चालू घडामोडी : १ मार्च

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी आमचे Mobile Application डाउनलोड करा.
कृपया तुमच्या मित्रांना हे Application नक्की शेअर करा.

ऍवॅक्स यंत्रणा खरेदी प्रस्तावास मंजुरी

 • पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने आणखी दोन एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (ऍवॅक्स) रडार यंत्रणा खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या समितीकडे सुरक्षेच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार आहेत.
 • इस्राईल आणि रशियाबरोबर झालेल्या कराराअंतर्गत ७,५०० कोटी रुपयांना ही खरेदी होणार आहे. रशियन बनावटीच्या आयएल-७६ या जेट विमानांवर इस्त्राईली बनावटीचे रडार बसवून ऍवॅक्स यंत्रणा तयार केली आहे.
 • या रडार यंत्रणेमुळे भारतीय हवाई दलाच्या टेहेळणी क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. भारताकडे आधीपासूनच तीन ऍवॅक्स यंत्रणा आहेत. या यंत्रणेद्वारे शत्रू प्रदेशामध्येही टेहेळणी करता येते.
 • तसेच समितीने स्वनातीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चौथी तुकडी आणि पिनाका रॉकेटची तिसरी आणि चौथी तुकडी लष्करात दाखल करण्यासही मंजुरी दिली आहे. 
 • भारतही दोन अतिरिक्त ऍवॅक्स यंत्रणा तयार करण्याच्या प्रयत्नात असून, यासाठी फ्रेंच बनावटीच्या एअरबस-३३०चा वापर करण्याचा विचार आहे. यासाठी लागणारे रडार ‘डीआरडीओ’कडून तयार केले जातील. यासाठी ५,१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

उत्तम कांबळे यांना टिळक पत्रकारिता पुरस्कार

 • राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या २०१५ वर्षाच्या पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा केली.
 • ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पत्रकारांना दिला जाणारा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मुस्तफा मुबारक आतार यांना जाहीर करण्यात आला. 
 • पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरवर्षी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ऑस्कर विजेते जॉर्ज केनेडी यांचे निधन

  George Kennedy
 • ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते जॉर्ज केनेडी यांचे २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
 • कूल हँड ल्यूक या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. पॉल न्यूमन यांना मारणाऱ्या एका ताकदवान गँगस्टरची भूमिका केनेडी यांनी साकारली होती.
 • मनोरंजन व्यवसाय क्षेत्रातील कुटुंबात १९२५मध्ये न्यूयॉर्क येथे केनेडी यांचा जन्म झाला. ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन फौजांमध्ये दाखल झाले होते.
 • लष्करात १६ वर्षे सेवा केल्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे अपघाताने ते अभिनय क्षेत्रात आले. अष्टपैलू अभिनेता केनेडी यांनी अनेक चित्रपट व टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले.

माजी केंद्रीय मंत्र्याला साडेतीन वर्षांची शिक्षा

 • शासकीय दुकानांचे वितरण करताना केलेल्या गैरव्यवहाराबद्दल माजी केंद्रीय मंत्री पी. के. थुंगॉन यांना साडे तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 
 • यापूर्वी १९९८ साली थुंगॉन यांनी नागालॅण्डमधील सिंचन प्रकल्पासाठी आलेल्या केंद्राच्या निधीचा गैरवापर केला होता. त्यामध्ये थुंगॉन यांना जुलै २०१५ साली साडेचार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे थुंगॉन हे सध्या तुरुंगातच आहेत.
 • १९९३-९४ साली शासकीय दुकानांच्या वितरणामध्ये केलेल्या गैरव्यवहारप्रकरणीही ते दोषी ठरले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर त्यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली.
 • थुंगॉन यांना भ्रष्टाचारविरोधी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच गुन्हेगारी कट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

संजीव पेंढरकर यांना भारतीय उद्योजक-२०१६ पुरस्कार

 • मुंबई विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांना भारतीय उद्योजक-२०१६ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 • नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा मानला जातो. 
 • पुरस्कार वितरण सोहळ्याला मराठी व हिंदी सिने-नाट्य सृष्टीतील कलावंत तसेच देशाच्या उद्योग क्षेत्रांत आघाडीवर असलेले उद्योजकही उपस्थित होते.

लहान मुलांसाठी ‘किडल’ सर्च इंजिन

 • इंटरनेटचे लहान मुलांमध्ये वाढते आकर्षण लक्षात घेऊन ‘गुगल’ या लोकप्रिय सर्च इंजिन कंपनीने लहान मुलांसाठी खास ‘किडल’ नावाने सर्च इंजिन सुरू केले आहे.
 • ‘गुगल’ने सुरू केलेल्या ‘किडल’ या खास लहान मुलांसाठीच्या सर्च इंजिनवर कोणत्याही प्रकारच्या प्रौढ आशय सर्च होत नाही. या सर्च इंजिनवर सर्व प्रकारच्या पोर्न साईट्स आणि छायाचित्रांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
 • ‘किडल’मुळे मुलांवर कोणतीही बंधनं न घालता मुलांना त्यांच्या अपेक्षांप्रमाणे इंटरनेट वापरता येईल, अशी सोय गुगल कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
 • किडलमधून उपलब्ध होणारा मजकूर (साईट्स व पेजेस) विशेष चाळणीमधून जाणार आहे. ‘किडल’वर शोध घेऊन काढण्यात आलेला कोणताही मजकूर वा चित्र, चित्रफीत ही मुलांच्या दर्जाचीच असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा