चालू घडामोडी : १७ मे

मसूद अजहरविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

  • पठाणकोट येथील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर व अन्य तिघांविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली.
  • राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मसूद अजहर व त्याचा भाऊ अब्दुल रौफ, काशीफ जान व शाहीद लतिफविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात यावी अशी मागणी इंटरपोलकडे केली होती.
  • पठाणकोट येथील हवाई तळावर २ जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ जवान हुतात्मा झाले होते.
  • पठाणकोटमध्ये हल्ला करण्यासाठी काशीफ आणि शाहीद लतिफने बामियाल सेक्टरमधून भारतात घुसखोरी केली होती.
  • या दहशतवादी हल्यानंतर भारताने पाकिस्तानकडे हल्ल्याचे पुरावे दिले होते. शिवाय, या हल्यामागे मसूदचा हात असल्याचेही ठोस पुरावे देत कारवाईची मागणी केली होती.

अरुप रहा यांनी तेजस विमान चालवले

  • ३३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हवाई दलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झालेले तेजस विमान हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी चालवले. तेजस विमान चालवणारे ते पहिले हवाईदल प्रमुख आहेत.
  • जास्तीत जास्त स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन निर्मिती करण्यात आलेल्या तेजस प्रकल्पाची सुरुवात ८०च्या दशकात झाली होती. 
  • तेजसच्या आतापर्यंत ३०५० चाचण्या झाल्या असून, २००१ मध्ये तेजसने पहिले उड्डाण केले होते. तेजस हवाई दलातून निवृत्त झालेल्या मिग-२१ विमानांची जागा घेणार आहेत.
  • भारतीय वायूदलाकडे सध्या ३३ स्क्वाड्रन आहे. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये १६ ते १८ विमाने आहेत. या स्क्वाड्रनमध्ये जुन्या मिग-२१ आणि मिग-२७ विमानांच्या ११ स्क्वाड्रन आहेत.
  • चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा विचार करता आपल्याकडे ४५ स्क्वाड्रन सज्ज असली पाहिजेत. चार विमानांसह तेजसचे पहिले स्क्वाड्रन जुलै महिन्यात वायूदलात दाखल होणार आहे.

खगोलवैज्ञानिक आंद्रे ब्राहिक यांचे निधन

  • नेपच्यून ग्रहाच्या कडय़ांचा शोध लावणाऱ्या संशोधकांपैकी एक असलेले फ्रेंच खगोलवैज्ञानिक आंद्रे ब्राहिक (वय ७३) यांचे १७ मे रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म नाझीव्याप्त पॅरिसमध्ये १९४२ मध्ये झाला. युद्धानंतर त्यांनी खगोलभौतिकीचा अभ्यास सुरू केला. १९८० मध्ये ब्राहिक हे सौरमाला संशोधनात तज्ज्ञ बनले.
  • १९८४ मध्ये त्यांनी सौरमालेच्या संशोधनाचा एक कार्यक्रम हाती घेतला, त्यात त्यांनी वायूच्या बनलेल्या नेपच्यून ग्रहाभोवती कडी असल्याचा शोध अमेरिकी खगोलवैज्ञानिक विल्यम हबार्ड यांच्यासमवेत लावला होता.
  • पॅरिस विद्यापीठात ते प्राध्यापक होते, शिवाय कमिशन फॉर अ‍ॅटॉमिक एनर्जी अँड अल्टरनेटिव्ह एनर्जीज या संस्थेत खगोलभौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते.
  • शनि व त्याची कडी या विषयात रुची निर्माण झाल्यानंतर त्यांनी नेपच्यूनभोवतालची लिबर्टी, फट्रर्निटी व एगलाइट हे तीन कडय़ांचा समावेश असलेले एक मोठे कडे शोधले होते.
  • ते चांगले कथाकार व लेखकही होते. १९९०मध्ये ३४८८ क्रमांकाच्या लघुग्रहाला ब्राहिक यांचे नाव देण्यात आले होते.

सर्वात लहान वयाचा फॉर्म्युला-वन विजेता

  • रेड बुल संघाच्या १८ वर्षीय मॅक्स वेरटॅपेनने स्पॅनिश ग्रां. प्रि. शर्यतीच्या जेतेपदावर कब्जा करत फॉर्म्युला-वन शर्यतीच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा शर्यत विजेता होण्याचा मान पटकावला.
  • १८व्या वर्षी जेतेपद पटकावत मॅक्सने सेबॅस्टियन व्हेटेलचा सर्वात कमी वयात जेतेपद पटकावण्याचा विक्रम मोडला.
  • लुइस हॅमिल्टन व निको रोसबर्ग यांच्या गाडय़ांमध्ये झालेली टक्कर मॅक्ससाठी निर्णायक ठरली. मर्सिडीझ संघाचे व जेतेपदाचे प्रबळ दावेदार हे दोघे शर्यत पूर्ण करू शकले नाहीत.
  • रेड बुलने वरिष्ठ शर्यतपटू डॅनियल रिचाडरेऐवजी मॅक्सला बढती देण्याचा निर्णय घेतला. फेरारीच्या किमी राइकोइनने दुसरे तर सेबॅस्टियन व्हेटेलने तिसरे स्थान पटकावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा