चालू घडामोडी : १८ जून

 विशेष सूचना 
 • जे विद्यार्थी MPSC Toppers Mobile App डाऊनलोड करू शकत नाही ते, आतापर्यंत प्रकाशित झालेली सर्व मासिके Magazines या Tabमध्ये जाऊन डाऊनलोड करू शकतात.

सीओईपीच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वयम्’ उपग्रह

 • पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी एक लघू उपग्रह तयार केला आहे. त्यांनी या उपग्रहाला ‘स्वयम्’ असे नाव दिले आहे.
 • विद्यार्थ्यांनी बनविलेला भारतीय बनावटीचा हा पहिलाच लघू उपग्रह आहे. तसेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कमी वजनाचा उपग्रह म्हणूनही ‘स्वयम्’चे वेगळेपण आहे.
 • हा उपग्रह २२ जून रोजी इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपणतळावरून इतर २० उपग्रहांसोबत अवकाशात झेपावणार आहे.
 • साधारणपणे एक वर्ष हा उपग्रह कार्यरत राहील. प्रक्षेपण झाल्यानंतर उपग्रह व सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागेल.
 • या लघू उपग्रहाच्या निर्मितीसाठी ५० लाखांचा खर्च झाला आहे. या लघू उपग्रहाचे वजन ९९० ग्रॅम असून त्याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी साधारण १० सेंटीमीटर एवढी आहे. सहा सोलर पॅनेलच्या मदतीने उपग्रह कार्यरत राहणार आहे.
 २० उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवणार 
 • २२ जून रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्हीसी-३४’ हा प्रक्षेपक ‘स्वयम्’सह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावणार आहे.
 • यामध्ये १८ उपग्रह हे विदेशी आहेत, तर तामिळनाडू येथील सत्यभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. शिवाय पुण्याच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वयम्’ही असणार आहे.

मानव विकास अहवाल २०१५

 • ‘युनायटेड नेशन्स डेवेलपमेंट प्रोग्रॅम’ (यूएनडीपी)च्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या मानव विकास अहवालात भारताचा क्रमांक २०१५या वर्षात १८८ देशांमध्ये १३०वा असल्याचे घोषित झाले आहे.
 • २०१४ मध्ये भारताचा क्रमांक १३४वा होता. मानव विकास निर्देशांकानुसार भारताची थोडी प्रगती झाल्याचे दिसते.
 • मानव विकासात पहिल्या तीन देशांत नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. तर आपल्या शेजारच्या चीनचा क्रमांक ९०वा आहे.
 मानव विकास निर्देशांक 
 • मानव विकास निर्देशांक हा ‘यूएनडीपी’ने जगातील निरनिराळ्या देशातील लोकांचा विकास किती झाला आहे, यासाठी तयार केलेला निर्देशांक आहे.
 • आरोग्य संपन्न जीवन, ज्ञान व कौशल्य विकासाच्या संधींची उपलब्धता, उत्कृष्ट जीवनमानाची पातळी हे मानवी विकासाचे प्रमुख निकष मानण्यात आले आहेत.
 • मुख्यत्वे, आयुष्यमर्यादा, शिक्षण आणि राष्ट्रीय उत्पन्न/दर डोई उत्पन्न या आधारे हा अभ्यास केला जातो. यातून शिक्षण, आरोग्य, संधीची समानता, रोजगार, उत्पन्न, विषमता अशा अनेक बाबींचे विश्लेषण केले जाते.
 • विकासासाठी योजना तयार करताना निरनिराळ्या देशांना याचा उपयोग होतो.

भारत आणि थायलंड दरम्यान महत्वपूर्ण करार

 • भारत आणि थायलंड यांच्यात महासागर तसेच संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत १७ जून रोजी महत्त्वपूर्ण करार झाले.
 • भारत-म्यानमार-थायलंड या तीन देशांत त्रिपक्षीय राजमार्ग योजना आणि मोटार वाहन करार, तसेच आर्थिक सहकार्याबाबत लवकरात लवकर करार करण्यावर भर देण्यात आला.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ चा यांच्यात हैदराबाद हाउसमध्ये द्विपक्षीय शिखर परिषद झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी करारासंदर्भात घोषणा केली.
 • उभय देशांत सांस्कृतिक देवाण-घेवाण तसेच नालंदा विद्यापीठ आणि चियांग मई विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सहकार्याबाबतच्या करारावर हस्ताक्षर करण्यात आले.
 • या वेळी मोदी यांनी थायलंडच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा योजनेची घोषणा केली. त्यानुसार थायलंडच्या नागरिकास एकाच व्हिसावर दोनदा भारतात येणे शक्य होणार आहे.
 • थायलंडचे पंतप्रधान प्रयुत हे पत्नी नारापोर्न चान ओ चा आणि उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासमवेत भारत भेटीवर आले आहेत.

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला रौप्य

 • चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारलेल्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला व रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
 • संपुर्ण सामन्यात जबरदस्त बचावाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले.
 • पहिल्या दोन क्वार्टर्समध्ये ऑस्ट्रेलियाने सातत्याने भारतीय गोलपोस्टवर आक्रमण केले. पण अनुभवी श्रीजेशने ऑस्ट्रेलियाची सर्व आक्रमणे निष्फळ ठरविली.
 • ऑस्ट्रेलियाकडून डॅनिएल बेले, सिमॉन ऑर्चर्ड आणि अरन झलेवस्की यांनी निर्णायक गोल केले. तर भारताकडून एकमेव गोल हरमनप्रीत सिंग याने केला.
 • सहा देशांच्या राऊंड रॉबिन स्पर्धेला १९७८मध्ये प्रारंभ झाल्यानंतर भारताने प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. 
 • भारताने आतापर्यंत केवळ १९८२च्या अ‍ॅमस्टर्डम स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवलेला होता. या स्पर्धेत भारताला ७ वेळा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

एनआयएफटीच्या अध्यक्षपदी चेतन चौहान

 • नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू आणि दोन वेळा खासदार झालेले चेतन चौहान यांची निवड झाली आहे. 
 • ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार होते.
 • सध्या चौहान यांच्याकडे सध्या दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) उपाध्यक्षपदाचा कार्यभार आहे. ते बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.
 • एनआयएफटीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. एनआयएफटीच्या २००६मधील घटनेनुसार नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ किंवा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ किंवा व्यावसायिकाची निवड करण्यात येते.

सतीश कुमार व मीराबाई रिओसाठी पात्र

 • भारताचे शिवालिंगम सतीश कुमार व सैखोम मीराबाई चानू यांना रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
 • या खेळाडूंनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाच्या राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवल्यामुळे त्यांना ही संधी प्राप्त झाली आहे.
 • उझबेकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ आशियाई स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे भारताने ऑलिम्पिकासाठी दोन प्रवेशिका निश्चित केल्या होत्या.
 • सतीशने ७७ किलो गटात स्नॅचमध्ये १५१ किलो, तर क्लीन व जर्कमध्ये १८५ किलो असे एकूण ३३६ किलो वजन उचलले. 
 • मीराबाईने ४८ किलो गटात दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलताना स्वत:च नोंदवलेला ८४ किलो हा विक्रम मोडला.
 • तिने क्लीन व जर्कमध्ये एन कुंजुराणी देवीने नोंदवलेल्या १०७ किलो विक्रमाची बरोबरी केली. तिने एकूण १९२ किलो वजन उचलत कुंजुराणीने नोंदवलेला १९० किलो हा विक्रम मोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा