चालू घडामोडी : १० जून

पी-नोट्सबाबत नियम कठोर

  • देशाच्या भांडवली बाजारात विदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीचे एक पसंतीचे माध्यम असलेल्या पार्टिसिपेटरी नोट्स अर्थात पी-नोट्सला वेसण घालणाऱ्या कठोर नियमांची बाजार नियंत्रक ‘सेबी’ने १० जून रोजी घोषणा केली.
  • यामुळे आता गुंतविल्या जाणाऱ्या निधीचा स्रोत खुला केल्याशिवाय आणि त्यांचे अंतिम लाभार्थी यांची ओळख पटवून दिल्याशिवाय पी-नोट्सचा पर्याय विदेशी संस्थांना यापुढे वापरता येणार नाही.
  • काळा पैसा शोधण्यासाठी केंद्र सरकारने स्थापलेल्या विशेष तपास दल (एसआयटी)च्या शिफारशींनुसार, सेबीने ‘ऑफशोअर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स (ओडीआय)’ नियमांतील दुरुस्ती मंजूर केली आहे.
  • नव्या नियमांमुळे पी-नोट्स गुंतवणुकीला भारतातील ‘केवायसी’ नियम आणि काळा पैसा प्रतिबंधाचा कायदा लागू होईल. 
  • पी-नोट्सधारक संस्थांना दर महिन्याला सेबीकडे अहवाल द्यावा लागेल आणि ज्या गुंतवणूकदारांना लाभ हस्तांतरित केला त्यांचीही माहिती सेबीला द्यावी लागेल. प्रचलित पद्धतीनुसार ही माहिती देण्याचे बंधन नव्हते.
  • गेल्या महिन्यात पी-नोट्सधारकांची ओळख पटवून देणारे ‘केवायसी’ नियम कडक करण्यासंबंधाने सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सूतोवाच केले होते. 
 ‘पी-नोट्स’ आणि काळा पैसा 
  • विदेशातील गुंतवणूकदारांना उपलब्ध झालेला वेळ वाचविणारा आणि किफायती असा हा पर्याय आहे.
  • भारतातील नोंदणीकृत विदेशी वित्तसंस्थांकडून हा पर्याय विदेशस्थ गुंतवणूकदारांना त्यांच्या भारतातील बाजारात प्रत्यक्ष नोंदणीशिवाय (म्हणजे त्यांची ओळख गोपनीय राखून) दिला जातो.
  • काळ्या पैशाला, इतकेच नव्हे तर दहशतवाद्यांच्या पैशाला या मार्फत दलाल स्ट्रीटवर पाय फुटत असल्याचे यापूर्वी ‘एसआयटी’ने बिनदिक्कत म्हटले आहे.
  • भारतीय भांडवली बाजारात झालेल्या एकूण विदेशी गुंतवणुकीचा १० टक्के हिस्सा म्हणजे साधारण २.२ लाख कोटी रुपये हे पी-नोट्समार्फत आले आहेत.
  • २००७ साली बाजार विलक्षण तेजीत असताना हे प्रमाण तत्कालीन एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ५५ टक्क्यांपर्यंत वधारले होते. परंतु त्यानंतर नियामकांच्या कठोर पवित्र्यानंतर सध्या हे प्रमाण ९.३ टक्क्य़ांवर उतरले आहे.

भारत व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ निर्यात करणार

  • भारत व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ ही अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्रप्रणाली विकणार आहे. ‘एमटीसीआर' गटामधील प्रवेशाने भारताला क्षेपणास्त्रांची निर्यात करणे आता शक्य होणार आहे.
  • शस्त्रास्त्र आयातीमध्ये जगात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या भारताने आता शस्त्रास्त्र निर्यातीकडे लक्ष पुरविण्यास सुरवात केली आहे.
  • व्हिएतनामसह आणखी पंधरा देशांना ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे निर्यात करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याच्या दृष्टीनेही भारताने पावले टाकण्यास सुरवात केली आहे.
  • भारत व रशियाच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
  • केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच रशियाकडे ‘ब्राह्मोस’ एरोस्पेसची मागणी केली आहे. या एरोस्पेसमधूनच क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते.
  • त्यानंतर अन्य देशांना ही क्षेपणास्त्रे विकण्यास चालना देण्यात येणार आहे. पंधरा देशांना ही क्षेपणास्त्रे देण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
  • यामध्ये पहिल्या प्राधान्यक्रमाच्या यादीत व्हिएतनामसह इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, चिली व ब्राझीलचा समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या यादीध्ये आणखी अकरा देश आहेत.
 ब्राह्मोस : अत्याधुनिक क्षेपणास्त्र 
  • ध्वनीच्या तिप्पट वेगवान असलेली ब्राह्मोस ही क्षेपणास्त्रप्रणाली सध्या जगातील सर्वांत अत्याधुनिक मानली जाते.
  • २९० किलोमीटर मारा करण्याची क्षमता असलेले ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र जमीन व समुद्र तसेच पाणबुडीवरून डागता येते. हवेतून मारा करण्याबाबत सध्या ‘ब्राह्मोस’च्या चाचण्याही सुरू आहेत.
 भारत आणि चीन संबंध 
  • हिंदी महासागरात गेल्या काही वर्षांत चीनचा वाढता प्रभाव हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. त्याचप्रमाणे शेजारी पाकिस्तानलाही चीन सातत्याने मदत करीत असतो. तसेच चीनने अलीकडेच श्रीलंकेतही पाणबुडी ठेवली आहे.
  • त्या पार्श्वभूमीवर भारताच्या या प्रयत्नांना विशेष महत्त्व आहे. अमेरिका व हनोईशी भारताची वाढती जवळीक चीनला अजिबात खपणार नाही.
  • चीनच्या वाढत्या लष्करी बळाला उत्तर म्हणून भारताने अत्याधुनिक ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र व्हिएतनामला विक्री करण्याचे प्रयत्न जोमाने वाढवले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये भारतीय महिलेचे अपहरण

  • एनजीओमध्ये काम करणाऱ्या जुडिथ डिसुजा या भारतीय महिलेचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. जुडिथ डिसुजा कोलकातामधील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची कर्मचारी आहे.
  • अफगाणिस्तानमधील प्रशासन जुडिथ डिसुजाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. भारतीय दुतावासदेखील अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. 
  • तालिबानने हे अपहरण केले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

अखिल शर्मा यांना आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार

  • भारतीय अमेरिकी लेखक अखिल शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला आहे.
  • आयर्लंडकडून हा पुरस्कार दिला जातो. एक लाख युरो, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कादंबरीसाठी दिला जाणारा हा जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे.
  • डब्लिन पुरस्कारासाठी १६० नामांकने आली होती. त्यातून शर्मा यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली. 
  • दिल्लीत जन्मलेले शर्मा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना त्यांच्या आत्मकथेसाठी २०१५ मध्ये ४० हजार पौंडांचा फोलियो पुरस्कार मिळाला होता.
  • ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिण्यासाठी शर्मा यांना १३ वर्षे लागली. पुरस्कारातील रकमेतून भावाच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘टाइम’च्या यादीत उद्योजक उमेश सचदेव

  • ‘टाइम’ मासिकाच्या सहस्राब्दीच्या दहा जणांच्या यादीत तरुण भारतीय उद्योजक उमेश सचदेव यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • ‘टाइम’च्या यादीतील या व्यक्ती अशा आहेत ज्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 
  • सचदेव आपले मित्र रवी सरावगी यांच्यासोबत यूनिफोर सॉफ्टवेअर कंपनी चालवीत आहेत. ते असा फोन तयार करीत आहेत ज्या माध्यमातून कोणत्याही भाषेत आदान-प्रदान करता येऊ शकते. 
  • यूनिफोरचे उत्पादन जगातील २५ पेक्षा अधिक भाषा आणि १५० बोली भाषेत सेवा देऊ शकते. तसेच या फोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा