०१५ रोजी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

सौदी अरेबियात ४७ कैद्यांना फाशी

  • सौदी अरेबियात दहशतवादाचा आरोप असलेल्या ४७ कैद्यांना फाशी देण्यात आले, त्यात शिया धर्मगुरूचा समावेश आहे. अरब क्रांतीच्या वेळी सौदी अरेबियात झालेल्या निदर्शनांना या धर्मगुरूने चिथावणी दिली होती.
  • शेख निम्र अल निम्र याला फाशी दिल्याने आता सौदी अरेबियातील अल्पसंख्याक शिया समाजात अशांतता निर्माण झाली. शियांची संख्या बहारिन व सौदी अरेबियाच्या पूर्व भागात जास्त आहे.
  • या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इराणमधील मशहाद या शहरात सौदी अरेबियाच्या दूतावासास आग लावली.
  • फाशी दिलेल्यांत ४५ नागरिक सौदी अरेबियाचे असून एक छड या देशाचा तर अन्य एक जण इजिप्तचा नागरिक आहे.
 कोण होते शेख निम्र...?? 
  • पूर्व सौदी अरबमध्ये २०११ मध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनाचे मुख्य नेते निम्र होते. 
  • या परिसरांमध्ये शियांनी त्यांच्यावर अनेक वर्षांपासून अन्याय होत असल्याचे म्हटले होते. 
  • शेख निम्र यांना ऑक्टोबर २०१४ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा