चालू घडामोडी : १५ फेब्रुवारी


२०१५मधील स्वच्छ शहरांची यादी जाहीर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत करण्यात आलेल्या देशातील सर्वांत स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात म्हैसूर शहराने सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली आहे. २०१४मध्येही म्हैसूरचा क्रमांक देशातील सर्वांत स्वच्छ शहरांत पहिला होता.
  • केंद्र सरकारने देशातील शहरांचे सर्वेक्षण केले. यातून ७३ स्वच्छ शहरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ही शहरे आहेत.
  • महाराष्ट्रातील बृहन्मुंबई आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश दहा स्वच्छ शहरांत आहे, तर गलिच्छ शहरांमध्ये कल्याण-डोंबिवलीचा समावेश आहे.
  • पायाभूत सुविधांसाठी वाराणसीला गेल्यावर्षीपासून सुमारे वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला असला, तरी सांडपाण्याच्या निचऱ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे ७३ शहरांच्या यादीत नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या या शहराचा क्रमांक ६५वा आहे. 
  • स्वच्छ भारत योजनेसाठी देशभरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी स्वतः हातात झाडू घेऊन या अभियानाला सुरवात केली होती.
  • या योजनेसाठी २०१९पर्यंत ६२,००९ कोटी रुपये खर्च होणार असून, त्यातील १४,६२३ कोटी केंद्र सरकार, तर ४,८७४ कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. उर्वरित ४२,५१२ कोटी रुपयांचा निधी मुख्यत्वे खासगी क्षेत्रातून उभारला जाणार आहे.

सर्वाधिक स्वच्छ शहरे
क्रमांक शहर
म्हैसूर (कर्नाटक)
चंदीगड (पंजाब, हरियाणा)
तिरुचिरापल्ली (तामिळनाडू)
नवी दिल्ली
विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)
सुरत (गुजरात)
राजकोट (गुजरात)
गंगटोक (सिक्कीम)
पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)
१० बृहन्मुंबई (महाराष्ट्र)

सर्वाधिक अस्वच्छ शहरे
क्रमांक शहर
६४ कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)
६५ वाराणसी (उत्तर प्रदेश)
६६ जमशेदपूर (झारखंड)
६७ गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
६८ रायपूर (छत्तीसगढ)
६९ मेरठ (उत्तर प्रदेश)
७० पाटणा (बिहार)
७१ इटानगर (अरूणाचल प्रदेश)
७२ असनसोल (पश्चिम बंगाल)
७३ धनाबाद (झारखंड)

महाराष्ट्रातील शहरांचे स्थान
क्रमांक शहर
पिंपरी चिंचवड
१० बृहन्मुंबई
११ पुणे
१२ नवी मुंबई
१७ ठाणे
२० नागपूर
३१ नाशिक
३५ वसई-विरार
६४ कल्याण डोंबिवली

भारत आणि रशियामध्ये दोन सामंजस्य करार

  • मुंबईतील मेक इन इंडिया सेंटरमध्ये मेक इन इंडिया सप्ताहादरम्यान भारत आणि रशियामध्ये अवजड उद्योग क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
  • रांची येथील हेवी इलेक्ट्रीकल कार्पोरेशन आणि रशियन कंपनी CNIITMASH यांच्यामध्ये सामायिक अभियांत्रिकी सुविधा कक्ष उभारण्याचा करार झाला. पोलाद उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानासंदर्भातील हा करार आहे.
  • दुसरा महत्त्वाचा करार हेव्ही इलेक्ट्रीकल कार्पोरेशन आणि पॉल वृथ कंपनी यांच्यादरम्यान न्यू कोक ओव्हन बॅटरी आणि को-ओव्हन मशीनचे नूतनीकरणासंदर्भात झाला.
  • तसेच यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या हस्ते राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण २०१६ जाहीर करण्यात आले.
 राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण २०१६ 
  • बाजारांचा विकास : मेक इन इंडियाअंतर्गत भांडवली वस्तूंच्या उप विभागांना प्रोत्साहन, बाजारांच्या विकासासाठी साह्य. 
  • रचनात्मक धोरण : सध्याच्या भांडवली वस्तू धोरणाच्या बळकटीकरणासाठी वित्तीय तरतूद, कौशल्ये विकास, क्षेत्रीय सुलभता, उपलब्ध यंत्रणेचे आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण. 
  • तंत्रज्ञानाला प्रोत्साहन : तंत्रज्ञान विकास निधी, भांडवली वस्तूंसाठी स्टार्ट अप केंद्रे, अद्ययावतीकरणाची अनिवार्यता, तपासणी, विकास आणि प्रमाणीकरण यांच्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता.

सानिया-मार्टिना जोडीला सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेचे जेतेपद

  • सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. या विजयासह या जोडीने सलग ४० लढतीत अपराजित राहण्याचा विक्रमही केला आहे.
  • एकत्र खेळायला सुरुवात केल्यापासूनचे या जोडीचे हे १३वे तर नव्या हंगामातील चौथे जेतेपद आहे.
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने व्हेरा दुश्नेव्हिना आणि बाबरेरा क्रेजेसिकोव्हा जोडीवर ६-३, ६-१ असा विजय मिळवला.
  • यंदाच्या वर्षांत ब्रिस्बेन आणि सिडनी स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीने वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीसह जेतेपदाची कमाई केली.
  • गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवानंतर सानिया-मार्टिना जोडीने विम्बल्डन आणि अमेरिकन खुली स्पर्धा या ग्रँड स्लॅम जेतेपदांसह गुआंगझाऊ, वुहान, बीजिंग, डब्ल्यूटीए फायनल्स, सिंगापूर या स्पर्धाची जेतेपदे पटकावली आहेत.

पाकमधील सिंध प्रांतात हिंदू विवाह विधेयक मंजूर

  • पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या विधानसभेने हिंदू विवाह विधेयक मंजूर केले आहे. अल्पसंख्य हिंदूंना वेगळा विवाह कायदा देणारा पाकिस्तानातील हा पहिलाच प्रांत ठरला आहे. 
  • निसार खुहरो या मंत्र्यांनी सादर केलेले हे विधेयक बऱ्याच संख्येने हिंदू राहत असलेल्या संपूर्ण सिंध प्रांताला लागू होईल. पाकिस्तानच्या निर्मितीपासून प्रथमच अशा पद्धतीचा कायदा मंजूर झाला आहे.
  • पाकिस्तानच्या संसदेमध्ये या विधेयकाचा मसुदा गेल्याच आठवड्यात मंजूर झाल्यामुळे हिंदू विवाह कायद्याचा मार्ग मोकळा झाला होता. यामुळे हिंदू विवाह आणि घटस्फोटांची स्वतंत्रपणे नोंद होणार आहे. या विधेयकानुसार, हिंदूंचे विवाहाचे किमान वय १८ असे निश्चित करण्यात आले आहे. 
  • हिंदू पती-पत्नींपैकी एकाने जरी धर्मांतर केले तर हा विवाह रद्द होण्याची तरतूद विधेयकात आहे. मात्र, या तरतुदीला हिंदू नागरिकांचा विरोध आहे. यामुळे हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करण्याचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोलोरॅडोमध्ये महात्मा गांधीजींचा सन्मान

  • आपले सर्व आयुष्य अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार करत अन्यायाविरुद्ध लढण्यात कारणी लावल्याबद्दल महात्मा गांधीजींचा सन्मान सन्मान करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला आहे.
  • भारतीय वंशाचे जनक जोशी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. जनक जोशी हे कोलोरॅडो आमसभेचे पहिले भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आहेत.
  • त्यांच्या या प्रस्तावाला आमसभेच्या अध्यक्षांसह अनेकांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा प्रस्ताव मान्यतेसाठी समोर येताच तो एकमताने मान्य करण्यात आला.
  • गांधीजींचे विचार सर्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत आणि ते आजही सुसंगत आहेत, हे यावरून सिद्ध होते.

दरवर्षी हवा प्रदूषणाचे ५५ लाख बळी

  • अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार जगात दरवर्षी हवा प्रदूषणाने ५५ लाख लोक अकाली मरण पावतातत्यातील निम्मे चीन व भारतातील असतात असे दिसून आले आहे. 
  • चीनमध्ये प्रदूषणाने १६ लाख व भारतात १४ लाख लोकांचा २०१३ मध्ये हवा प्रदूषणाशी संबंधित रोगांनी बळी गेला आहे.
  • हवा प्रदूषण हे जगातील मृत्यूंचे चौथे कारण आहे व त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. उच्च रक्तदाब, चौरस आहाराचा अभाव व धूम्रपान या तीन कारणांनंतर हवा प्रदूषणाशी संबंधित रोगांनी जास्त लोक मरण पावतात.
  • जगातील ८५ टक्के लोक हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या धोकादायक पातळीपेक्षा जास्त प्रदूषण असलेल्या भागात राहतात. हवा प्रदूषणाचा फटका १९९० ते २०१३ या काळात १८८ देशांना बसला आहे.
  • अमेरिका, कॅनडा, चीन व भारत या देशातील वैज्ञानिकांचा या संस्थेत समावेश असून, त्यांच्या संशोधनानुसार चीन व भारत हे जगातील दोन देश जास्त लोकसंख्येचे असून नेमके या देशातच प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे.
  • चीन हा कोळसा जाळण्यात आघाडीवर असून तेथे कोळशाच्या काजळीचे प्रमाण जास्त आहे, तेथे केवळ कोळसा प्रदूषणामुळे दरवर्षी ३,६०,००० लोक प्राणास मुकतात.
  • भारतात लाकूड, गोवऱ्या, पिकांचे अवशेष जाळणे या बाबी नित्याच्या आहेत त्यामुळे जास्त प्रदूषण होते. घरांतर्गत प्रदूषणाने बाहेरील प्रदूषणापेक्षा जास्त लोक मरतात.
  • आशियात अनेक देश जास्त लोकसंख्येचे आहेत त्यात चीन, भारत, बांगलादेश व पाकिस्तानात हवा खूप खराब आहे. चीन या समस्येवर मात करू शकतो, पण अजून परिस्थिती चिंताजनक आहे.
  • भारतातील आर्थिक प्रवाह लक्षात घेता हवा प्रदूषण धोकादायक ठरणार आहे. अकाली मृत्यूचे प्रमाण पुढील वीस वर्षांत वाढणार आहे त्यामुळे हवा प्रदूषणाच्या समस्येवर विचार करण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा