चालू घडामोडी : २५ मार्च

‘फॉर्च्यून’च्या महान नेत्यांच्या यादीत केजरीवाल

  Arvind Kejriwal
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फॉर्च्यून मासिकाने जगातील ५० महान नेत्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे.
 • आम आदमी सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दल फॉर्च्यूनने केजरीवाल यांचे विशेष कौतुक केले आहे. जानेवारीमध्ये १५ दिवसांसाठी सम-विषम योजनेचा प्रयोग यशस्वीपणे राबविला होता.
 • जगभरातील ५० नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांचा ४२वा क्रमांक आहे. केजरीवाल यांनी आपल्या कारकिर्दीची जोखीम पत्करून ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आणि दिल्लीतील गर्दी व प्रदूषण कमी केले.
 • गेल्या वर्षी पाचव्या क्रमांकावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीच्या यादीत स्थान मिळालेले नाही. अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांनी या यादीमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
 • तसेच, अमेरिकेतील देशांतर्गत व जागतिक आव्हानांसमोर बराक ओबामा यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना सलग तिसऱ्या वर्षी या यादीतून वगळण्यात आले आहे.
 • या यादीत जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुसऱ्या स्थानावर, म्यानमारमधील नेत्या आँग सान सू की तिसऱ्या स्थानावर आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

 • जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे तीन महिन्यांपासून लागू असलेल्या राज्यपालांच्या राजवटीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स डेमोक्रटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
 • त्यामुळे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या मेहबुबा काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.
 • मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदीच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड झाली.
 • एकूण ८७ सदस्यसंख्या असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीकडे सर्वाधिक २७ आमदार असून, भाजपाकडे २५ आमदारांचे बळ आहे.
 • याशिवाय पीडीपी-भाजप युतीला सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सच्या दोन तसेच दोन अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.
 मेहबुबा मुफ्ती 
 • मेहबुबा मुफ्ती या जमुऊ काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आणि राजकीय वारसदार आहेत.
 • १९९९मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर त्या ओमर अब्दुल्लांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.
 • २००२मध्ये मेहबुबा पहलगाम येथून विजयी झाल्या होत्या. २००४मध्ये त्या कांग्रेससोबतच्या आघाडीमध्ये सहभागी झाल्या आणि लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या.
 • आता मेहबुबा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत.

इंधनासाठी नेपाळचा चीनसोबत करार

 • इंधनाच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नेपाळने भारतावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी चीनसमवेत विविध करार केले आहेत. त्यामुळे यापुढे भारताशिवाय चीनकडूनही नेपाळ इंधन खरेदी करू शकणार आहे. 
 • नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतीच बीजिंगला भेट दिली. त्यावेळी हे करार करण्यात आले.
 • भारत हा नेपाळला अनेक वर्षांपासून इंधनपुरवठा करणारा पारंपारिक निर्यातदार देश समजला जातो.
 • नेपाळच्या राज्यघटनेत अलिकडे काही बदल करण्यात आले आहेत. मात्र यामुळे मैदानी भागात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मधेशी नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 • त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मधेशी नागरिक आंदोलन करत आहेत. त्यामुळे नेपाळचे भारताशी असलेले संबंध ताणले गेले आहेत. या सर्व प्रकारामुळे नेपाळ भारतावर अवलंबून असल्याचे दिसून आले.
 • परिणामी नेपाळने भारतावर अघोषित नाकेबंदीचा आरोपही केला होता. नेपाळच्या मते, भारताकडून होणाऱ्या अघोषित नाकेबंदीमुळे नेपाळला गॅस, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा भासत आहे.
 • त्यामुळेच नेपाळ आणि चीनदरम्यान चार अब्ज डॉलरचे करार झाले आहेत. नेपाळमध्ये तेलसाठ्याची गोदामे बांधणे, तिबेट रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून नेपाळपर्यंत रेल्वेजाळे उभारणे असे विविध करारांचा त्यामध्ये समावेश आहे.

शेन वॉटसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

 • ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू शेन वॉटसनने वर्ल्ड टी-२० स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटसनने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.
 • वॉटसनने बरोबर चौदा वर्षांपूर्वी म्हणजेच २००२मध्ये २४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यांत पदार्पण केले होते.
 • वॉटसनने ५९ कसोटींत ३७३१ धावा केल्या असून, यात ४ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, १९० वनडेत त्याने ९ शतके आणि ३३ अर्धशतकांसह ५७५७ धावा केल्या आहेत.
 • कसोटीत वॉटसनने ७५, तर वनडेत १६८ विकेट घेतल्या आहेत. त्याने ५६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १४०० धावा आणि ४६ विकेट घेतल्या आहेत.
 • या वर्षी आयपीएलच्या लिलावत वॉटसनला ९.५ कोटी रुपयांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने खरेदी केले आहे.
 • वॉटसन हा २००७ आणि २०१५च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने सहाही टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये तो मालिकावीर ठरला होता.
 • ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, रिकी पाँटिंग आणि अॅडम गिलख्रिस्ट या माजी क्रिकेटपटूंसोबत खेळलेला ऑस्ट्रेलियन संघातील तो एकमेव खेळाडू आहे.

फुटबॉलपटू जोहान क्रिफ यांचे निधन

 • महान फुटबॉलपटू जोहान क्रिफ यांचे फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे २४ मार्च रोजी निधन झाले.
 • हॉलंडच्या जोहान यांनी अॅजेक्स संघाचे प्रतिनिधित्व करताना तीन युरोपियन कप जिंकण्यात योगदान दिले.
 • तसेच चमकदार खेळामुळे त्यांना तीनवेळा मानाच्या बॅलन डी ओर (१९७१, १९७३, १९७४) या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
 • ८ वर्ष ते बर्सोलिनाच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी व्यवस्थापकाची भूमिका बजावत बार्सिलोनाला चारवेळा स्पॅनिश ला लीगाचं विजेतेपद मिळवून दिले होते.
 • जोहान क्रिफ यांच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सने १९७४ साली फिफा विश्वचषकाचं उपविजेतेपद मिळवले होते.
 • जोहान क्रिफ यांनी नेदरलँड्सकडून ४८ सामन्यांमध्ये ३३ गोल झळकावले आहेत. व्यावसायिक फुटबॉलमध्ये जोहान क्रिफ यांच्या नावावर ६६१ सामन्यांमध्ये ३६९ गोल जमा आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा