चालू घडामोडी : २८ मे

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 • भारताने २९० किलोमीटर पल्ल्यावरील लक्ष्य भेदणाऱ्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची २८ मे रोजी यशस्वी चाचणी घेतली.
 • हवाई दलाच्या वतीने पोखरण येथे ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत अपेक्षेनुसार क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठले.
 • ब्राह्मोसने जगातील सर्वांत श्रेष्ठ सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध केले आहे.
 • हवाई दलाने गेल्यावर्षीच क्षेपणास्त्र प्रणाली आत्मसात केली होती. जेणेकरून सीमेवरचे शत्रूंची रडार, संचार प्रणालीसारखी यंत्रणा नष्ट करता येईल. ही यंत्रणा नष्ट केल्यास शत्रुराष्ट्रांना आपल्या विमानांना लक्ष्य करता येणार नाही.

प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन

 • ‘समाजमनस्क समीक्षक’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ समीक्षक, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
 • प्रा. जाधव यांचा जन्म बडोद्याचा; पण कार्यभूमी महाराष्ट्र. त्यांनी सुरवातीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी केली.
 • पुढे मुंबई, औरंगाबाद, अमरावती येथील महाविद्यालयांत १२ वर्षे अध्यापन केल्यानंतर वाईच्या विश्वकोशात एका विभागाचे संपादक म्हणून त्यांनी १९ वर्षे कार्य केले. नंतर त्यांनी मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली.
 • गाढा व्यासंग असूनही त्यांनी त्याचे प्रदर्शन कधीही केले नाही; पण व्याख्यानांतून त्यांच्या व्यासंगाचे दर्शन व्हायचे. कविता, ललित, कोश अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले.
 • दलित साहित्याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवून समीक्षेच्या अंगाने या साहित्यप्रवाहाचे श्रेष्ठत्व समाजात रुजविण्याचे काम प्रा. जाधव यांनी केले.
 • ‘निळी पहाट’, ‘निळे पाणी’, ‘आनंदाचा डोह’, ‘चंदेरी चित्रहार’, ‘सांस्कृतिक मूल्यभेद’ या ग्रंथांमुळे साहित्यविशव ढवळून निघाले.
 • ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’ या आणि अन्य ग्रंथांमुळे मराठी साहित्याच्या समीक्षेला त्यांनी एक नवी दिशा मिळवून दिली.
 • औरंगाबाद येथे २००४मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते बिनविरोध अध्यक्ष झाले.
 • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन २७ मे १९९४ ला झाले. बरोबर त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनी डॉ. जाधव यांचेही देहावसान झाले.
साहित्यसंपदा
आनंदाचा डोह निळी पहाट पंचवटी हे मित्रवर्या
विचार शिल्प निळी क्षितिजे प्रतिमा कविता आणि रसिकता
वासंतिक पर्व निळे पाणी बापू समीक्षेतील अवतरणे

पुरस्कार
जी. ए. कुलकर्णी पारितोषिक ग्रंथोत्तेजक पुरस्कार
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यशवंतराव चव्हाण पुरस्कार
श्री. ना. बनहट्टी स्मृती पुरस्कार प्रियदर्शिनी पुरस्कार

सहा प्रादेशिक भाषांमध्ये PMO संकेतस्थळ

 • पंतप्रधानांचे इंग्रजीमध्ये असणारे संकेतस्थळ २८ मे रोजी सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आले.
 • हे संकेतस्थळ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे जनता आता पंतप्रधांनांशी अधिक चांगल्या पद्धतीने संपर्क साधू शकणार आहे.
 • नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही संकेतस्थळांचे उद्घाटन केले. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे नेतृत्व गुरू जग्गी वासुदेव यांच्याकडे

 • आंतरराष्ट्रीय योगदिन २१ जूनला साजरा होत असून संयुक्त राष्ट्रातील कार्यक्रमात इशा फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव नेतृत्व करणार आहेत.
 • पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन गेल्या वर्षी साजरा झाला होता. त्यावेळी सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून, श्रीश्री रविशंकर तसेच अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या तुलसी गॅबार्ड सहभागी झाल्या होत्या.
 • आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी योग दिन सुरू करण्यात आला होता, त्याचा प्रस्ताव भारताने मांडला व तो संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा