चालू घडामोडी : २३ व २४ एप्रिल

डॉ. नरेंद्र जाधव, मेरी कोम यांची राज्यसभेवर नियुक्ती

 • प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.
 • राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त १० पैकी ७ सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी ६ जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
 • सातव्या जागेसाठी इंडिया टीव्हीचे रजत शर्मा, झी टीव्हीचे सुभाषचंद्र आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती. 
 • राष्ट्रपती नियुक्त १० सदस्यांपैकी दोन खासदार नोव्हेंबर २०१५मध्ये, तर पाच सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त झाले. तसेच उरलेले तिघे सदस्य २०१८ साली निवृत्त होत आहेत.

भूपेंद्र कैंथोला यांची एफटीआयआयच्या संचालकपदी नियुक्ती

 • १९८९च्या तुकडीचे भारतीय माहिती सेवेचे (आयआयएस) अधिकारी भूपेंद्र कैंथोला यांची पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) एका आदेशाद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, ती तीन वर्षांसाठी असेल.
 • सध्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे एफटीआयआयच्या प्रभारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. 
 • संस्थेच्या निमायक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. त्यादरम्यान, संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी पाठराबे यांच्याकडे देण्यात आली होती.

अजित जोशी यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

 • मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे व सध्या चंडिगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘जनधन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. 
 • एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवादिनी’ ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.
 • केंद्र शासनाच्या ‘जनधन’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘स्वच्छ विद्यालय’ आणि ‘मृदा परीक्षण पत्र’ (सॉईल हेल्थ कार्ड) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मनोज वाजपेयीला दादासाहेब फाळके पुरस्कार

 • अभिनेता मनोज वाजपेयी याला हंसल मेहता दिग्दर्शित अलिगड या चित्रपटामधील अभिनयासाठी सर्वोत्तम अभिनेता श्रेणीतील दादासाहेब फाळके पुरस्काराने (समीक्षकांची निवड) गौरविण्यात येणार आहे.
 • अलिगड चित्रपटामधील प्राध्यापक रामचंद्र सिरस यांची मध्यवर्ती भूमिका साकारल्याबद्दल वाजपेयी याला दादासाहेब फाळके पुरस्काराने भूषविण्यात येणार आहे. 
 • हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आता ‘ट्रॅफिक’ या आगामी चित्रपटामध्ये एका पोलिस हवालदाराची भूमिका साकारत आहे.

गुलाम अली यांना हनुमंत पुरस्कार प्रदान

 • पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गुजरातमधील एका कार्यक्रमात हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 • वास्तविक गुलाम अली यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने या पर्वाचे उद्घाटन होणार होते, पण त्यांचा कार्यक्रम ऐन वेळी काही अपरिहार्य कारणांनी रद्द करण्यात आला होता.
 • गुलाम अली आणि अन्य पाच जणांना न्यासातर्फे हनुमंत पुरस्कार देण्यात आले. तर बॉलीवूड कलाकार धर्मेद्र यांच्यासह तिघांना नटराज पुरस्कार देण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्यास उज्जैनमध्ये सुरवात

 • विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत क्षिप्रा नदीत २२ एप्रिल रोजी शाही स्नान केले आणि महिनाभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यास उज्जैनमध्ये २२ एप्रिलपासून सुरवात झाली.
 • बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी देश व परदेशांतूनही भाविक प्राचीन उज्जैननगरीत दाखल झाले आहेत.
 • तृतीयपंथींचा सहभाग हे यंदाच्या कुंभमेळ्यात वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी आखाड्याची स्थापना केली असून, क्षिप्रा नदीवरील गंधर्व घाटावर ९ मेच्या पर्वणीला शाही स्नानाचा लाभ घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द

 • विविध बॅंकांनी कर्जापोटी दिलेले ९,४०० कोटी बुडविणाऱ्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’चा मालक विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
 • पीएमएलए कायदा २००२ नुसार अजामीनपात्र वॉरंटचा विचार करता परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • मल्ल्या यांच्यावर व्यवहारातील अनियमितता आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. मल्ल्या यांचा राजकीय पासपोर्ट अंमलबजावणी संचालनालयाच्या शिफारशीनंतर निलंबित केला होता.
 • विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास ते टाळाटाळ करत आहेत.

सलमान खान रिओसाठी सदिच्छा दूत

 • भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिकसाठी सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खान याची निवड केली.
 • सलमान ५० वर्षांचा असून, देशभरात बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांसाठीही तो प्रेरणास्थान आहे.
 • सुलतान या आगामी चित्रपटात त्याने कुस्तीपटूची भूमिका केली आहे. लहान गावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणाऱ्या स्पर्धकाची कथा यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा