चालू घडामोडी : २१ एप्रिल

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाला मान्यता

 • राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सुमारे ३६८० कोटी रुपयांची ही केंद्रीय योजना आहे.
 • दोन टप्प्यात हा प्रकल्प लागू केला जाईल. जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या अखत्यारीत स्वतंत्र संस्था म्हणून एनडब्ल्यूआयसीच्या निर्मितीची यात तरतूद आहे.
 • राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामुळे जल-हवामान-विषयक माहिती एकत्रित करण्यासाठी मदत होईल. वास्तव काळाच्या आधारावर त्याचे विश्लेषणही केले जाईल.
 • याआधीचा जलविज्ञान प्रकल्प १३ राज्यांपुरताच मर्यादित होता मात्र आता या प्रकल्पाची व्याप्ती देशभर आहे.
 • प्रकल्पाच्या ५० टक्के रक्कम म्हणजे १८४० कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज रुपात मिळणार आहे. केंद्र सरकार हे कर्ज फेडणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम केंद्रीय सहाय्यतेच्या रुपात मिळेल.

सुधा मूर्ती यांना ‘सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ पुरस्कार

 • रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ पुरस्कार शिक्षण आणि विविध क्षेत्रांत मोठे योगदान देणाऱ्या सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे. 
 • सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी जाहीर केला.
 • दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाते. अडीच लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मितसुबिशी मोटर्सच्या अडचणीत वाढ

 • मितसुबिशी मोटर्सने मोटारींच्या इंधनक्षमतेची खोटी आकडेवारी जाहीर केल्याचे मान्य केल्यानंतर जपानी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रमुख कार्यालयावर छापा टाकला आहे.
 • कंपनीच्या ओकाझाकी कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी ६ लाखांपेक्षा जास्त मोटारींच्या इंधनक्षमतेची खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली आहे.
 • कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता ५ ते १० टक्क्यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे.
 • आपली चूक मान्य करीत मितसुबिशीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी पत्रकार परिषदेत जपानी पद्धतीनुसार मान वाकवून माफी मागितली. 
 • या बातमीनंतर कंपनीचे शेअर १५ टक्क्यांनी कोसळून दशकभराच्या नीचांकी पातळीवर पोचले आहेत. याविषयी जपान सरकारने मितसुबिशीकडून संपुर्ण अहवाल मागविला आहे.
 • काही महिन्यांपुर्वी दुसरी आंतरराष्ट्रीय कंपनी फोक्सवॅगनच्या मोटारींमधील उत्सर्जन चाचणीचा गैरव्यवहार समोर आला होता.

ग्रेट बॅरियर रीफ धोक्यात

 • दरवर्षी पर्यटनाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ३.९० अब्ज डॉलरची कमाई करून देणारे ग्रेट बॅरियर रीफ (प्रवाळांचे थर) पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
 • कॉरल समुद्रातील हा रीफसमूह निम्मा नष्ट झाला असून केवळ सात टक्के प्रवाळांचाच रंग कायम असल्याचे ऑस्ट्रेलियन संशोधकांनी म्हटले आहे. 
 • समुद्राचे तापमान वाढत असल्यामुळे रीफसमूहाला धोका निर्माण झाला आहे. हे तापमान कमी झाले नाही तर रीफसमूह पूर्णपणे नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
 • संशोधकांनीच्या अंदाजानुसार सद्यस्थितीत जवळपास ५० टक्के रीफसमूह यापूर्वीच नष्ट झाला आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 
 • समुद्राचे पाणी गरम होणे, प्रदूषण यामुळे प्रवाळामध्ये राहणारे जीव बाहेर येतात. परिणामी प्रवाळांचा रंग बदलतो. काही आठवड्यांत प्रवाळांमध्ये राहणारे जीव नष्ट होऊ शकतात.
 • त्यामुळे प्रवाळ पांढरे पडतात. प्रवाळांमधील रंग उडण्याच्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात ते नष्ट होऊ शकतात.
 • ग्रेट बॅरियन रीफ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर २३०० किलोमीटर अंतरावर पसरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा