चालू घडामोडी : २४ जून

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

  • भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे याची निवड करण्यात आली आहे. कुंबळे यांच्याकडे एका वर्षासाठी मार्गदर्शनाची धुरा असेल.
  • सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या निवड समितीने २१ उमेदवारांमधून अनिल कुंबळे याची निवड केली.
  • टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर झिंबाब्वे दौऱ्यासाठी हंगामी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची नियुक्ती झाली होती.
  • भारतीय क्रिकेटच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळालेला कुंबळे हा कर्नाटकचा दुसरा प्रशिक्षक आहे. युवा आणि ‘अ’ संघाचे प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार राहुल द्रविड यांची यापूर्वीच नियुक्ती झाली आहे.
 अनिल कुंबळे यांची कारकिर्द 
  • लेगस्पिनर असलेल्या कुंबळेने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ बळी घेतले असून मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) व शेन वॉर्न (७०८ बळी) यांच्यानंतर सर्वाधिक विकेटच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
  • त्यासोबतच, नाबाद ११० धावांच्या खेळीसह त्याने कसोटीत २,५०६ धावाही केल्यात.
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये कुंबळेने २७१ सामन्यांमध्ये ३३७ गडी बाद केले आहेत आणि ९३६ धावा केल्या आहेत.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५६ बळी घेणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
  • १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीच्या एका डावात सर्व १० बळी घेण्याचा पराक्रम कुंबळेच्या नावावर आहे.
 पुरस्कार व सन्मान 
  • १९९५मध्ये अर्जुन पुरस्कार
  • १९९६मध्ये विस्डेन पुरस्कार
  • २०१२पासून आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
  • २०१५मध्ये ‘हॉल ऑफ फेम’ बहुमान
 क्रिकेट निवृत्तीनंतरची कामगिरी 
  • कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद
  • राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद
  • बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे सदस्य
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्गदर्शक
  • मुंबई इंडियन्सचे प्रमुख मार्गदर्शक

एलआयसी अध्यक्षांचा राजीनामा

  • सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांनी व्यक्तिगत कारणाने पदाचा राजीनामा दिला.
  • रॉय यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती दिली आहे. त्यांच्या नियोजित कार्यकाळाची आणखी दोन वर्षे शिल्लक होती.
  • त्यांच्या जागी नव्या उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया येत्या महिन्यात पूर्ण होईल, तोवर रॉय हेच अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील.
  • जून २०१३ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत रॉय यांची पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते १९८१पासून महामंडळाच्या सेवेत आहेत.
  • एलआयसीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या कारकीर्दीत एलआयसीचा ६५ टक्क्यांवर घसरलेला बाजारहिस्सा पुन्हा ७१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
  • अध्यक्षाने मुदतीपूर्वी बाहेर पडण्याचा एलआयसीत परंपराच राहिली आहे. या आधी माजी अध्यक्ष जी. एन. वाजपेयी हे मुदतीपूर्वी राजीनामा देऊन सेबीच्या संचालक मंडळावर गेले होते.
  • रॉय यांच्यापूर्वीचे अध्यक्ष टी. एस. विजयन हेही संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच विमा नियामक प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून रुजू झाले.

विकास कृष्णन आणि मनोज कुमार रिओसाठी पात्र

  • विकास कृष्णन आणि मनोज कुमारने (६४ किलो) बाकू (अझरबैझान) येथे एआयबीए जागतिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून रिओ ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले.
  • मनोज कुमारने लाईट वेल्टरवेट (६४ किलो) गटातील उपांत्यपूर्व फेरीत ताजिकिस्तानच्या राखीमॉव शाकवकतद्झॉन याचा ३-० असा पाडाव केला.
  • विकासने मिडलवेट (७५ किलो) गटात कोरियाच्या ली डॉंगयुन याच्याविरुद्ध ३-० असा विजय संपादला.
  • ऑलिंपिकसाठी आता भारताचे एकूण तीन मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत. याआधी चीनला झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेद्वारे शिवा थापाने ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.
  • माजी आशियाई कांस्यपदक विजेता मनोज आणि विकास दोघेही २०१२च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. मनोजचे उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले होते, तर विकास प्राथमिक फेरीत पराभूत झाला होता.

‘इनमोबी’ कंपनीला दंड

  • ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या ठावठिकाण्याची (लोकेशन्स) माहिती घेतल्याप्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने ‘इनमोबी’ या भारतीय कंपनीला ९ लाख ५० हजार डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
  • इनमोबीवर पहिल्यांदा चार दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठाविण्यात आला होता, परंतु कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता तो कमी करण्यात आला.
  • याशिवाय कंपनीने जमा केलेली सर्व माहिती नष्ट करावी असा आदेश देण्यात आला.
  • कंपनीने लहान मुलांची माहितीही जमा केली असल्याने त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ‘चिल्ड्रन ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट‘नुसार (कोप्पा) हे आदेश देण्यात आले आहेत.
 काय आहे इनमोबी? 
  • इनमोबी ही मोबाईलद्वारे जाहिरात करणारी भारतीय कंपनी आहे.
  • बंगळूमध्ये कंपनीचे मुख्यालय असून कंपनीत एक हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
  • भारतामध्ये २००७साली स्थापन झालेल्या या कंपनीच्या जगभर १७ शाखा आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा