चालू घडामोडी : २४ मार्च

‘ब्रिक्स’चे आठवे शिखर संमेलन गोव्यामध्ये

 • जगातील पाच प्रभावशाली देशांचा समूह असलेल्या ‘ब्रिक्स’ची आठवी शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे.
 • जगात ‘ब्रिक्स’चे सदस्य असलेल्या या पाच देशांची लोकसंख्या ४२ टक्के आहे आणि या देशांचे सकल राष्ट्रीय उत्पादन १६००० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
 • परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या शिखर संमेलनाची वेबसाईट आणि प्रतीक चिन्हाचे (लोगो) अनावरण केले. या वर्षी ‘ब्रिक्स’ समूहाचे अध्यक्षपद भारताकडे आहे.
 • रशियन महासंघाने जुलै २०१५ मध्ये उफा या अतिशय सुंदर अशा शहरामध्ये सातव्या ब्रिक्स संमेलनाचे आयोजन केले होते.
 • अंडर-१७ फुटबॉल सामने, चित्रपट महोत्सव, वेलनेस फोरम, युथ फोरम, यंग डिप्लोमॅट्स फोरम, व्यापार मेळा, फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह, थिंक टँक आणि शैक्षणिक मंच यांसारखे कार्यक्रम या संमेलनात राबविण्यात येणार आहेत.

अश्गाबात कराराला मंजुरी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अश्गाबात कराराला मंजुरी देण्यात आली. 
 • अश्गाबात करार हा आंतरराष्ट्रीय वाहतूक तसेच मध्य आशिया व पर्शियन आखातामधील माल वाहतूक सुलभ व्हावी यासाठी करण्यात आला आहे.
 • या कराराचे ओमान, इराण, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान हे देश संस्थापक सदस्य आहेत. आता कझाकिस्तान हा देश देखील या करारात सहभागी झाला आहे.
 • या करारामुळे भारत या मार्गाचा उपयोग युरो-एशियन क्षेत्रासोबत व्यापार व व्यावसायिक संवाद वाढविण्यासाठी करू शकतो.
 • याशिवाय, संपर्क वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरच्या अंमलबजावणीच्या आपल्या प्रयत्नांना याची जोड मिळेल.
 • अश्गाबात करार स्वीकारण्याचा आपला निर्णय भारत आता ‍डिपॉझिटरी देश तुर्कमेनिस्तानला कळवेल. संस्थापक सदस्यांच्या संमतीनंतर भारत या कराराचा एक घटक बनेल.

भारत आणि लिधुआनिया दरम्यान सामंजस्य करार

 • कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लिधुआनिया दरम्यानच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.
 • या कराराअंतर्गत कृषी उत्पादन क्षेत्र, उद्यानविद्या, सुगीनंतरचे व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, शीतगृह साखळी विकास, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुपालन, दुग्धोत्पादन, मत्स्योत्पादन, यासह कृषी उत्पादन क्षेत्रातील सहकार्य उपलब्ध होणार आहे.
 • करारामुळे क्षमता वृद्धी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांमधे ज्ञानाचे आदानप्रदान, जेनकिय स्रोतांची देवाणघेवाण, तसेच कृषी उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि चांगल्या कृषी प्रथांचा विकास आदी बाबतीत मदत होणार आहे.

तामिळनाडूमध्ये तिसरी आघाडी

 • तामिळनाडू राज्यात अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांना शह देण्यासाठी पीपल्स वेल्फेअर फ्रंट नावाने तिसरी आघाडी तयार झाली आहे.
 • अभिनेते विजयकांत यांचा डीएमडीके ही पक्ष आघाडीत सहभागी झाला असून, त्यांना मुख्मंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
 • डीएमडीके केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. राज्यात मात्र त्यांनी भाजपशी आघाडी केलेली नाही.
 • पीपल्स वेल्फेअर फ्रंटमध्ये चार पक्षांचा समावेश आहे. त्यात एमडीएमके, माकप, भाकप आणि व्हिसीके हे पक्ष आहेत. 
 • आपण या निवडणुकीत वेगळे लढणार असल्याचे विजयकांत यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यात आता अण्णा द्रमुक-द्रमुक-पीडब्लूएफ, भाजप आणि पीएमके अशी बहुपक्षीय लढत होणार आहे. 

विजय मल्ल्याचा सनोफीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

 • किंगफिशर एअरलाइन्समुळे वादात सापडलेले आणि सनोफी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष असलेले विजय मल्ल्या यांनी सनोफीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 • सनोफी इंडिया या औषध उत्पादक कंपनीमध्ये विजय मल्ल्या १९७३पासून संचलाक मंडळातील सदस्य होते. १९८३पासून ते या कंपनीचे अध्यक्ष आहेत.
 • मूळ हेक्स्ट फार्मास्युटिकल्स लिमिटेड म्हणून प्रसिद्ध असलेल्या व नंतर सनोफी इंडिया म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या या कंपनीत आपल्याला पुन्हा संचालक मंडळावर नियुक्त केले जाऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सनोफी इंडियाला कळवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा