चालू घडामोडी : ७ मे

‘उजाला’ योजनेंतर्गत एलईडी ट्यूबलाइटचे वितरण

  • एलईडी बल्बच्या यशस्वी वितरणानंतर आता केंद्र सरकारतर्फे ‘उन्नत ज्योती फॉर अॅफोर्डेबल एलईडी फॉर ऑल’ अर्थात ‘उजाला’ योजनेंतर्गत एलईडी ट्यूबलाइटचे वितरण करण्यात येणार आहे.
  • याच्या वितरणाची जबाबदारीही ‘एनर्जी एफिशियंसी सर्व्हिसेस लिमिटेड’कडे (ईईएसएल) सोपविण्यात आली आहे.
 काय आहे योजना? 
  • या योजनेंतर्गत १८ ते २० वॉट क्षमतेच्या एक कोटी एलईडी ट्यूबलाइट्सची खरेदी करण्यात येणार आहे. या एलईडी ट्यूबलाइटचे आयुष्य वर्षभराचे असेल.
  • ही ट्यूब ५२ वॉटच्या पारंपरिक ट्यूबलाइटची जागा घेईल. त्यामुळे अंदाजे ६५ टक्के विजेची बचत होण्याची शक्यता आहे.
  • पहिल्या टप्प्यात ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान एलईडी ट्यूबची विक्री करण्यात येणार आहे. त्यानंतर या किमती कमी होतील.
  • सर्वसाधारण ट्यूबलाइट दररोज पाच तास आणि वर्षभरात ३०० दिवस उपयोगात आणल्यास वर्षभराचे विजेचे बिल ३९० रुपये येते. तर, एलईडी ट्यूबचे वार्षिक विजेचे बिल १४८ रुपये येण्याचा अंदाज आहे.
  • गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सुरू झालेल्या एलईडी बल्बविक्रीच्या योजनेतून आजपावेतो १०.२३ कोटी बल्बची विक्री करण्यात यश आले आहे.
  • केंद्राच्या दाव्यानुसार या बल्बच्या वापरामुळे देशात २,६५० मेगावॉट विजेची बचत करण्यात आली आहे. या योजनेमुळे प्रतिदिन ३ कोटी ६४ लाख युनिटची बचत होत आहे.

युनिव्हर्सल बँक

  • देशातील बँकिंग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक व्यावसायिक आणि वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ‘युनिव्हर्सल बँक’ स्थापनेसाठी परवाने देणार आहे.
  • अधिकाधिक स्पर्धकांनी बँकिंग क्षेत्रात उतरावे आणि या क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, या हेतूने रिझर्व्ह बँकेने नियमावलीत बदल केले आहेत.
  • गळेकापू स्पर्धेपासून हे क्षेत्र दूरच राहावे, यासाठी बड्या उद्योगपतींना आणि घराण्यांना सद्य परिस्थितीत परवाने देणार येणार नाहीत.
 युनिव्हर्सल बँकांचे परवाने कोणाला? 
  • किमान ५०० कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची पात्रता असणाऱ्या व्यावसायिकांना.
  • ज्या व्यावसायिकांच्या गाठीशी किमान दहा वर्षांपेक्षा अधिक बिगर बँकिंग वित्तपुरवठा क्षेत्रातील अनुभव आहे.
  • उद्योगक्षेत्रातील ज्या घराण्यांच्या एकूण व्यवसायापैकी ४० टक्क्यांहून अधिक व्यवसाय बिगर बँकिंग वित्तपुरवठ्याशी संबंधित आहे.
  • ज्या व्यावसायिक कंपन्यांची अथवा औद्योगिक घराण्यांची एकूण संपत्ती पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे तसेच, त्यांच्या एकूण व्यवसायापैकी ६० टक्के व्यवसाय बिगर बँकिंगशी संबंधित आहे.
 युनिव्हर्सल बँकांसाठी नियमावली 
  • युनिव्हर्सल बँकांच्या प्रवर्तकांची पहिली पाच वर्षे हिस्सेदारी ४० टक्क्यांपुरतीच मर्यादित असणार असून, सहा वर्षांच्या आत त्यांना बँकेची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • या शिवाय दहा आणि बारा वर्षांनंतर त्यांना आपली हिस्सेदारी अनुक्रमे ३० आणि १५ टक्क्यांपर्यंत घटविता येणार आहे. 
  • बँकेच्या एकूण शाखांपैकी २५ टक्के शाखा ग्रामीण भागांत उघडणेही बंधनकारक असणार आहे.
  • जागतिक पातळीवर मोठी कर्जे देणे, ठेवी स्वीकारणे आणि शुल्काधारित सेवा देणे आदी कामे या बँकांना करता येतील. 
 पेमेंट बँका 
  • युनिव्हर्सल बँकांना परवानगी देण्याबरोबरच गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने २० कंपन्यांना पेमेंट बँकेसाठी परवाने वितरित केले. 
  • या बँकांच्या माध्यमातून दीर्घकालीन तसेच, अल्प कर्जांची उपलब्धता आणि हस्तांतरणासारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
  • या शिवाय देशातील दुर्गम भागातील जनतेसाठी रिझर्व्ह बँकेतर्फे मोबाइल आणि डिजिटल बँकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • परवानाप्राप्त कंपन्यांमधील केवळ आयडीएफसी आणि बंधन यांनाच पूर्ण क्षमतेने व्यावसायिक बँका स्थापनेसाठी परवाने मिळाले आहेत.

लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्ती

  • ब्रिटनची राजधानी लंडन शहराचा महापौर होण्याची मान प्रथमच एखाद्या मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे.
  • लेबर पार्टीचे सादिक खान यांची लंडनच्या महापौरपदी निवड झाली आहे. ते पाकिस्तानी वंशाचे आहेत.
  • त्यांनी महापौरपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव पक्षाचे उमेदवार जॅक गोल्डस्मिथ यांचा पराभव केला. 
  • कंझरव्हेटिव पक्षाच्या गोल्डस्मिथ यांनी लंडनमधील हिंदू आणि शीख नागरिकांना प्रभावित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नावाचा उपयोग केला होता. पण, याचा फायदा त्यांना होताना दिसला नाही.
  • सादिक खान यांनी मानव अधिकार वकील म्हणून कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यानंतर ते खासदार बनले. २००५ पासून ते लेबर पार्टीचे सातवेळा खासदार राहिले आहेत.
  • माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते. कॅबिनेट बैठकीतील ते पहिले मुस्लिम मंत्री होते.

सुब्रतो रॉय यांची पॅरोलवर सुटका

  • सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची चार आठवड्यांच्या पॅरोलवर तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. रॉय यांच्या आईचे वृद्धापकाळामुळे निधन झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना संचित रजा (पॅरोल) मंजूर केली. 
  • सहारा समुहामध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सुब्रतो यांना अटक झाली असून ते गेल्या दोन वर्षांपासून तिहार तुरुंगात आहेत.
  • सहारा समुहाचे संचालक व सुब्रतो यांचे नातेवाईक अशोक रॉय चौधरी यांनाही न्यायालयाने याच आधारे पॅरोलवर सोडले. चार आठवड्यांच्या कालावधीत सुब्रातो हे पोलिसांच्या नजरकैदेत असतील.
  • आपले अशील पळून जाण्याचा अथवा फरार होण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी ग्वाही राय यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दिली आहे.

विनेश फोगट आणि साक्षी मलिक रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

  • भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगटने रिओ ऑलिम्पिक २०१६ मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. विनेश फोगटसोबत साक्षी मलिकनेदेखील ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.
  • साक्षी मलिक ५८ किलो वजनी गटात तर २१ वर्षीय विनेश फोगट ४८ किलो वजनी गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत.
  • भारताकडून प्रथमच दोन महिला मल्लांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून इतिहास घडवला आहे. २०१२ मध्ये गीता फोगटने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवत पहिली महिला मल्ल होण्याचा मान मिळवला होता.
  • भारताकडून एकूण ६ कुस्तीपटूंनी रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये ४ पुरुष मल्ल (योगेश्वर दत्त, संदीप तोमर, नरसिंह यादव, हरदीप सिंग) असून २ महिला मल्ल आहेत.

रवींद्रनाथ टागोर यांची १५५वी जयंती

  • ७ मे १९६१ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोरांना १९१३मध्ये साहित्याचे नोबेल मिळाले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
  • भारताचे जन गण मन व बांग्लादेशचे आमार सोनार बांगला, असे दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिणारे तेच एकमेव.
  • आठव्या वर्षापासून कविता करण्याचा रवींद्रनाथांना छंद लागला. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचा भानूसिंह हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.
  • १३ भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या रवींग्रनाथांना शाळेत जाण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्यांचे सगळे शिक्षण वडीलबंधू हेमेंद्रनाथ यांनी घरातच केले.
  • रवींद्रनाथ टागोरांना ब्रिटिश सरकारने नाईटहूड हा किताब दिला होता, परंतु ब्रिटिशांच्या भारतातल्या धोरणांचा निषेध म्हणून त्यांनी तो परत केला.
  • वयाच्या साठाव्या वर्षी टागोरांनी चित्रकलेस आरंभ केला आणि नंतर त्यातही प्रावीण्य मिळवले. त्याच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने झाली.
  • मोहनदास करमचंद गांधींना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
  • टागोर आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांना एकमेकांबद्दल अपार आदर होता, आणि त्यांच्यामधलं संभाषण प्रसिद्ध झाल्यावर खूप गाजले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा