चालू घडामोडी : १७ व १८ एप्रिल

भारताला अझलन शाह हॉकी स्पर्धेचे उपविजेतेपद

  • प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळ उंचावण्यात भारताला अपयश आल्याने अखेरीस उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
  • ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय संघावर वर्चस्व राखले आणि ४-० असा दणदणीत विजय मिळविला.
  • यजमान मलेशियाविरुद्ध गोलांचा धडाका लावत भारतीय संघाने ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

टाटाच्या दोन कंपन्यांना ९४ कोटी डॉलरचा दंड

  • टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ‘ग्रँड ज्युरी‘ने ९४ कोटी डॉलरचा (६२०० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. 
  • अमेरिकेतील एपिक सिस्टम्सने दाखल केलेल्या ‘ट्रेड सिक्रेट’ खटल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा अमेरिका इंटरनॅशनलला कॉर्पोरेशनविरोधात निकाल दिला आहे.
  • टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली २४ कोटी डॉलरची नुकसान भरपाई व ७० कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश ग्रँड ज्युरीने दिला आहे.
  • ऑक्टोबर २०१४ मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.

दीपा कर्माकरचा टॉप्स योजनेमध्ये समावेश

  • ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने सर्वांगीण कामगिरी करीत आर्टिस्टिक गटात स्थान मिळवले. 
  • रिओ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दीपाने तिच्या आवडत्या व्हॉल्ट प्रकारात सर्वांत खडतर मानला जात असलेला प्रोदुनोवा प्रकारात १५.०६६ गुण मिळवले.
  • अनइव्हन बारमध्ये तिने ११.७०० आणि फ्लोअर प्रकारात १२.५६६ गुण अशी माफक प्रगती केली. तिने एकंदर ५२.६९८ गुण मिळवले.
  • दोन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकत दीपाने इतिहास घडवला होता. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली पहिली भारतीय स्पर्धक ठरण्याचाही मान मिळवला होता. 
  • भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या टॉप्समध्ये (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम) दीपाचा समावेश तातडीने करण्यात आला आहे.
  • तिला प्रशिक्षणासाठी लगेचच ३० लाख रुपयेही देण्याचे ठरले आहे. टॉप्सअंतर्गत केंद्रीय क्रीडा खाते २०१६ तसेच २०२०च्या ऑलिंपिकमधील संभाव्य पदकविजेत्यांना साह्य करीत आहे. 
  • ऑलिंपिकला पात्र ठरलेली दीपा पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. ऑलिंपिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत दीपाच्या निमित्ताने ५२ वर्षांनंतर भारतीय सहभागी होणार आहे.
  • १९५२च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये दोन, १९५६च्या तीन तर १९६४च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहा भारतीयांचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा