चालू घडामोडी : १४ मे

एटीएस प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी

  • दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली.
  • ‘एटीएस’चे सध्याचे प्रमुख विवेक फणसळकर यांची लाचलुचपत विरोधी पथकाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नवी मुंबईचे विद्यमान आयुक्त प्रभात रंजन यांना पदोन्नती देऊन विधी आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून, तर पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या महासंचालकपदावर विष्णू देव मिश्रा यांना पदोन्नती देण्यात आली.
  • राज्य पोलिस दलातील विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून महासंचालक दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने जाहीर केल्या.
  • राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांची पोलिस गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती झाली आहे. 
  • पोलिस महासंचालक कार्यालयात प्रशासन विभागाचे अतिरिक्त महासंचालक असलेल्या व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची नियोजन व संनियंत्रण विभागाचे अतिरिक्त महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली.
  • त्यांच्या जागी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे यांची बदली करण्यात आली. सरवदे यांच्यानंतर सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावर विनय कारगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान भारतात दाखल

  • जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान ‘अ‍ॅन्टोनोव्ह एन-२२५ मिर्या’ भारतात दाखल झाले असून, हैदराबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे लॅंडिंग झाले.
  • अवाढव्य आकारमान असणाऱ्या या विमानाची इंजिने देखील तितकीच शक्तिशाली आहेत. सहा टर्बोफॅन इंजिनांचा समावेश असणारे हे जगातील एकमेव विमान असून त्याचे उड्डाणाप्रसंगीचे कमाल वजन हे ६४० टन एवढे आहे.
  • सामान्य विमानांच्या तुलनेत या कार्गो जेटच्या पंखांचा विस्तारदेखील मोठा आहे. वजनदार वस्तू आणि माल घेऊन दूरपर्यंत प्रवास करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. तुर्केमिनिस्तानमधून हे विमान हैदराबादेत दाखल झाले आहे.
  • अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने गेल्या महिन्यात युक्रेनच्या अ‍ॅन्टोनिक कंपनीसोबत विमानाच्या सुट्या भागांची जुळवणी, उत्पादन आणि देखभालीसाठी करार केला होता.
  • ‘रिलायन्स डिफेन्स’ आणि ‘अ‍ॅन्टोनोव्ह’ या दोन कंपन्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीसोबत मिळून ५० ते ८० एवढी आसनक्षमता असणाऱ्या विमानांची निर्मिती करणार आहेत.

‘संत निरंकारी मिशन‘चे प्रमुख बाबा हरदेवसिंग निधन

  • ‘संत निरंकारी मिशन‘ या आध्यात्मिक संघटनेचे प्रमुख बाबा हरदेवसिंग यांचे कॅनडातील मॉंट्रियल शहरात मोटार १३ मे रोजी अपघातात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.
  • हरदेवसिंग यांचे वडील बाबा बटूसिंग यांनी १९२९ मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना केली होती. बाबा बटूसिंग यांची १९८० मध्ये हत्या झाली. त्यानंतर बाबा हरदेवसिंग हे निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले होते.
  • निरंकारी मिशनला विश्व बंधुता (युनिव्हर्सल ब्रदरहूड मिशन) म्हणूनही ओळखले जाते. हरदेवसिंग यांनी २७ देशांतील शेकडो ठिकाणी मिशनची सुरवात केली. जगभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. 
  • हरदेवसिंग यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९५४ रोजी दिल्लीत झाला होता. दिल्लीतच त्यांचे शिक्षण झाले होते.
  • हरदेवसिंह यांनी आपल्या अनुयायांना अध्यात्मिक मूल्यांतून समानता आणि साधेपणाचा संदेश दिला.

आखाती देशांतील कर्तृत्ववान भारतीयांमध्ये डॉ. दातार

  • ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांचा समावेश 'फोर्ब्स मिडल ईस्ट' यादीत झाला आहे.
  • फोर्ब्स नियतकालिकातर्फे नुकताच आखाती देशांतील कर्तृत्ववान भारतीयांची यादी करण्यात आली. यामध्ये यंदाच्या यादीत धनंजय दातार यांचा ३३वा क्रमांक लागला आहे.
  • 'फोर्थ टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१६' हा पुरस्कार सोहळा नुकताच संयुक्त अरब अमिरातीत (युएई) झाला. कर्तृत्ववान भारतीयांचे यश साजरे करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • 'अल अदील ग्रुप'चे संस्थापक डॉ. दातार हे प्रामुख्याने रिटेल क्षेत्रात कार्यरत असून 'फोर्ब्स मिडल ईस्ट'च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.
  • 'अल अदील ट्रेडिंग'ने डॉ. धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखाली नऊ हजार भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
  • मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे.
  • 'अल अदील' समूहाचे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा 'मसाला किंग एक्स्पोर्टस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड' नावाने मुंबईत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा