चालू घडामोडी : १ जून

नौदलप्रमुखपदी अ‍ॅडमिरल सुनील लांबा

 • नौदलाचे प्रमुख म्हणून अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सूत्रे हाती घेतली. अ‍ॅडमिरल आर. के. धोवन निवृत्त झाल्याने त्यांची जागा लांबा यांनी घेतली आहे.
 • नौदलातील दिशादर्शन व इतर तंत्रात पारंगत असलेले लांबा यांना तीन वर्षांचा कालावधी नौदलप्रमुख म्हणून मिळणार आहे.
 सुनील लांबा 
 • लांबा हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी असून ते देशाचे २१वे नौदल प्रमुख आहेत.
 • लांबा यांना तीन दशकांचा अनुभव असून त्यांनी आयएनएस सिंधुदुर्ग व आयएनएस दुनागिरी या युद्धनौकांवर नॅव्हीगेटिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे.
 • याशिवाय त्यांनी चार लढाऊ युद्धनौका आयएनएस काकीनाडा, आयएनएस हिमगिरी, आयएनएस रणविजय आणि आयएनएस मुंबईचे प्रमुखपद भूषवले आहे.
 • सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटचे ते माजी विद्यार्थी असून तेथे त्यांनी अध्यापनही केले आहे.
 • परम विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकांनी ऍडमिरल लांबा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 • अॅडमिरल लांबा नौसेनेचे प्रमुख होण्याआधी नौसेनेच्या पश्चिम भागाची जबाबदारी सांभाळत होते. १ जानेवारी १९७८ला ते भारतीय नौसेनेत सामील झाले.

कृषी कल्याण अधिभार १ जूनपासून लागू

 • केंद्रीय अर्थ संकल्पात मंजूर झालेला वाढीव सेवाकर व कृषी कल्याण अधिभार १ जूनपासून लागू होत असल्याने हॉटेल, टेलिफोन, विमान आणि रेल्वे प्रवास यासह अनेक सेवा महाग होणार आहेत.
 • वित्तमंत्री अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या व संसदेने मंजूर केलेल्या अर्थ संकल्पात सेवाकरात (शिक्षण उपकरासह) १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के एवढी वाढ करण्यात आली.
 • ०.५ टक्के स्वच्छ भारत अभियानासाठी लावलेला अधिभार आधीपासूनच लागू आहे. त्यात आता कृषी कल्याण अधिभार नावाचा ०.५ टक्के नवा अधिभारही सेवाकरावर लावला आहे.
 • त्यामुळे ज्या सेवांना सेवाकर लागू आहे, अशा सेवांवर १ जूनपासून नवा अधिभार धरून एकूण १५ टक्के कर लागू होईल. 
 • सेवाकराच्या नकारात्मक यादीत समावेश असलेल्या व पूर्णपणे वगळलेल्या ४७ सेवा वगळून सर्वच सेवांना हा वाढीव सेवाकर व अधिभार लागू होईल.
 • कृषी कल्याण अधिभारातून मिळणाऱ्या सर्व रकमेचा विनियोग फक्त शेती सुधारणा व शेतकरी कल्याणाच्या कामांसाठी केला जाईल, असे वित्तमंत्र्यांनी याआधीच जाहीर केले आहे.

दिल्लीत सेबीचे विशेष न्यायालय

 • भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’शी संबंधित तंटे-कज्जांची गतिमान सुनावणी होऊन लवकर तड लागावी यासाठी राजधानी दिल्लीत विशेष सेबी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
 • देशभरात स्थापण्यात आलेले हे चौथे विशेष सेबी न्यायालय आहे. सरकार आणि उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून या विशेष न्यायालयांची रचना करण्यात आली आहे.
 • या विशेष न्यायालयावर केंद्र सरकारकडून एका न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीशी विचारविनिमय करून केली जाईल.
 • सेबी कायद्यातील दुरुस्तीने ‘सेबी’ने नियमभंग करणाऱ्या कंपन्यांकडून दंडवसुली, दंडवसुली करताना बँक खाते व स्थावर-जंगम मालमत्तांवर जप्ती आणि प्रसंगी आरोपीला अटक करण्याचेही अधिकारही मिळविले आहेत.
 • २०१४ मध्ये सेबी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे तीन विशेष न्यायालये कार्यान्वित झाली आहेत.

स्वीत्झर्लंडमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा

 • जगातील सर्वात लांब आणि खोल गोथार्ड रेल्वे बोगद्याचे स्वीत्झर्लंडमध्ये १ जूनमध्ये उद्घाटन झाले.
 • विशेष म्हणजे ५७ किमी लांबीचा (सुमारे ३७ मैल) हा द्विमार्गी बोगदा असून, त्या बोगद्याचे काम जवळपास १७ वर्षांपासून सुरू होते.
 • हा बोगदा स्वीस आल्प्स पर्वतराजीच्या खालून जाणार असून, हायस्पीड रेल्वेद्वारे उत्तर आणि दक्षिण युरोपला जोडणार आहे.
 • हा बोगदा एर्स्टफ्लेडजवळील गोथार्ड खिंडीमधून सुरू होऊन तिसिनो प्रांतात समाप्त होतो. या बोगद्यामुळे झुरिच-मिलान प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होईल.
 • या बोगद्याचा प्राथमिक आराखडा स्विस अभियंते कार्ल एडवर्ड ग्रुनर यांनी १९४७ मध्ये बनविला होता. मात्र, प्रशासकीय अनास्था आणि खर्चाच्या मुद्द्यावरून हे काम रेंगाळत गेले.
 • अखेर १९९९ मध्ये त्याला प्रारंभ झाला आणि १७ वर्षांनंतर १२ अब्ज स्विस फ्रॅंक खर्च होऊन हे काम पूर्ण करण्यात आले.
 • हा बोगदा आल्प्स पर्वतराजीच्या पृष्ठभागापासून २.५ कि.मी. खोलीवर असून, खडकांमधून गेलेला आहे.
 • या बोगद्याद्वारे दररोज २६० मालवाहू रेल्वे आणि ६५ प्रवासी रेल्वे धावू शकतील. या बोगद्यामुळे रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, अवजड माल वाहून नेणे सुलभ होईल.
 जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदे 
 • गोथार्ड (स्वित्झर्लंड) : ५४ किमी
 • सेईकन (जपान) : ५३.९ किमी
 • चॅनेल टनेल (ब्रिटन-फ्रान्सदरम्यान): ५०.५ किमी 

कुकने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

 • इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करताना सर्वात कमी वयात १० हजार धावा करण्याच्या विक्रम केला.
 • याआधी हा विक्रम तेंडुलकरच्या नावावर होता. कुक अद्याप ३१ वर्षे १५७ दिवसांचा आहे आणि सचिनने ही कामगिरी ३१ वर्षे ३२६ दिवसांचा असताना केली होती.
 • सर्वांत कमी वयात ७ हजार, ८ हजार, ९ हजार आणि आता १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही कुकच्या नावावर नोंदवला गेला आहे.
 • १० हजार धावांपर्यंत पोहोचण्यासाठी कुकने कमी वेळ घेतला. भारताविरुद्ध २००६मध्ये कसोटी कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या या फलंदाजाने ३७४३ दिवसांत ही किमया केली. त्याने अन्य एक भारतीय राहुल द्रविडचा विक्रम मोडला. द्रविड ४२९८ दिवसांत १० हजार धावा करणारा फलंदाज ठरला होता.
 • कुक कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा जगातील १२वा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज आहे.
 • याआधी सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड, कुमार संगकारा, ब्रायन लारा, शिवनरेन चांदरपॉल, महेला जयवर्धने, अलेन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि सुनील गावस्कर यांनी दहा हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

1 टिप्पणी: