चालू घडामोडी : १६ मार्च

मादाम तुसाँ म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • पुढील महिन्यात लंडन, सिंगापूर, हाँगकाँग व बँकॉकमधल्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
 • मोदींची ओळख बनलेल्या कुर्त्यामध्येच त्यांनी या पुतळ्यासाठी पोज दिली आहे. पारपंरिक नमस्ते करताना मोदी या पुतळ्यामध्ये दिसणार आहेत.
 • टाइम मॅगेझिनच्या टॉप टेन पर्सन्समध्ये मोदी असून जागतिक बाजारात ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याचे म्युझियमने म्हटले आहे.
 • मोदींचे पुतळे बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचे व दीड लाख ब्रिटिश पौंड खर्च येणार आहे.
 • या म्युझियममध्ये यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरूख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, हृतिक रोशन आणि माधुरी दीक्षित या तारकांचा समावेश आहे.

रिअल इस्टेट विधेयक संसदेत मंजूर

 • विकासकाडून घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारऱ्या रिअल इस्टेट विधेयकाला (नियमन आणि विकास) लोकसभेने मंजुरी दिली आहे. राज्यसभेने १० मार्चला या विधेयकाला मंजुरी दिली होती.
 • या विधेयकातील नियमांचे उल्लंघन झाले तर त्यामुळे विकासक किंवा बांधकाम व्यावसायिकांना दंड तर करता येणार आहेच पण त्याचबरोबर तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
 • घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकाचे हित जपणे, त्यासंदर्भातील व्यवहार कार्यक्षम करणे, पारदर्शकता वाढविणे आणि या क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यास चालना देणे हे या विधेयकाचे हेतू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
 • प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत व्हावी म्हणून देखरेखीसाठी रिअल इस्टेट नियमन प्राधिकरण (आरईआरए) स्थापण्याची तरतूदही या विधेयकात आहे.

मदर तेरेसा यांना संतपद

 • गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबरला रोमन कॅथलिक चर्चच्या संतपदाने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • तेरेसा यांचा जन्म १९१०मध्ये मॅसिडोनियात झाला होता. त्यांचे आई-वडील हे अल्बानियाचे होते. मदर तेरेसा यांना १९७९मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 • कोलकात्यात मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करणाऱ्या मदर तेरेसा यांचे १९९७मध्ये ८७व्या वर्षी निधन झाले.
 मदर तेरेसा यांचे चमत्कार 
 • संतांबाबत चर्चचे खास कायदे आहेत. त्यानुसार एखादी व्यक्ती कितीही संतासारखे जीवन जगलेली असली तरी तिला संत मानता येत नाही. त्यासाठी तिच्या नावावर किमान दोन चमत्कारांची नोंद असावी लागते.
 • तेरेसा यांचा पहिला चमत्कार अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे झाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती.
 • २००३ मध्ये एका सोहळ्यात पोप जॉन पॉल द्वितीय यांना तेरेसा यांच्या पहिल्या चमत्काराला मान्यता दिली होती.
 • दुसरा चमत्कार ब्राझीलचा आहे. मदर तेरेसा यांनी एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे. तेरेसा यांच्या आधीच्या प्रार्थनांच्या परिणामस्वरूप एक व्यक्ती चमत्कारिकरीत्या ठीक झाली होती.
 • पोप फ्रान्सिस यांनी डिसेंबर २०१५मध्ये मदर तेरेसा यांच्या दुसऱ्या चमत्काराला मान्यता दिली होती.

बचत खात्यांवरील व्याज मिळणार दर तिमाहीला

 • रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सर्व बॅंकांना बचत खात्यांवरील व्याजाची रक्कम दर तिमाहीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे. 
 • सध्या बॅंकेत बचत खात्यांवर सहा महिन्याला व्याज दिले जाते. १ एप्रिल २०१० पासून बचत खात्यावरील व्याज रोजच्या रोज मोजले जाते.
 • सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर ४ टक्के, तर खासगी बॅंकांतर्फे ६ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. 
 • आरबीआयने प्रत्येक बॅंकेला २०११मध्ये बचत खात्यांवरील व्याजदर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते; परंतु एक लाखापर्यंतच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहे.
 • जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे; परंतु बॅंकांना मात्र या निर्णयामुळे ५०० कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

शहनाईवादक उस्ताद अली अहमद खान यांचे निधन

 • प्रख्यात शहनाईवादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांचे १६ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. 
 • भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्यानंतरचे प्रख्यात शहनाईवादक म्हणून अली अहमद हुसेन खान यांचा लौकिक होता. 
 • बनारस शहनाई संगीत घराण्याशी संबंधित असलेले अली खान यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २००९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
 • बनारसमध्ये शहनाईवादकांच्या घराण्यात जन्मलेले अली खान यांचे शास्त्रीय आणि निमशास्त्रीय संगीतावर प्रभुत्व होते. 
 • पश्चिम बंगाल सरकारने २०१२ मध्ये त्यांचा बंगभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. 

सिरीयामधील रशियाचे सैन्य मागे

 • हिंसाचारग्रत सिरीयामधील शांतता प्रक्रिया सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सिरीयातील आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 • रशियाच्या ठाम व आक्रमक पाठिंब्यावर सिरीयाचे अध्यक्ष बाशर अल असाद हे सत्तेवर टिकून आहेत. रशियाच्या सहकार्यामुळेच इसिस व इतर बंडखोरांच्या फौजांविरोधात असाद यांच्या सैन्यास यश मिळाले आहे.
 • सैन्य माघारी घेणार असलो तरी सिरीयातील हवाई व नाविक तळांवरील ताबा सोडणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

इस्लामिक देशांची लढाऊ आघाडी

 • दहशतवादाविरोधात इस्लामिक देशांच्या लढाऊ आघाडीच्या निर्मितीचा प्रस्ताव सौदी अरेबियाने मांडला आहे. या आघाडीची निर्मिती नाटोच्या धर्तीवर केली जाण्याचा प्रस्ताव आहे.
 • ही आघाडी कोणत्याही विशिष्ट देशाविरुद्ध नसून इस्लामिक स्टेट (इसिस) यांसारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • जगातील ३४ मुस्लिम बहुसंख्यांक देशांच्या या प्रस्तावित आघाडीची निश्चित रुपरेषा करण्यासंदर्भातील काम पाकिस्तानकडे सोपविण्यात आले आहे.
 • या आघाडीमध्ये सौदी अरेबियाचा प्रमुख प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शिया बहुसंख्यांक इराणच्या समावेशाबद्दल अद्याप संदिग्धता आहे. 
 • नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या आघाडीची स्थापना १९४९मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावास पायबंद घालण्याच्या उद्देशार्थ करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा