चालू घडामोडी : २३ मार्च

शहीद दिन

 • भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची २३ मार्च रोजी पुण्यतिथी आहे.
 • २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.

अटल पेन्शन योजनेत सुधारणा

 • केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेत सुधारणा केली असून या सुधारणेनुसार या योजनेअंतर्गत खातेधारकाचा जर वयाच्या ६० व्या वर्षांपूर्वी मृत्यू झाला, तर खातेधारकाच्या पत्नी वा पतीला शिल्लक कालावधीसाठी आपल्या जोडीदाराच्या खात्यात पैसे टाकून योजनेला नियमित ठेवता येणार आहे.
 • या योजनेतील खातेधारकाच्या पती किंवा पत्नीला मूळ खातेधारकाप्रमाणेच आजीवन पेन्शन रकमेचा लाभ घेण्याचा हक्क असेल.
 • परंतु, दोघांचाही मृत्यू झाला, तर खातेधारकाने निश्चित केलेल्या वारसदाराला पेन्शनची रक्कम मिळणार आहे.
 • शिवाय खातेधारकाच्या खात्यात ६० वर्षांपर्यंत जेवढी रक्कम जमा होणार आहे, तेवढी रक्कम अंतर्भूत करून ती संपूर्ण रक्कम वारसदाराला देण्यात येणार आहे.
 • खातेधारकाचा वेळेआधीच मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला संपूर्ण रक्कम दिली जाईल ही या योजनेतील तरदूत खातेधारकाला आवडलेली नव्हती हेच या बदलाचे कारण असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 • मोदी सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत खातेधारकाचे वय ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दर महिन्याला खातेधारकाला निश्चित केलेली रक्कम मिळणे सुरू होणार आहे.

ई-कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम जाहीर

 • पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे नियम जाहीर केल्यानंतर आज ई-कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम जाहीर केले.
 • संगणक, मोबाईल, टीव्ही, मायक्रोवेव्ह, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, संगणकाला जोडलेले प्रिंटर्स व अन्य उपकरणांचा पूर्ण वापरानंतर ‘ई-कचऱ्या’त समावेश होतो.
 • आता नव्या नियमांनुसार लोकांना आता हा कचरा बेजबाबदारपणे कोठेही टाकता येणार नाही.
 • या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादक आणि त्याचबरोबर वितरक म्हणजेच दुकानदार यांच्यावर टाकण्यात आलेली आहे.
 • पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी तयार केलेल्या नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाईची तरतूदही त्यामध्ये आहे. 
 • २०११मध्ये यासंबंधीची पहिली नियमावली तयार करण्यात आली होती. परंतु, बदलत्या काळानुसार ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्याने मंत्रालयाने ही नवी नियमावली तयार केली आहे.
 प्रमुख नियम पुढीलप्रमाणे 
 • उत्पादक, वितरक, रिफर्बिशर आणि निर्माते जबाबदारी संघटना (प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशन : पीआरओ) यांचा अतिरिक्त किंवा वाढीव स्टेकहोल्डर म्हणून समावेश.
 • केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे तर तिच्यामध्ये वापरले जाणारे भाग, सुटे भाग, कन्झ्युमेबल्स यांचाही अंतर्भाव.
 • सीएफएल आणि इतर पारायुक्त दिव्यांचा समावेश. 
 • इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याच्या यंत्रणांची निर्मिती करण्याची जबाबदारी उत्पादकांवर. 
 • इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणा किंवा संस्थांची नोंदणी, नोंदणी व परवाना पर्यावरण मंत्रालयाकडून आणि राज्यवार अशा अधिकृत संस्थांची यादी तयार करणे. 
 • इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विशिष्ट जीवनमान किंवा त्या किती काळ वापरता येऊ शकतात याचा विशिष्ट कालावधी असतो. त्यानंतर ती वस्तू टाकाऊ होते. वस्तू खरेदी करतानाच उत्पादक किंवा वितरक ग्राहकाकडून विशिष्ट अशी रक्कम अनामत म्हणून आकारेल आणि त्या वस्तूचे आयुष्य संपून ती टाकाऊ झाल्यावर परत त्या उत्पादक किंवा वितरकाकडेच पुन्हा देण्याचे बंधन यामुळे तयार होईल. संबंधित अनामत रक्कम व्याजासह ग्राहकाला परत मिळण्याची तरतूद नियमात करण्यात आली आहे. 
 • इलेक्ट्रॉनिक कचरा विनिमय यंत्रणेची स्थापना. 
 • आता अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्यांना नव्या नियमानुसार अधिकृत किंवा औपचारिक दर्जा देणे, त्यांची नोंदणी करणे, त्यांना परवाना देणे या गोष्टीही यापुढच्या काळात केल्या जाणार आहेत.

चिनाब नदीवर सर्वांत उंच रेल्वे पूल

 • जम्मू-काश्मीरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गावरील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्यात येत आहे. २०१९ मध्ये हा रेल्वे पूल बांधून पूर्ण केला जाईल.
 • चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा ३५९ मीटर उंचीचा आणि शत्रू राष्ट्राच्या सीमेजवळील निर्जन स्थळी बांधण्यात येत असलेला रेल्वे पूल जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच असेल.
 • जगात सध्या फ्रान्समधील टॉम नदीवर बांधण्यात आलेला पूल सर्वांत उंच पूल मानला जातो. या पुलाचे खांब नदीपात्रापासून ३४० मीटर उंचीवर आहेत.
 • चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा कमानीच्या आकाराचा रेल्वे पूल बक्कल (कत्रा) आणि कौरी (श्रीनगर) या दोन नदीकाठांना जोडणार आहे.
 • ताशी २६६ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा तडाखा सहन करू शकेल, अशा पद्धतीने या पुलाची रचना करण्यात आली आहे.
 • वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे या पुलावर संवेदक (सेन्सर) बसविण्यात येतील. वाऱ्याने ताशी ९० कि.मी.चा वेग घेतला की रेल्वे मार्गावरील सिग्नल आपोआप लाल होतील आणि रेल्वेला पुलावर येण्याआधीच थांबविता येईल.
 • कोकण रेल्वेने आतापर्यंत या प्रकल्पावर २९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ६१०० कोटी रुपये आहे.

रेमण्ड मूर यांचा राजीनामा

 • महिला टेनिसपटूंबद्दल अनुदार उदगार काढणारे इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेमण्ड मूर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
 • ‘मी जर महिला टेनिसपटू असतो तर गुडघ्यावर बसून मी देवाचे आभार मानले असते की, रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल यांच्यासारख्या खेळाडूंचा जन्म झाला. त्यांच्यामुळेच हा खेळ वाटचाल करतो आहे,’ असे विधान मूर यांनी केले होते.
 • मूर यांच्या या विधानानंतर महिला टेनिसमध्ये खळबळ उडाली आणि स्वतः सेरेना विल्यम्सने याची गंभीर दखल घेत मूर यांच्यावर सडेतोड टीका केली.
 • इंडियन वेल्स स्पर्धा प्रमुख लॅरी एलिसन यांना मूर यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय कळविला. रेमण्ड यांनी सदर अवमानकारक विधान केल्यानंतर महिला टेनिसची माफीही मागितली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा