चालू घडामोडी : १६ एप्रिल

गुगलची आणखी नऊ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा

 • तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या ‘गुगल’ने रेल्वेच्या ‘रेलटेल’च्या सहकार्याने आणखी नऊ रेल्वे स्थानकांवर वेगवान आणि मोफत वाय-फाय सेवा सुरू केली आहे.
 •  पुणे, भुवनेश्वर, भोपाळ, रांची, रायपूर, विजयवाडा, काचिगुडा (हैदराबाद), एर्नाकुलम जंक्शन (कोची) आणि विशाखापट्टण या स्थानकांवर आता ही सेवा मिळेल.
 • मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रथम ही सेवा सुरू झाली आणि आता आणखी नऊ स्थानके त्यात सामील करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे १५ लाख प्रवाशांना या सेवेचा दररोज फायदा मिळेल.
 • रेल्वेच्या सुमारे शंभर अतिगर्दीच्या स्थानकांवर अशी वाय-फाय सेवा सुरू करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.

सुशीला कर्की नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश

 • नेपाळच्या अध्यक्षपदी आणि संसदेच्या सभापतिपदी महिलांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनंतर सुशीला कर्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली.
 • नेपाळचे मावळते मुख्य न्यायाधीश कल्याण श्रेष्ठा हे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी कर्की यांची निवड करण्यात आली आहे.
 • कर्की यांनी अद्याप पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली नाही. कर्की यांनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. 
 • ऑक्टोबर २०१५मध्ये विद्यादेवी भंडारी यांची नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, तर नेपाळच्या संसदेच्या सभापतिपदी माओवादी नेत्या ओन्सारी घार्ती मगर यांची निवड करण्यात आली होती.
 • राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या नव्या सरकारतर्फे ही निवड करण्यात आली.

विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट स्थगित

 • मनी लॉंडरिंगप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट (डिप्लोमॅटिक पासपोर्ट) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून केंद्र सरकारने चार आठवड्यांसाठी स्थगित केला आहे.
 • ‘ईडी‘कडून तीन वेळा समन्स बजावूनही मल्ल्या हजर झालेले नाहीत, त्यामुळे मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केली होती.
 • त्याशिवाय पासपोर्ट ॲक्ट १९६७ नुसार पासपोर्ट रद्द का करू नये याबाबत एका आठवड्यात खुलासा देण्याचे आदेश मल्ल्यांना देण्यात आले आहेत.
 • दोन मार्च रोजी लंडनला जाताना मल्ल्या यांनी राज्यसभा खासदार असल्याने मिळालेल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर केल्याचा संशय आहे.
 • पासपोर्ट कायद्यानुसार, डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीच्या नेहमीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली जातात व ज्यावेळी तो रद्द करण्याची मागणी केली जाते, तेव्हा पासपोर्ट आणि कागदपत्रे रद्द केली जातात.

दक्षिण जपानला जोरदार भूकंपाचा धक्का

 • दक्षिण जपानला १६ एप्रिल रोजी बसलेल्या जोरदार भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली असून, ढिगाऱ्यांखाली गाडले गेलेल्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.
 • या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात नऊ जण मृत्युमुखी पडले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक ठिकाणी आग लागली, तर अनेक रस्ते बंद झाले आहेत. 
 • माशिकी शहराजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ एवढी होती. 
 • जपानमधील अतिवेगवान रेल्वेगाडी या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोहमार्गावरून घसरली असून, कुमामोटो शहरातील अनेक प्रसिद्ध इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. 
 • भूकंपामुळे नुकसान झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू असून, मृत्युमुखी पडलेल्यांच्या आणि जखमी झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा