चालू घडामोडी : १८ मे

पृथ्वी-२ची चंडीपूर येथून यशस्वी चाचणी

  • जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची १८ मे रोजी ओडिशातील चंडीपूर येथून यशस्वी चाचणी करण्यात आली.
  • पृथ्वी-२च्या दोन चाचण्या घेण्यात येणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे दुसरी चाचणी रद्द करण्यात आली. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ मध्ये अशाप्रकारची दुहेरी चाचणी घेण्यात आली होती आणि ती यशस्वीही ठरली होती. 
  • २००३ साली भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले ‘पृथ्वी -२ हे भारताच्या प्रतिष्ठित अशा एकात्मिक दिशादर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत डीआरडीओने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र आहे.
  • या क्षेपणास्त्राची यापूर्वीची चाचणी याच टेस्ट रेंजमध्ये १४ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आली होती.
पृथ्वी-२ची वैशिष्ट्ये
उंची ९ मीटर
प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
पल्ला ३५० किमी
अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता ५०० ते १००० किलो
इंजिन दोन (द्रवरूप इंधन)
अत्याधुनिक यंत्रणा लक्ष्य शोधण्यासाठी प्रगत दिशादर्शन प्रणालीमुळे अचूक वेध

दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना ‘मॅन बुकर पुरस्कार’

  • दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांच्या ‘द व्हेजिटेरियन’ या पुस्तकाला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
  • ‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी तीन भागांत असून, यातील नायिका मांसाहार बंद करण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर तिचा होणाऱ्या छळाचे वर्णन यात आहे. 
  • हान यांच्यासह इटलीच्या लेखिका एलेना फेरांट, अंगोलाचे लेखक, जोस एदुआर्दो अंगुलसा, चीनचे लेखक यान लियांके, तुर्कस्तानचे ओरहान पामुक व ऑस्ट्रेलियाचे रॉबर्ट सिटलर यांची नावे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली होती.
  • ‘द व्हेजिटेरियन’चा इंग्रजी अनुवाद ब्रिटनमधील दिबोरा स्मिथ यांनी केला आहे. या पुरस्कारासाठी हान व स्मिथ यांना प्रत्येकी ५० हजार पौंड देण्यात येणार आहेत, असे बुकर फाउंडेशनने जाहीर केले आहे.
  • ‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी पोटरेबेलो बुक्सने प्रकाशित केली आहे. या पुरस्कारासाठी १५५ पुस्तकांमधून हे पुस्तक एकमताने निवडण्यात आले आहे.
  • यापूर्वी कांग टुडेज यंग आर्टिस्ट पुरस्कार, यी यांग साहित्य पुरस्कार, कोरियन साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत.

एडीबीच्या कार्यकारी अध्यक्षपदी स्वाती दांडेकर

  • आसियान डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी अध्यक्षपदी मूळच्या नागपूरच्या आणि मराठी असलेल्या स्वाती दांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
  • अमेरिकन सिनेट सभागृहाने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले असून, त्यांना राजदूतासारखाच दर्जा मिळणार आहे.
  • २००३मध्ये अमेरिकन प्रतिनिधी सभागृहावर निवडून आलेल्या पहिल्याच भारतीय महिला असलेल्या स्वाती दांडेकर रॉबर्ट ओर यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नोव्हेंबर २०१५मध्ये स्वाती दांडेकर यांना आसियान डेव्हलपमेंट बँकेच्या या सर्वोच्च पदावर मनोनित केले होते. त्यावर प्रतिनिधी सभागृहाने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
  • २००३ ते २००९ या काळात त्या प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्य होत्या. त्यानंतर २००९ ते २०११ या काळात त्या सिनेटच्याही सदस्य होत्या. शिक्षण मंडळासह अनेक संस्थांवर त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.
  • स्वाती दांडेकर या मूळच्या नागपूरकर असून, नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी बी.एस.ची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
  • अरविंद दांडेकर हे त्यांचे पती आहेत. १९७३ मध्ये हे दाम्पत्य भारतातून अमेरिकेला गेले. अरविंद दांडेकर फास्टेक इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

मुकेश अंबानी यांना ‘ऑथमर गोल्ड मेडल फॉर आन्थ्रप्रुनियल लीडरशीप’ पुरस्कार

  • उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि विशेषत: गुजरात येथील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारल्याबद्दल विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना प्रतिष्ठेच्या ‘ऑथमर गोल्ड मेडल फॉर आन्थ्रप्रुनियल लीडरशीप’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • ‘द केमिकल हेरिटेज फाऊंडेशन’च्या वतीने अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने अंबानी यांना गौरविण्यात आले.
  • मुकेश अंबानी यांनी या पुरस्काराचे श्रेय आपले वडील स्व. धीरुभाई अंबानी यांना दिले.

मित्सुबिशी कंपनीच्या अध्यक्षांचा राजीनामा

  • वाहन उत्पादन क्षेत्रातील मित्सुबिशी या कंपनीतील इंधनाच्या आकडेवारीमधील (फ्युएल डेटा स्कॅम) गैरव्यवहारप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागातून आईकावा यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. या संपूर्ण गैरव्यवहाराची सुरुवात याच विभागातून झाल्याने आईकावा यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे. 
  • मित्सुबिशीमधील काही कर्मचाऱ्यांनी सहा लाखांपेक्षा अधिक मोटारींच्या इंधनक्षमतेविषयी खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली होती.
  • कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता ५ ते १० टक्क्यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे. परंतू या प्रकरणाचा तपास अद्याप पुर्ण झालेला नाही.
  • काही दिवसांपुर्वी दुसरी जपानी वाहन कंपनी निस्सान मोटर्सने मित्सुबिशीतील ३४ टक्के हिस्सेदारीची खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
  • सध्या आईकावा यांच्या जागी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओसामू मासुको हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. निस्सानशी हिस्साविक्री करार पूर्ण होईपर्यंत त्यांना दोन्ही पदांचा कारभार सांभाळावा लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा