चालू घडामोडी : २१ मार्च

चीन व नेपाळ देशांदरम्यान रेल्वेमार्ग

    Khadga Prasad Sharma Oli
  • पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे पहिल्यांदाच सात दिवसीय चीन दौऱ्यावर गेले आहेत.
  • या दौऱ्यात चीन व नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात ओली यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली.
  • नेपाळच्या पंतप्रधानांनी तिबेटमार्गे चीन ते नेपाळ असा रेल्वेमार्ग तयार करावा असा चीनकडे आग्रह धरला होता. नेपाळचे भारतावरील भूराजकीय अवलंबित्व या मार्गामुळे कमी होणार असल्याचे मानण्यात येत आहे.
  • नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी या दौऱ्यात १० करारांवर सह्या केल्या. या करारांमध्ये ‘ट्रान्झिट ट्रेड’ हा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा करार देखील अंतर्भूत आहे.
  • चीनच्या सहकार्याने नेपाळमध्ये नवीन विमानतळ बनवले जाणार आहे. नेपाळच्या पोखरामध्ये चीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. हे ठिकाण नेपाळचे सर्वात महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे.
  • भारतीय वंशाच्या मधेशी समुदायाने भारत व नेपाळमधील मार्ग रोखून धरल्याने नेपाळमधील जनजीवन विस्कळित झाले होते. या पार्श्वभूमीवर, नेपाळ व चीनमधील दळणवळणाच्या मार्गांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी नेपाळमधील नेतृत्व प्रयत्नशील आहे. 
  • चीनचे पंतप्रधान : ली केकियांग
  • चीनचे राष्ट्रपती : शी झिंनफिंग

मिझोराममध्ये पहिली ब्रॉडगेज मालगाडी

  • गुवाहाटीहून २६०० मेट्रिक टन तांदूळ घेऊन येणारी रेल्वेची पहिली ब्रॉडगेज मालगाडी मिझोरामच्या बैराबी स्थानकात दाखल झाली.
  • मालगाडीतून मोठ्या प्रमाणात तांदूळ आल्यामुळे मिझोराम-आसाम सीमेवरच्या बैराबीमध्ये अन्न स्वस्त दराने उलब्ध होऊ शकेल.
  • आसामच्या सिल्चर शहरातून मिझोरामला देशाबरोबर जोडणारा राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक ५४ हाच सध्या मिझोरामचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे. मात्र, आता लोहमार्गामुळे वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.

ट्विटरला दहा वर्षे पूर्ण

    Twitter
  • आजच्या पिढीसाठी व्यक्त होण्याचे लोकप्रिय माध्यम असणाऱ्या ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला २१ मार्च रोजी दहा वर्षे पूर्ण झाली.
  • ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉरसी यांनी २१ मार्च २००६ रोजी पहिले ट्विट केले. त्यापाठोपाठ त्यांच्या टीमने ट्विटरवर जॅकला फॉलो केले.
  • बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जॅक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली होती. 
  • सध्या ट्विटरचे जगभरात ३२ कोटी वापरकर्ते आहेत. जगभरात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी आणि संशोधकांपर्यंत ट्विटर वापरकर्ते आहेत.
  • ट्विटरवर दिवसभरात ५० कोटीहून अधिक ट्विट केले जातात. त्यामुळे आज जगातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सरकारे, संस्थांसाठी ट्विटर हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे.
  • पण, ट्विटरला सोशल मीडियावरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे. दोन्ही माध्यमांपाठोपाठ ट्विटर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बराक ओबामा यांचा क्युबाचा ऐतिहासिक दौरा

  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा दोन दिवसीय ऐतिहासिक क्युबा देशाच्या दौऱ्यावर पोहचले. ८८ वर्षांत क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरले आहेत.
  • शीतयुद्धानंतर क्युबा व अमेरिका यांच्यातील संबंध पूर्णपणे संपुष्टात आले होते. अमेरिकेने क्युबावर आर्थिक र्निबध लादून त्यांना जेरीस आणले. क्युबा हा रशियाचा मित्र देश मानला जात होता.
  • क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी डिसेंबर २०१४मध्ये जुनै वैर सोडून पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी ओबामांशी बोलणे केले होते. अमेरिकेने नुकताच क्युबामध्ये आपला दुतावासही सुरु केला होता. 
  • ओबामा यांच्या दौऱ्याला विरोध करत २०० मानवधिकार कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
  • ओबामांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान दूरसंचार, हवाई संपर्क आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर काही करार होण्याची शक्यता आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष असलेले कॅलविन कुलिज यांनी १९२८मध्ये क्युबाला भेट दिली होती.

उत्तर कोरियाच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी

  • उत्तर कोरियाने पुन्हा एकदा लघू पल्ल्याच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध झुगारून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जात आहे.
  • अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असतानाही उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी लष्कराला क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांपासून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. 
  • दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.
  • अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराचा संयुक्त सराव सुरू असून, त्याला उत्तर कोरियाचा आक्षेप आहे. त्यामुळे उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन एकप्रकारे सोल आणि वॉशिंग्टनवर हल्ला करण्याची धमकी देत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा