चालू घडामोडी : २५ मे

आसामचे १४वे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल

 • भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्वानंद सोनोवाल यांनी आसामचे १४वे मुख्यमंत्री म्हणून २३ मे रोजी शपथ घेतली. यानिमित्ताने पूर्वोत्तर राज्यात प्रथमच भाजपा सत्तारूढ झाला आहे. सोनोवाल आसामचे पहिले भाजप मुख्यमंत्री आहेत.
 • सोनोवाल यांच्यासह ११ जणांनी या वेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडो पीपल्स फ्रंट यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
 • राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 सर्बानंद सोनोवाल यांची राजकिय कारकिर्द 
 • ३१ ऑक्टोबर १९६२ रोजी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात जन्मलेले ५४ वर्षीय सोनोवाल यांनी महाविद्यालयीन राजकारण ते केंद्रीय मंत्रिपद असा प्रवास केला आहे.
 • १९९२ ते १९९९ या कालावधीत ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे (आसू) अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात आसुचा बराच प्रभाव असून आसूने सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.
 • त्यांनी ८ फेब्रुवारी २०११ रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर राज्यात भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
 • पुढे २०१२ मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आणि आजही ते या पदावर कायम आहेत.
 • सध्या सोनोवाल आसामच्या लखिमपूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते व ते केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रीपद सांभाळत होते.

मालदिवच्या माजी अध्यक्षांना ब्रिटनमध्ये आश्रय

 • मालदिवचे माजी अध्यक्ष महंमद नशीद यांना ब्रिटनने राजकीय निर्वासित दर्जा देण्यात आला. दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून नशीद यांना १३ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 • नशीद यांना जानेवारी २०१६मध्ये पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी श्रीलंका, भारत आणि ब्रिटनने घडवून आणलेल्या वाटाघाटीनंतर दिली गेली होती.
 • उपचारानंतर ते मालदीवला परत जाणे अपेक्षित होते. परंतु त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळाला आहे.
 • नशीद हे ‘मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टी’ (एमडीपी) पक्षाचे नेते व मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते आहेत. 
 • मालदिवमध्ये २००८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पहिले अध्यक्ष आहेत.

करबुडव्यांची नावे होणार जाहीर

 • येत्या आर्थिक वर्षापासून प्राप्तिकर विभागाने एक कोटींहून अधिक कर बुडविलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षापासूनच करचुकवेगिरी करणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रांमधून जाहीर करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत ६७ जणांची नावे जाहीर केली आहेत.
 • मात्र, हे सर्व वीस ते तीस कोटी आणि त्याहून अधिक कर चुकविणारे आहेत. नव्या निर्णयामुळे एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक रुपयांची करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
 • त्यामुळे अनेक लोकांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. ही नावे पुढील वर्षी ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्यात येतील. 

मिशन मान्सून प्रकल्प

 • मान्सूनचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भू विज्ञान विभागाने ‘मिशन मान्सून’ हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • सध्या भारताच्या हवामान विभागाकडे दहा ते वीस दिवस व संपूर्ण मोसमाचा अंदाज देण्याचे कसब आहे. त्याद्वारे गेल्या दोन वर्षांत कमी पावसाचे अचूक भाकित हवामान विभागाने केले होते.
 • सध्या स्टॅटॅस्टिकल मॉडेल व डायनॅमिक मॉडेल दोन्हीचा एकत्रित वापर केला जातो. मात्र, लवकरच यासाठी डायनॅमिक मॉडेलचा वापर सुरू केला जाईल.
 • ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत देशातील १.१ कोटी शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषांमधून कृषी व हवामानविषयक इशारे-सल्ले मिळतात.
 • कृषी-हवामान आधारित सेवांचा लाभ ४२ हजार कोटी रुपये इतका होता. गहू, तांदूळ, ऊस, कापूस उत्पादक या सेवांचे प्रमुख लाभार्थी आहेत.

पोटॅशिअम ब्रोमेटवर बंदी?

 • अन्न मिश्रण म्हणून पोटॅशिअम ब्रोमेटवर केंद्र सरकार बंदी आणणार असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा जाहीर केले. 
 • सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट (सीएसई)ने नुकताच ३४ प्रसिद्ध ब्रॅंडमधील ८४ टक्के ब्रेड, बन व पावाचे नमुने सदोष आढळले असल्याचा दावा केला होता.
 • यामध्ये पोटॅशिअम ब्रोमेट व पोटॅशिअम आयोडेटचा अंश असल्याचे आढळून आले होते, जे की लोकांच्या आरोग्यास हानिकारक आहे.
 • यासोबतच ब्रेडमधील एका रसायनात २बी कार्सिनोजेन (कर्करोगाची शक्यता असणारा घटक) असल्याचा दावाही करण्यात आला होता. 
 • आरोग्य मंत्रालयाने भारतीय अन्न सुरक्षा व प्रमाणीकरण विभागाला (एफएसएसएआय) याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकार योग्य ती पावले उचलणार आहे. 
 कसा होतो पोटॅशिअम ब्रोमेटचा वापर? 
 • पोटॅशिअम ब्रोमेट हे उत्तम मिश्रण करणारा संमिश्रक आहे. बेकरी उत्पादन वाढविण्यासाठी व बेकरी मिश्रणे एकसमान करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
 • पोटॅशिअम आयोडेट हे बेकरीतील पीठावर प्रक्रिया करणारा संयुग आहे. 
 • पोटॅशिअम ब्रोमेट हे ११ हजार अन्न मिश्रितांपैकी एक असून, त्याचा अन्न उत्पादनासंदर्भातील व्यवसायात वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 • एफएसएसएआयने पोटॅशिअम ब्रोमेटला अन्न मिश्रितांच्या यादीतून वगळण्याची शिफारस केंद्राकडे केली असून, अन्न मिश्रितांच्या यादीतून पोटॅशिअम ब्रोमेटला वगळल्यानंतर त्यावर बंदी आणता येणार आहे.

२ टिप्पण्या:

 1. Dear sir
  I have send request to join me your mpsc study group but no replay me please sir join me your mpsc study group my what up mo no. is 9975486763.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Dear Mahendra,
   We dont have any Whatsapp Group.
   In case if we creat such group we will inform you.

   Regards
   Team MPSC Toppers

   हटवा